Monday, July 6, 2020

मध्य प्रदेश सहल :२० ते २९ डिसेम्बर २०१९


मध्य प्रदेश सहल :२० ते २९ डिसेम्बर २०१९
  साधारणतः २०-२२ वर्षांपूर्वी पर्यंत असलेली, दरवर्षी दिवाळीच्या सुटीत भारतातल्या कुठल्यातरी राज्यात सहलीला जायची आमची प्रथा; अलिकडच्या काळात खंडित झाली होती.आज इतक्या वर्षांनी तो योग 'गो चि' च्या निमित्ताने जुळून आला. गो चि म्हणजे गोंधळेकर - चितळे.मी आणि प्रीती म्हणजे प्रीती गोंधळेकर असे आम्ही दोघं carpool ने ऑफिस ला ये जा करीत आहोत. पण हि ऑफिस collegues  चि ओळख तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही तर तिचं कुटुंब आणि आमचं कुटुंब हे आता एकत्र कुटुंब असल्यासारखं झालं आहे म्हणूनच मी आणि कांचन हे चितळे आणि प्रीती,उदय आणि त्यांची लेक पूर्वा हे गोंधळेकर म्हणजेच गो - चि  ने सहलीला जायचं planning सुरु केलं अनेक पर्यायांची चाचपणी झाल्यावर ‘मध्य प्रदेश’ ला जायचं ठरलं. मध्य प्रदेश खूप मोठा असल्यामुळे कुठली ठिकाणं बघायची याची बरीच चर्चा झाली.अखेरीस इंदौर उज्जैन ग्वालियर जबलपूर अशी ३ शहरं आम्ही ठरवली.खवय्येगिरी, ट्रेकिंग आणि भटकंती अश्या सगळ्याचा मिलाफ म्हणजे हि ३ शहरं होती. या ट्रिप चं planning तसं उशिरा सुरु केल्यामुळे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी ठरवणं आवश्यक होतं. मुख्य चर्चा सुरु झाली ते जायचं कसं यावरून.
  स्वतः चालवत  जाणं हा पर्याय अव्यवहार्य होता आणि भाड्याची गाडी घेऊन जायचं तरी इतका प्रवास कार मध्ये बसून करणं त्रासदायक झालं असतं, त्यामुळे अखेरीस रेल्वे नि जायचं ठरलं. लगेचच मी आणि कांचनने रेल्वे तिकीट मिळतायेत का याची चाचपणी चालू केली. इंदौर ग्वालियर जबलपूर या प्रवासाची फक्त ६ तिकिटं शिल्लक होती आणि महाकालेश्वराच्या दर्शनाचा योग होता म्हणून ती आम्हाला मिळाली. एवढंच नाही तर येतानाचं जबलपूर मुंबई हे तिकिट पण मिळत होतं. कदाचित या ट्रिप चा योग जुळूनच आला होता फक्त एकच अडचण आली कि पुणे - इंदौर ह्या पहिल्या प्रवासाचं  तिकीटंच  confirm मिळालं नव्हतं पण ते confirm होईल अशी आशा होती. हे सगळं जुळून येत होतं तोच पूर्वाच्या परीक्षेचं tension पुढे आलं कारण तिच्या परीक्षेच्या तारखा या आमच्या ट्रिप च्या तारखांशी बरोब्बर जुळत होत्या. आमच्या प्रवासाची तर सगळी तिकिटं बुक झाली होती. नशिबाने अगदी जायच्या आधी समजलं कि परीक्षा ३० तारखेपासून आहे आणि आम्ही सुटकेचा श्वास टाकला. आता परीक्षेची तारीख नक्की झाली म्हटल्यावर आम्ही हॉटेल बुकिंग्स केली. ग्वालियर आणि जबलपूर अश्या दोन ठिकाणी हॉटेल्स बुक करावी लागणार होती. इंदौर मध्ये हॉटेलची गरज नव्हती कारण तिथे एका छान फॅमिलीत आम्ही राहायला जाणार होतो हे कुटुंब म्हणजे आमच्याच बिल्डिंग मधे राहणाऱ्या जोशी काका काकूंच्या मोठ्या मुलाचं कुटुंब…एकमेकांना कधी बघितलेलही नसताना केवळ एका फोन वर तुम्ही बिनदिक्कत आमच्या घरी या हे सांगणं, इंदौर ला आम्ही बस मधून उतरल्यावर प्रत्यक्ष घ्यायला येणं आणि तेवढ्याच प्रेमाने तीनही दिवस आमचं आदरातिथ्य करणारं असं हे जोशी कुटुंब. योगेश-शुभांगी-अथर्व-श्रुती जोशी आणि जोशी काका काकू असं हे ६ जणांचं कुटुंब. तर आम्ही ठरल्याप्रमाणे २० तारखेला पुण्याहून इंदौरला बसने जायला निघालो. रेल्वेचं तिकीट confirm न झाल्याने ऐन वेळी मिळेल त्या बस ने जायचं ठरवलं. २ दिवस आधी पूर्वाचा छोटासा accident होऊन आता ट्रिप ला जाता येईल का ते देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगलींमुळे ट्रिप कॅन्सल करायची का इथपर्यंत आलेली आमची ट्रिप अखेर मार्गी लागली आणि आम्ही अशोक ट्रॅव्हल्स च्या बस ने जायला निघालो. बसून प्रवास करायला लागणार याची तयारी आधीच केली होती. पण पुढची ट्रिप समोर दिसत असल्याने या प्रवासाचा थकवा आधीच निघून गेला. रात्री बस स्माईल स्टोन नावाच्या हॉटेल पाशी थांबली आणि आम्ही गरम गरम पावभाजी आणि घरून आणलेल्या चटणी -पोळी वर ताव मारला. बस पुन्हा मार्गस्थ झाली. आम्हा सगळ्यांनाच झोप आल्यासारख वाटत होतं पण झोप लागत नव्हती. अहमदनगर ,शिर्डी,कोपरगाव,मनमाड,मालेगाव,धुळे अशी शहरं मागे टाकत बस मध्य प्रदेश च्या हद्दीत कधी शिरली हे समजलंच नाही.
  सकाळी साधारण 5.30 च्या सुमारास आम्ही हॉटेल मनाल इथे पोहोचलो. इंदौर च्या आधी महू गावाजवळचाच तो एक भाग होता. उतरल्याबरोबर मी योगेश दादाला फोन केला आणि पुढल्या काही मिनिटात तो हजर झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव असलेल्या या MHOW म्हणजेच 'मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर' ला आमचा मुक्काम असणार होता. कार मध्ये बसून आम्ही घराकडे निघालो. आर्मी च्या त्या स्वच्छ आणि सुनियोजित रस्त्यावरून जाताना आर्मी कडेच रस्त्यांच्या देखभालीचं काम का देऊ नये असा विचार मनात येऊन गेला. साधारण २०-२५ मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. पुण्यातल्या पेठांमध्ये जशी जवळ जवळ घरं किंवा वाडे असतात तशा वस्तीमध्ये आम्ही शिरलो आणि जोशी कुटुंबातल्या सगळ्यांनीच आमचं अतिशय छान स्वागत केलं.
   २१ तारखेला आम्ही उज्जैन ला जाण्याचा बेत केला. सकाळी साधारण १०.३० वाजता आम्ही फिरोज भाई नावाच्या ड्राइवर ला घेऊन निघालो. आधी इंदौर शहराचा छोटा फेरफटका मारला. रहदारी बघून पुण्यापेक्षा फार काही वेगळं वाटलं नाही, स्वच्छता मात्र लक्षणीय जाणवली. नंतर आम्ही उज्जैनच्या दिशेनी प्रयाण केलं. दोन्ही बाजूला बटाटा,गहू लावलेली शेतं आणि सरळ गुळगुळीत डांबरी रस्ता असा आमचा छान प्रवास झाला. साधारण ५०कि.मी. प्रवास केल्यावर १२.३०च्या दरम्यान आम्ही महांकालेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो. डाव्या हाताला,जगात अद्याप एकमेव असलेलं एक विशेष मंदिर होतं, त्याचं सविस्तर वर्णन पुढे करीन. त्या मंदिराच्या कडेनं आधी आम्ही महांकालेश्वराच्या दिशेने चालायला लागलो. दुतर्फा असलेले पूजेचं साहित्य विकणाऱ्यांचे स्टॉल्स,पोलिसांचे बॅरिकेड्स अशा गजबजाटातून आम्ही मंदिराच्या दर्शन रांगेपाशी पोहोचलो.  महादेवाचं दर्शन सहजासहजी होत नाही असं म्हणतात हेच खरं. कारण दर्शन रांग जिथे सुरु होते तिथून प्रत्यक्ष महादेवाचं दर्शन घ्यायला आम्हाला १-१.५ कि.मी. अंतर पायी जावं लागलं. प्रत्यक्ष गाभाऱ्यात प्रत्येकाला जाता येत नसलं तरी लांबून व्यवस्थित दर्शन घेता येत होतं.या दर्शनाने आम्ही अद्याप दर्शन घेतलेल्या ज्योतिर्लिंगाच्या संख्येत आणखी एकाची भर पडली. महांकालेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही मगाशी वर्णन केलेल्या त्या विशेष मंदिरात आलो. हे होतं भारतमातेचं मंदिर. अतिशय सुबक मूर्ती आणि तितकंच सुबक मंदिराचं बांधकाम म्हणजे हे भारतमाता मंदिर. आजवर ज्या भारतमातेचं दर्शन फक्त टेलिव्हिजन च्या गाण्यांमध्ये, चित्रपटांमध्ये किंवा १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला फोटो मधून व्हायचं तिची साक्षात मूर्ती आम्ही बघत होतो. भगवी वस्त्र परिधान केलेली खरोखरीच अतिशय देखणी - तेजस्वी - सात्विक मूर्ती आहे ती आणि त्या मूर्तीला साजेसेच तिथले स्थापत्यहि राखले आहे. भारत मातेला वंदन करून तिच्या ऐक्यासाठी आम्ही मनोमन प्रार्थना केली. हि दोन मंदिरं बघून झाली तोवर जवळपास २.३० वाजले होते,भूक सपाटून लागली होती. जवळच्याच एका खानावळीत आम्ही जेवलो आणि लगेचच परत इंदौर च्या दिशेने निघालो. तिथला लालबाग पॅलेस आम्हाला बघायचा होता. त्याची बंद होण्याची वेळ ५ होती आणि तिथवरचा रस्ता साधारण १ तासाचा त्यामुळे आम्ही अगदी जेमतेम पोचणार हे दिसत होतं. फिरोज भाई नि गाडी चांगलीच दामटली आणि आम्ही ४.३० च्या सुमारास पॅलेस च्या आवारात पोहोचलो. तिकिटं घेऊन पटकन आत शिरलो. पॅलेस मोठा होता आणि आमच्या कडे जेमतेम अर्धा तास होता. पण पुढच्या अर्ध्या तासात आम्हाला कळलं कि धावतपळत का होईना पण आपल्याला हा वैभवसंपन्न वाडा बघण्याची मिळालेली हि सुवर्ण संधी होती!  हे वैभव ज्यांनी खरोखरीच अनुभवलं ती माणसं प्रत्यक्ष कशी असतील हा कुतूहलाचा विषय आहे. अद्यापही वाड्याचा काही भागच प्रेक्षकांसाठी खुला आहे. त्यात  असणारी दालनं अतिशय भव्य आहेत. त्यात भव्य मसलत कक्ष (मीटिंग हॉल), भोजन कक्ष, केशकर्तनालय,राजा व राणीची स्वतंत्र दालनं इत्यादी आहेत. त्या काळात सुद्धा खूप आधुनिक वाटावी अशी सोय म्हणजे जेवण खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यांवर पाठवण्यासाठी असलेली लिफ्ट. शिसवी लाकडातली कपाटं, पलंग, जिने, अगदी जीवंत वाटावी अशी तैलचित्र, काचेची मोठमोठी झुंबरं असं वैभव अद्याप चांगलं जतन केलं आहे. संपूर्ण पॅलेस मध्ये एक खटकणारी गोष्ट म्हणजे वन्य प्राण्यांची शिकार आणि त्याची प्रतीकं म्हणून पॅलेस मध्ये अनेक ठिकाणी जतन करून ठेवलेली या प्राण्यांची मृत शरीरं. असो..हे सगळं वैभव अतिशय चांगल्या प्रकारे जतन केल्याबद्दल भारतीय पुरातत्व खात्याचं कौतुक करायला पाहिजे. संध्याकाळचे ५ वाजल्यामुळे पॅलेस बंद करण्यासाठी तिथले रखवालदार शिट्ट्या मारू लागले, मग आम्ही पण त्याकडे थोडा कानाडोळा करून पॅलेस च्या आवारात फोटो काढू लागलो,
 संध्याकाळी ६ च्या सुमारास आम्ही तिथून निघालो आणि प्रीती चे मामा म्हणजे चौकसे फॅमिली ला भेटायला इंदौर च्या विजयनगर भागात आलो. अस्खलित हिंदी आणि त्याला बुंदेलखंडी बाज असलेल्या त्यांच्या भाषेनं आमच्या रंगलेल्या गप्पा आणि बरोबरीने स्वादिष्ट ढोकळा आणि पाकाने भरलेले रसगुल्ले यांनी आम्ही अगदी तृप्त झालो. एवढं पोट भरल्यावर पुन्हा रात्रीचं जेवण करण्याचा काही प्रश्नच नव्हता, पण इंदौरच्या हवेत आलं कि आपोआपच इथल्या प्रसिद्ध चटपटीत आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होतेच आणि त्यामुळेच चौकसे फॅमिली कडून निघताना “आता काहीही नको जेवायला” असं म्हणणारे आम्ही छप्पन या सुप्रसिद्ध परिसरात आल्यावर तिथले खाण्याचे स्टॉल बघून चाट वर ताव मारण्यासाठी सज्ज झालो.मग काय!! पाणी पुरी,साबुदाणा खिचडी, आलू चाट , व्हेज मोमो,चिकन मोमो असे एकामागून एक पदार्थ आणि मग त्यावर ट्रिपल चॉकोलेट आईस्क्रीम चा कळस असं परत पेट पूजेचं मंदिर उभं राहिलेलं आम्हालाही कळलं नाही. 

अशाप्रकारे २१ तारखेचा दिवस अतिशय आनंदात साजरा करून आम्ही परत महू ला मुक्कामी आलो.

  २२ तारखेला महेश्वर बघण्याचा आणि मग खरेदी असा बेत होता. ठरल्याप्रमाणे सकाळी ९.३० च्या सुमारास आमची गाडी दारापाशी हजर झाली. योगेश जोशी आणि शुभांगी जोशी यांनी आमच्या नाश्त्यापासून ते सकाळी गाडी वेळेत हजर करण्यापर्यन्त सगळी अगदी चोख व्यवस्था लावली होती यासाठी त्या दोघांचे आणि सर्वच जोशी कुटुंबाचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. तर आम्ही ९.३० वाजता महेश्वर च्या दिशेने निघालो.वाटेत जामगेट नावाचा एक बुलंद दरवाजा दिसतो. मध्यप्रदेशात शिरल्यापासून प्रथमच आम्ही एका घाटमाथ्याला आलो होतो आणि जामगेट मधून समोर डोंगरांच्या दिसणाऱ्या रांगा सुखावणाऱ्या होत्या. एखाद्या किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजा अशी ही जामगेटची रचना होती. जामगेटच्या तटबंदीवरुन आसपासच्या प्रदेशाचं विहंगम दृश्य दिसत होतं.


 थोडा वेळ तिथे फोटोग्राफी झाली आणि मग गरमागरम भजी आणि चहा असा बेत आटोपून आम्ही महेश्वरच्या दिशेने निघालो.
  महेश्वर ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची राजधानी, त्यामुळे इथला होळकर किल्ला, त्याच्या परिसरात असलेली अखिलेश्वर आणि काशीविश्वनाथ ही मंदिरं आणि होळकर वाडा यांकरिता शहर प्रसिद्ध आहे. १७५४ मध्ये अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांचं निधन झालं. पुढे १२ वर्षांनी अहिल्याबाई यांचे सासरे मल्हाराव होळकर यांचा मृत्यू झाला आणि अहिल्याबाईंनी त्यांची राजधानी इंदौरहुन महेश्वरला हलवली आणि इथे होळकर वाडा,होळकर किल्ला आणि मंदिराची निर्मिती केली. इथला अतिशय भव्य आणि सुंदर नर्मदेचा घाट आणि समोर पसरलेलं निर्मळ पाणी खिळवून ठेवणारं होतं.

 इथल्या मंदिरांचं स्थापत्य आणि त्यावरची कलाकुसर तर मोहक आहेच आणि होळकर वाड्याचा साधेपणा आणि सौंदर्य देखील. अहिल्याबाई या अतिशय महान योद्धा आणि उत्तम प्रशासक असल्या तरी तितक्याच साधेपणाने जगणाऱ्या होत्या हे तो वाडा बघून सहज लक्षात येतं. कुठलाही बडेजाव नसणारा हा चौसोपी वाडा अहिल्याबाईंच्या प्रशासनाची साक्ष देत उभा आहे. वाड्याच्या समोरील बाजूस घाटाकडे जाणारा रस्ता आहे. पायऱ्या उतरून खाली जाताना एका बाजूस हातमागावर विणल्या जाणाऱ्या साड्यांचा कारखाना तर दुसऱ्या बाजूस अतिशय सुंदर मंदिरं बघायला मिळतात. मंदिरांची उंची त्यांच्या भिंतीवरील नक्षीकाम,खांबांची रचना पायऱ्यांची उंची ही चकित करणारी आहे. मंदिर ओलांडून पुढे गेलं कि नदीकडे जाणारा विस्तीर्ण घाट दिसतो आणि समोर नर्मदा माता आपल्या अजस्र पात्राचं दर्शन घडवते. इथे बोटिंग चा आनंद घेऊन आम्ही परत फिरलो. काशीविश्वेश्वर मंदिर आणि एकमुखी दत्त अतिशय सुंदर आहे. काशी विश्वेश्वर मंदिर हे वाराणसीच्या मंदिराची प्रतिकृती आहे. अशाप्रकारे महेश्वर दर्शन पार पाडून आम्ही महू ला परतलो. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे महूमध्ये खरेदी साठी आम्ही निघालो. महू चं कापड मार्केट खूपच स्वस्त आहे. तिथल्या चादरी आणि सगळ्या ऋतूत पांघरायला उपयोगी असे दोहड फार प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या रास्त दरासाठी आणि चांगल्या दर्जासाठी .भेट देण्यासाठी म्हणून हा फार छान प्रकार आहे. शिवाय इथे मिळणारा स्मोकिंग हा कापडाचा प्रकारही प्रसिद्ध आहे. आम्ही या स्मोकिंग प्रकारातली साधारण १०-१२ कापडं आणि ५-६ फ्रॉक घेतले. मग कांचन,प्रीती आणि पूर्वा ही नामी संधी सोडतात थोडीच! त्यांनीही मनसोक्त खरेदी केली. मुलांसाठी आणि पुरुषांसाठी मात्र या स्मोकिंग प्रकारातलं काही मिळत नाही मग आम्ही चांगलेसे कुर्ते घेतले आणि तेही आपल्याकडच्या साधारण निम्म्या किमतीत. अशा तऱ्हेने बाजारात जाताना रिकाम्या हाताने गेलेलो आम्ही अक्षरशः बाजार लुटून आलो. रात्रीचे ९.३० वाजले होते. आता या ट्रिप मधल्या सगळ्यात उत्सुकतेच्या जागी आम्ही निघालो. ती जागा म्हणजे सराफा गल्ली किंवा खाऊ गल्ली. नावाप्रमाणे ही मूळची सराफ गल्ली आहे, पण रात्री ९ च्या सुमारास सगळी सराफ दुकानं बंद झाली कि त्या दुकानांच्या बाहेर विविध पदार्थांचे ठेले चालू होतात! आपल्या रविवार पेठेतील एखाद्या छोट्या गल्लीप्रमाणे ही छोटी गल्ली आहे जिची रुंदी साधारण १२-१५ फूट असेल आणि त्यात रस्त्याच्या दुतर्फा विविध खाद्य पदार्थांची लयलूट असते. खाण्याचा मनसोक्त आनंद लुटता येणारी ही जागा…खाण्यासाठी सर्वकाही या वाक्याचा तंतोतंत अवलंब करून जणू काही मोफत खाद्य पदार्थ वाटप सुरु झालंय असं वाटावं इतक्या प्रमाणात इथे गर्दी असते. आम्ही साधारण १०% गल्ली फिरलो असू पण त्यात १२-१३ पदार्थांचा आस्वाद घेतला. गराडू हा नवीन पदार्थ इथे खायला मिळाला. सुरणासारख्या एका कंदापासून बनवलेली ती डिश होती, त्या कंदाला तळून त्याचे छोटे काप करून त्यावर तिखट मीठ लावून तयार केलेली ही डिश सगळ्यांनीच आवडीने खाल्ली. मग सराफा गल्लीत फेमस असणाऱ्या जोशींच्या दुकानात आम्ही गेलो. दही वड्याची भरलेली प्लेट हवेत उडवून हलकेच हातात झेलून तिच्यात पाच बोटाच्या पाच पेरांवर ठेवलेले मसाले अलगद घालून देण्याची त्यांची ती कलाकारी बघून आणि तेवढाच स्वादिष्ट दहीवडा खाऊन आमचे चक्षुरेंद्रिय आणि रसनेंद्रिय सुखावले. पुढे या खाद्ययात्रेत पनीर टिक्की,स्प्रिंग पोटॅटो,मक्याचा उपमा,कचोरी चाट,पास्ता ,सँडविच असे चमचमीत थांबे लागले ;) यानंतर शेवट गोड़ करायचा म्हणून घेतलेल्या मालपुवा आणि खव्याच्या जिलबीवर सगळ्यांनी ताव मारला. दोन्ही हातांचे तळवे जोडले तर त्यावर मावेल एवढ्या आकाराची,जाड कडीची आणि पाकाने ओतप्रोत भरलेली ती जिलबी आम्ही सगळे मिळून पण संपवू शकलो नाही यावरून त्या जिलबीचा अंदाज येऊ शकतो आणि या सगळ्याचा कळस म्हणजे आता काही नको असं म्हणून आम्ही स्मोक पान नावाचा एक प्रकार अनुभवायला आलो. आधी एक दोघेच खाऊन बघू असं म्हणत प्रत्येकानेच त्या स्मोक पानाचा आणि सिगारेट प्यायल्यावर यावा तसा नाकातोंडातून धूर येण्याचा आनंद लुटला. आधी एवढे पदार्थ खाऊन पोटात लावलेल्या आगीचा धूर या पानामुळे नाकातोंडातून बाहेर पडला. तर असा २२ डिसेम्बर चा संस्मरणीय दिवस संपवून आम्ही महू ला परतलो.
  २३ डिसेम्बर ला मांडूला (मांडवगड) जायला आम्ही निघालो. मांडवगड इंदौर पासून साधारण ९० कि.मी. वर आहे. सकाळी ८.३० ला आम्ही निघालो. मांडू हे धार जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर आहे. साधारण ८व्या शतकापासून या शहराचं अस्तित्व आहे ज्यावर नंतर मुघल राज्यं होतं. अफगाणी स्थापत्य शैलीचा प्रभाव असलेल्या या परिसरात राणी रूपमती पॅलेस,जहाज महाल ,बाज बहादूर पॅलेस,जामी मस्जिद,होशंग शाह मकबरा अशी विविध ठिकाणं आहेत. राणी रूपमती म्हणजे माळवा प्रांताचा राजा बाज बहादूर याची पट्टराणी. रूपमती हि कवयित्री होती,बाज बहादूर तिच्या प्रेमात पडला आणि आपल्या मांडू शहरात येण्यासाठी त्याने तिला निमंत्रण दिलं. रूपमतीने त्याचं निमंत्रण स्वीकारलं पण एका अटीवर, ती अट म्हणजे नर्मदेच्या काठी अतिशय शांत - निसर्ग रम्य आवारात तिच्यासाठी एक अशी वास्तू बांधण्याची जिथे ती तिच्या काव्यरचनेच्या व्यासंगाची पूर्तता करू शकेल,बाज बहादूर ला रूपमतीच्या सौंदर्याने आणि प्रतिभेने मोहिनी घातलेलीच होती तेव्हा तिची हि अट अर्थातच पूर्ण झाली आणि हा मंडप अस्तित्वात आला. रूपमती पॅलेस जरी म्हटले असले तरी निवासापेक्षा केवळ विहारासाठीच उपयुक्त वाटू शकेल असा हा मंडप आहे, जिथून एका बाजूला नर्मदेचं नयनरम्य पात्र तर दुसऱ्या बाजूला बाज बहादुराचा राजवाडा दिसतो आणि सभोवताली दूरपर्यंतचा मोठा परिसर दिसतो. मंडपाची रचना २ मजली आहे. नंतरच्या काळात लष्कराचा वॉच टॉवर म्हणूनही हा मंडप वापरला जायचा.


रूपमती महाल बघून आम्ही जामी मस्जिद पाशी आलो. एकसारखेपणाचा उत्तम नमुना म्हणजे या मशिदीतली खांबांची रचना,मखर,नक्षीकाम…मशिदीचा काही भाग पडलेला आहे, पण जो बघता येतो तो अजूनही बऱ्या अवस्थेमध्ये आहे. जामी मशिदीच्या समोरच एक विजयस्तंभ आहे. अत्यंत पडीक अवस्थेत असलेल्या या स्तंभाची घुमटी मात्रं चांगल्या स्थितीत आहे.
हे सर्व बघून आम्ही जहाजमहालाकडे निघालो. असं म्हणतात गियास उद्दीन खिलजी याने त्याच्या १५००० बायकांसाठी या जहाज महालाची निर्मिती केली होती. या जहाज महालाची व्याप्ती बघता हे खरं वाटावं असंच आहे. भव्य परिसरात हा जहाज महाल पसरला आहे,महालाच्या मागील बाजूस विस्तीर्ण जलाशय आहे. मुख्य महालावर ४ घुमटी आहेत.त्या पलीकडे हिंडोला महाल, होशांग शाह ची कबर अशा इमारती आहेत. या सगळ्यामध्ये कलाकुसर आणि स्थापत्य शास्त्र म्हणजेच आर्किटेक्चरचा अतिशय प्रभावी वापर केल्याचं दिसतं, हा संपूर्ण महाल ASI च्या अख्त्यारीमध्ये असल्याने देखभाल सुद्धा चांगल्या प्रकारे केली आहे.
तर अशी हि मांडु ची सफर पूर्ण करून आम्ही परत महू मुक्कामी आलो.शुभांगी वाहिनीने आमच्यासाठी पावभाजी चा बेत केला होता. संध्याकाळी साधारण ६ वाजता आम्ही आमची ग्वालियर ची गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्टेशन कडे रवाना झालो जायला निघालो ते जोशी कुटुंबियांकडून मिळालेला प्रेमाचा अविस्मरणीय असा पाहुणचार घेऊन. पु.लं. च्या भाषेत सांगायचं तर एखाद्याची आणि आपली वेव्हलेंग्थ का जुळावी याला काही उत्तर नसतं.१५-१५ वर्ष एकमेकांना ओळखणारी माणसं शिष्टाचाराची घडी मोडण्यापलीकडे कुठलाही परिचय ठेवत नाहीत,पण काही माणसं क्षणार्धात जन्मजन्मांतरीचं नातं असल्यासारखी एकमेकात मिसळून जातात. तसंच काहीसं आमचं जोशी कुटुंबियांसोबत झालं.
  मागचे ३ दिवस जेवढे आरामात गेले तेवढाच शेवटचा १ तास आम्हाला धावपळ करायला लावणारा होता. कारण आम्ही जरी वेळेवर रेल्वे स्थानकावर पोहोचलेलो होतो तरी ऐन वेळी आमची गाडी दुसऱ्याच फलाटावर आल्यामुळे सगळं सामान घेऊन धावत सुटायला लागणार होतं, आम्हाला साधारण १० मिनिटात १.५ कि.मी अंतर सामानासह पळत जाऊन कापायचं होतं, अखेर ३ डबे अलीकडच्याच बोगीत शिरून आम्ही गाडी पकडण्यात कसेबसे यशस्वी झालो आणि सुटकेचा निश्वास टाकला.
  २४ डिसेम्बर रोजी सकाळी ७.३०च्या दरम्यान आम्ही ग्वालियरला पोहोचणार होतो. येताना ट्रेन मधेच आम्हाला थंडीची चाहूल लागली होती. दोन्ही बाजूला विस्तीर्ण मैदानं,अधेमधे असलेलं छोटे छोटे डोंगर यामधून आमची रेल्वे जात होती. ग्वालियर ला पोहोचल्यावर हॉटेल कुठल्या दिशेला आहे याची चाचपणी करून आम्ही कॅब बुक केली. हॉटेल तानसेन रेसिडेन्सी रेल्वे स्थानकापासून अगदीच जवळ आहे. बाहेर पडल्याबरोबर गुलाबी थंडीने आमचे स्वागत केले.साधारण पुढच्या १० मिनिटाच्या आत आम्ही कॅब ने हॉटेल मध्ये पोहोचलो होतो.छोटेखानी पण चांगल्या स्थितीत राखलेलं हे हॉटेल आहे.रात्रीच्या गाडीच्या गोंधळामुळे व्यवस्थित जेवायला मिळालं नाही पण शुभांगी वाहिनीने दिलेल्या पावभाजीने आम्हाला तारलं होतं. आता सगळ्यांनाच कडकडून भूका लागल्या होत्या तेव्हा आम्ही सामान टाकून लगेचच नाश्ता करायला बाहेर पडलो.हॉटेल मधल्या लोकांनी ग्वालियर चे  खास  पदार्थ  मिळणारं आणि जवळच असलेलं एक हॉटेल सुचवलं. आम्ही २ रिक्षा करून तिकडे निघालो आणि बेडई आणि सब्जी वर ताव मारला. बेडई हि रवा आणि गव्हाच्या कणकेपासून बनवलेली मसालेदार पुरी असते आणि ती  बटाट्याच्या पातळ भाजी बरोबर खातात. अशी हि इथली प्रसिद्ध आणि चविष्ट नाश्त्याची डिश आणि जोडीला जिलबी होतीच. हे सगळं खाऊन आमची भूक भागायच्या ऐवजी चाळवलीच आणि या हॉटेलच्या बरोबर समोरच्या टपरी वर आम्ही पुन्हा खाण्यासाठी शिरलो. तिथे पुन्हा बेडई ,समोसा आणि  गरमागरम म्हणजे अगदी कढईतून आमच्या डिश मध्ये अशी ताजी रसभरीत जिलबी पोटभर चापली.मस्त थंडीत किती खातोय याचा आम्हाला पत्ताच नव्हता. नाश्ता करून आम्ही हॉटेल मध्ये परतलो आणि अंघोळी करून ताजेतवाने झालो. आता आज काय काय करायचे याची चर्चा झाली. जवळच सिंधिया पॅलेस असल्यामुळे तिकडे जायचं ठरलं. पॅलेस मध्ये प्रवेश केल्यावर असं कळलं कि मुख्य संग्रहालय पाहायची फी प्रत्येकी  २००/- रुपये आहे  ती जरा जास्त वाटली त्यामुळे जावं का नाही असा विचार आमच्या मनात आला त्यात पुन्हा गाईड पण घ्यावा लागणार त्याचा खर्च होताच पण शेवटी दोन्ही गोष्टींचा खर्च करायचा असा निर्णय आम्ही घेतला आणि हा निर्णय किती बरोबर होता आणि आम्ही किती सुदैवी हे आम्हाला पुढच्या २-२.३० तासात प्रत्ययाला आलं. राजेशाही ऐश्वर्य म्हणजे काय ते आम्ही अनुभवत होतो. पॅलेस मध्ये प्रवेश केल्यावर प्रथम, सिंधिया घराण्यातील सदस्यांची कालानुरूप लावलेली तैलचित्र पाहायला मिळतात. त्या नंतर पुढील दालनांमध्ये निरनिराळ्या प्रसंगानुरूप परिधान करण्याची उंची वस्त्रे,दागदागिने,वैयक्तिक वापरातील इतर वस्तू,उंची गाड्या,बग्ग्या,लहान मुलांच्या  सायकली,पालख्या,मेणे,शिसवी-सागवानी लाकडातली सुंदर कपाटे,टेबल्स, शो-पीस,शयन गृह,बाल गृह,स्विमिंग पूल,भोजन कक्ष,अगदी स्वच्छतागृह हे सुद्धा जतन केलं आहे. एकीकडे शस्त्रास्त्राचे अनेक नमुने आहेत तर दुसरीकडे अत्यंत भव्य अश्या भटारखान्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वयंपाकाचे काम कसे चालत असे हे दाखवणारी सामग्री देखील आहे. निरनिराळ्या प्रकारची भांडी,काचेच्या वस्तू,मद्यासाठी लागणारे खास प्याले,केवळ हौस म्हणून खास आणलेली आणि जपलेली भातुकलीतील भांडी,आणि या सगळ्यावर  कडी म्हणून  भल्यामोठ्या डाईनिंग टेबल वर  चालणारी  मद्य भरून ठेवलेली  काचेची  छोटी सर्विंग ट्रेन ह्या सगळ्यामधली श्रीमंती अगदी ठळकपणे दिसून येत होती. पॅलेसचा २०% भागच पर्यटकांसाठी खुला आहे आणि त्यातलं ऐश्वर्य पाहून एवढं थक्कं व्हायला होतं तर बाकी ८०% पॅलेस मध्ये काय असेल  याची  कल्पना करू शकतो आपण. राजेशाही या शब्दाची अनुभूती देणारा हा पॅलेस आहे.यातील ३.५ टनांची २ झुंबरं म्हणजे इथल्या ऐश्वर्याचा कळस आहेत.या पॅलेस ची एन्ट्री फी जरी 200 रुपये असली तरी इंग्रजी मध्ये म्हणतात तसं ''it is worth paying". इथे गाईड ने देखील आम्हाला उत्तम माहिती दिली आणि एवढ्या सगळ्या भुलभुलैय्याची सफर आम्ही केवळ गाईड घेतला म्हणूनच पूर्ण करू शकलो नाहीतर अर्धा वेळ पुढचा पुढचा मार्ग शोधण्यातच गेला  असता.   सिंदिया पॅलेस बघून आम्ही मोहम्मद घौस मकबरा किंवा तानसेनचा मकबरा बघायला पोहोचलो. नक्षीदार  काम असलेली  गुलाबी रंगाच्या सँडस्टोन पासून केलेली हि  वास्तू  म्हणजे  उत्तम आर्किटेक्चर चा नमुना आहे. मोहम्मद घौस चा मकबरा अतिप्रचंड आहे आणि तितकाच सुबक पण. याच्या भिंतींना बाहेरून चौफेर, निरनिराळी नक्षी असलेल्या जाळ्या लावल्या आहेत, या असंख्य आणि एकमेकांपासून अगदी भिन्न नक्षीकाम असलेल्या जाळ्या बनवणं म्हणजे खरोखरीच कसब आणि मोहम्मद घौस हा  अफगाणिस्तानचा  युवराज होता जो नंतर सुफी संत  म्हणून  प्रसिद्ध  झाला. यानेच बाबरला इ.स 526 मध्ये ग्वालियर चा किल्ला जिंकून घ्यायला मदत केली.  या मुहम्मद घौस च्या बाजूलाच तानसेन चा मकबरा पण आहे.म्हणताना तानसेन चा मकबरा असं म्हणत असले तरी मोहम्मद घौस चा मकबरा हीच इथली मुख्य वास्तू म्हणावी लागेल. इथेच ग्वालियरचा प्रसिद्ध तानसेन महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो.इथून आम्ही ग्वालियरच्या किल्ल्यामध्ये संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो असतो तो बघायला निघालो. तानसेन टोम्ब पासून किल्ला अगदीच जवळ आहे पण अगदीच चालत जाण्याएवढा नाही , त्यामुळे किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी आम्हाला तिथल्या ठराविक ६ सीटर रिक्षा ची रोलर कोस्टर राईड करावी लागली. जीव मुठीत धरून कडाक्याच्या थंडीत आम्ही त्या रिक्षात बसलो होतो. हिरव्या रंगाच्या लाईट ने वातावरण  निर्मिती करणारी ,अतिशय मधुर आवाजातली आणि लिहिणाऱ्याच्या प्रतिभेची उत्तम चुणूक दाखवणाऱ्या गाण्यांसह आमची रिक्षा सफर होती:). रिक्षातून उतरलो तो किल्ल्याचा अगदी बाहेरचा दरवाजा होता तिथून आत किल्ल्याची तटबंदी सुरु होत होती. तो संपूर्ण रस्ता तीव्र चढाचा होता त्यामुळे साध्या रिक्षा तिथे चढू शकत नव्हत्या त्यामुळे तिथून पुढे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पुन्हा वाहन बदलायचे होते. अनोळखी आणि काहीसा जंगलवजा वाटावा अशा त्या रस्त्याने चालत जाणं देखील शक्य नव्हतं कारण पुढे किल्ल्यावर वेळेत पोहोचायचं होतं. मग केवळ चार चाकं आहेत म्हणून त्याला ओमनि म्हणायचं अशा एका वाहनाने आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. हुडहुडी भरवणारी थंडी असली तरी किल्ल्याची भक्कम तटबंदी,किल्ल्यासमोर लाईट साउंड शो बघायला केलेली पायऱ्यांची व्यवस्था आणि पलीकडे दिव्यांनी उजळून निघालेलं ग्वालियर शहर हे सगळं सुखावणारं होतं.थंडीचा काळ असल्यामुळे ६ वाजताच काळोख झाला होता.बरोबर ६.३० वाजता शो ला सुरुवात झाली आणि अमिताभ च्या पार्श्व आवाजातील माहिती चालू झाली. ४५ मिनिटांच्या या शो मध्ये किल्ल्याचा संपूर्ण इतिहास ऐकायला मिळाला आणि अगदी त्या काळात जरी जाता आलं नसलं तरी किल्ल्यानं अनुभवलेलं वैभव आणि भोगलेल्या यातना समजत होत्या.बरोबर लाईट्स चा खेळ चालू असल्यामुळे किल्ल्याचं विहंगम दृश्य बघायला मिळत होतं.पाऊण तासाकरता आम्ही पूर्णपणे इतिहासात गेलो होतो ते पुढच्या काही क्षणात परत वर्तमानात आलो आणि परत तानसेन रेसिडेन्सी मध्ये परतलो.
 २५ डिसेंबर चा दिवस हा पूर्णपणे ग्वालियर चा किल्ला बघायला ठेवला होता. किल्ल्याचा अजस्र रूप पाहता त्याला तितका वेळ देणं आवश्यक होतं.सकाळी १०-१०.३० च्या सुमारास आम्ही एका गाईड सह किल्ल्यामध्ये प्रवेश केला आणि कलाकुसरीची आणि त्यावेळच्या ऐश्वर्याची एक एक दालनं उघडत आम्ही त्या किल्ल्यामधे शिरू लागलो. एखाद्या साम्राज्यानी किती सुबत्ता अनुभवावी याचं हा किल्ला उत्कृष्ट उदाहरण आहे. आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या तळमजल्यापर्यंत पोहोचलो.आजकाल लाईट शिवाय आपलं जीवन अवघड आहे पण वास्तुशास्त्राचा आणि नॅचरल लाईटचा उत्तम उपयोग करून तळमजल्याच्या दालनांची उत्तम योजना इथे केलेली आहे.नुसती दालनं नव्हे तर तळमजल्यावर स्विमिंग पूल देखील बांधला आहे. किल्ला म्हणजे एकप्रकारचा भुलभुलैयाच आहे. गाईड शिवाय किल्ला तुम्ही बघू शकता पण त्याच्याकडून मिळणारी माहिती किल्ला बघताना खूप उपयोगी पडते. वरील वर्णन केलेला हा किल्ल्याचा मुख्य भाग ज्याला मनमंदिर पॅलेस म्हणतात तो महाराज मानसिंग तोमर यांनी बांधला. याच मनमंदिर पॅलेस ला लागून जोहर कुंड,जहांगीर महाल,शहाजहान महाल या वास्तू बघायला मिळतात. संपूर्ण किल्ला बघायला साधारण ३ तास लागतात.

मुख्य किल्ला बघून आम्ही सास बहू मंदिर बघायला गेलो. हे साधारण ११ व्या शतकातलं विष्णूच्या पद्मनाभ रुपातलं मंदिर आहे. इ.स. १०९३ मध्ये महिपाल राजाने याची निर्मिती केली.हे मंदिर म्हणजे उत्तम कलाकुसर,वास्तुशास्त्र आणि symmetry यांचं उत्तम उदाहरण आहे. पडझड झालेल्या अवस्थेत असलं तरी हे मंदिर आजही सुबक दिसतं.या नंतर आम्ही 'तेली का मंदिर' बघायला गेलो. विष्णू शंकर मातृका यांचं हे मंदिर ८व्या-९व्या शतकात बांधलं गेलं.द्रविडी शैलीचा कळस आणि त्यावर उत्तर भारतीय पद्धतीची कलाकुसर असा सुंदर संगम असलेलं हे मंदिर आहे.डोक्यावर ऊन आणि पोटात भूक मी म्हणत होते. आम्हा सर्वानाच गुरुद्वारामध्ये येऊन लंगर मधे जेवायची खूप इच्छा होती त्यामुळे अविरत चालू असणाऱ्या त्या प्रसादरूपी लंगर कडे आम्ही निघालो.भरपेट जेवण मिळाल्यामुळे आम्ही पुन्हा ताजेतवाने झालो होतो मग बाहेरच असलेल्या चपलांच्या छोट्या दुकानात अस्सल पंजाबी जूतीची खरेदी झाली आणि आम्ही  तानसेन रेसिडेन्सी कडे परतलो. सामान सुमान यावरून आम्ही रात्री ९ वाजता ग्वालियर रेल्वे स्टेशन वर पोहोचलो. आमची १०.३० ची गाडी उशिरा येणार असं समजलं पण त्या दिवशी असलेली कडाक्याची थंडी आणि धुकं यांमुळे गाडीला यायला तब्बल ३.३० तास उशीर झाला. आमचं हॉटेल खरंतर स्टेशन जवळच होतं त्यामुळे पुन्हा हॉटेल ला जाऊन थांबणं आणि प्रत्यक्ष गाडी यायच्या वेळी पुन्हा हजर होणं हे करता आलं असतं. पण गाडी नक्की किती वाजता येणार ह्याचा नक्की अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनाही नसल्याने आम्ही स्टेशन वरच थांबणं सोयीचं होतं. सगळ्याच मार्गांवर धुक्यामुळे गाड्या उशिरा चालत होत्या त्यामुळे स्टेशन वर त्या दरम्यान सुटणाऱ्या सगळ्या गाड्यांचे प्रवासी खोळंबले होते,खूप गर्दी होती आणि वेटिंग रूम मध्येपण  बसायला जागा नव्हती. त्या कडाक्याच्या थंडीतला रेल्वे स्टेशन वर बसण्याचा अनुभव आम्हाला फार मोठा वाटला आणि मग आठवण आली ती सियाचीन मधल्या आपल्या सैनिकांची.त्या गोठवणाऱ्या थंडीत आपले सैनिक सीमेचं रक्षण करत उभे असतात त्यामुळे आम्हाला जाणवणाऱ्या त्या थंडीचा बागुलबुवा न करणंच योग्य होतं. अखेर रात्री २.१५ च्या सुमारास रेल्वे आली आणि २.३० वाजता आम्ही जबलपूर च्या दिशेने निघालो.
   २६ तारखेच्या दुपारी १२.३० वाजता आम्ही जबलपुरात पोहोचलो .२६-२७-२८ असे ३ दिवस आमचा मुक्काम जबलपूरला होता.ज्या हॉटेल मध्ये आम्ही उतरलो ते फारसं बरं नव्हतं. जबलपूरच्या थंडीत अंघोळीच्या गरम पाण्यासारखी अगदी मूलभूत सुविधा पण तिथे नीट नव्हती आणि आम्ही मागणी केल्यावरही त्यांनी त्यावर तत्परपणे  काम केला नाही,त्यामुळे जबलपूर मध्ये राहण्यासाठी कुणाला सुचवावं अस हे हॉटेल नक्कीच नव्हतं.१-१.३० तास वाट पाहून शेवटी एकदाच गरम पाणी मिळाला आणि आम्ही अंघोळी करून शेवटी ३ च्या सुमारास तयार झालो.अशक्य भूक लागली होती आणि वेळ तर इतकी ऑड झाली होती कि आता कुठल्या हॉटेल मध्ये व्यवस्थित जेवण मिळेल कि नाही अशी शंका मनात घेऊन आम्ही बाहेर पडलो,मगाशी अंघोळीसाठी ताटकळत बसलो असताना जवळ पासच्या हॉटेल ची नाव बघून ठेवली होती ,त्यातलं जे सगळ्यात जवळ दिसत होत तिकडे आम्हा  ६ जणांची वरात एका रिक्षेने निघाली. नशिबाने हॉटेल जवळच होतं आणि सुदैवाने जेवण अजून मिळवू शकत होतं.आम्ही ऑर्डर केली आणि आता किमान अर्धा तास जेवणाची वाट बघायची मनाची तयारी करून बसलो.पण खरोखरच अर्ध्या तासाच्या आतच आमच्या टेबल वर जेवण वाढलेलं होतं त्यानंतर  पुढची ५ मिनिटं तरी आम्ही कुणीच एकमेकांशी बोलत नव्हतो कारण सगळ्यांचीच हात तोंडाची गाठ होती. मग जरा पोटात गेलं आणि आम्ही तरतरीत झालो.मग जेवण आटोपून मघई पान खात पुढचा बेत आखला गेला. जवळपासचा एखादा स्पॉट बघून यायचा असं ठरलं. उदय फारच दमला होता त्यामुळे तो परत आमच्या लॉज वर जाऊन झोपणार होता आणि मग थोड्या वेळाने आम्हाला आम्ही असू तिथे जॉईन होणार होता. आम्ही ठरवलं होता ते ठिकाण मॅप्स वर जरी जवळ दिसत असला तरी तिथे पोहोचायला सरळ रस्ता नव्हता त्यामुळे रिक्षा वाले काहींच्या काही भाडे सांगू लागले अखेर प्रीती ने तिचा जबलपूर ठसका दाखवला आणि आम्ही पण फार ताणून नको धरायला असं ठरवलं आणि एक रिक्षा मिळून आमचा प्रवास सुरु झाला तो “पिसनहारी कि मदिया” कडे. हे ठिकाण जैन लोकांचं दैवत असलेले भगवान महावीर आणि त्या परंपरेतील अन्य तीर्थांकरांचं. एका महिलेने लोकांचं दळण दळून येणाऱ्या पैशातून हे मंदिर उभं केलं असा या मंदिराचा इतिहास आहे म्हणून या ठिकाणाला या अनोख्या नावावरून संबोधतात. एका छोट्याश्या टेकडीवजा उंचवट्यावर वेगवेगळ्या स्तरावर तीर्थांकरांच्या मूर्ती आहेत. इथवर जायची वाट फुलझाडांनी आणि हिरव्यागार शोभेच्या झुडुपांनी सुशोभित केलेली आहे. मंदिरात सर्वत्र स्वच्छता आणि शांतता होती. उंचावरून जबलपूर शहराचं आणि मावळत्या सूर्याचं दर्शन घेत आम्ही खाली उतरलो आणि परतीच्या वाटेकडे वळलो. इथवर येताना तरी आम्हाला रिक्षा मिळाली पण जाताना अंधार झाला असल्याने आणि फिरून जायचे असल्याने रिक्षावाले एकतर यायलाच तयार नव्हते किंवा काहींच्या काही भाडे सांगत होते त्यामुळे आम्ही चक्क जबलपूरच्या स्थानिक बस ने जायचा निर्णय घेतला आणि आमच्या वाटेकडे जाणारी समोर आलेली पहिली बस पटकन पकडली. या बस प्रवासाने आम्हाला एक विलक्षण आणि कधी विसरूच शकणार नाही असा अनुभव दिला. सामान्य प्रवासी किंवा एखादा मजूर वाटावा असा वेष असलेला तिचा कंडक्टर होता आणि जणू हि बस नसून एखादी छोटी चारचाकी असावी अशा थाटात गाडी चालवणारा तिचा ड्राइवर होता आणि ही एकमेव बसच आता रेल्वे स्टेशन कडे जायला उरली आहे असा समज व्हावा एवढी माणसं(यात आम्ही पण होतो)यात भरली होती. अखेर १ तासाच्या या अविस्मरणीय प्रवासानंतर आम्ही हॉटेल ला परत सुखरूप वन पीस शिल्लक राहून पोहोचलो.
   २७ डिसेम्बर ला संपूर्ण दिवस धुवाधार फॉल आणि भेडाघाट बघण्यात गेला. धुवाधारचं रूप तेव्हा धुवाधार नसलं तरी त्याचं वेगाने कोसळणारं फेसाळतं पाणी रौद्र रूपीच होतं आणि हेच रौद्र रूपी पाणी नंतर कमालीचं शांत होऊन दुतर्फा असलेल्या संगमरवरी टेकड्यांमधून वाहतं. संगमरवरी दगडाच्या वेगवेगळे रंगछटा आणि त्या संथ पाण्यावरून जाताना नावाड्यांची चाललेली running commentry  असा मस्त अनुभव आम्ही भेडाघाटला घेतला.

२८ डिसेम्बर चा दिवस जबलपूरचा फेरफटका आणि थोडी खरेदी यासाठीच राखीव होता तशी ती झाली. महू प्रमाणेच जबलपूर ला देखील कापड स्वस्त आहे,तेव्हा या संधीचा फायदा घेऊन आम्ही पुन्हा एकदा फुवारा भागात झब्ब्याची कापडं,सलवार कमीज ची कापडं,शर्ट पीस, संगमरवराच्या बारीक सारीक वस्तू अशी खरेदी केली आणि घरच्या सगळ्या मंडळींना काहींना काही भेटवस्तू घेण्याचा आमचा मानस पूर्ण केला. खरेदीच्या नादात आपण किती चालतो याचं भानच राहत नाही आणि मग खरेदी संपली कि ते कळू लागतं,तसंच आमचं झालं ,दमणूक आणि भूक या दोन्हीची तीव्र जाणीव आता व्हायला लागली होती. सुदैवाने कॉफी हाऊस जवळ होतं आणि तिथलं जेवण चांगलं असतं असं उदय ला ठाऊक होतं त्यामुळे आम्ही लगेच आत शिरलो. गर्दी पुष्कळ होती त्यामुळे आमचं जेवण यायला बराच वेळ लागला त्यामुळे अगदी काकुळतीला आलो होतो आणि शिवाय आमची गाडी त्याच रात्रीची असल्याने वेळेत पोहोचायचं पण होतं. जेवण आलं आणि आम्ही जे काही आधी येईल त्यावर तुटून पडलो. जेवण आटोपून पुन्हा एकदा शेअर रिक्षा पकडली आणि हॉटेल ला पोहोचलो. फ्रेश झालो आणि नव्याने केलेल्या खरेदीची आधीच तुडुंब भरलेल्या बॅगांमध्ये थोडी कोंबाकोंब झाली..२८ च्या संध्याकाळी आम्ही जबलपूर मुंबई गरीबरथ या गाडीने करणार होतो. या गाडीची आजवर आम्हाला असलेली माहिती अशी होती कि गरिबरथ हि गाडी कमी तिकीटात सामान्यांना ए सी ने प्रवास करता यावा म्हणून चालणारी गाडी आहे पण त्यात बसण्याचा योग मात्र हा पहिलाच होता. गाडी तशी बरी होती म्हणजे साधारण थर्ड ए सी च्या भाड्यात आम्हाला या गाडीत तिकीट मिळालं होतं पण त्याच बरोबर थर्ड ए.सी पेक्षा एक वेगळी गोष्ट म्हणजे त्या गाडीत साईड बर्थ पण ३-३ होते आणि ती फारच मोठी अडचण होती कारण आमच्या २ सीट्स तिथे आल्या होत्या.साईड बेरीज असल्याने मुळात लांबी आणि रुंदी दोन्हीही कमीच असलेल्या त्या सीट्स एकावर एक ३ असल्याने उंची पण कमी होती. आम्हा सगळ्यांचीच थोडी चिडचिड झाली. शेवटी आमच्या त्या सीट्स आम्हाला गैरसोयीच्या पण आमच्या एका सहप्रवासीला सोयीच्या असं समीकरण जुळलं आणि आम्हाला त्या सीट्स पैकी १ सीट बदलून मिळाली आणि जरा तरी बरी सोय झाली. प्रश्न तसा जास्त रात्री झोपण्यापुरताच होता आणि तो बऱ्यापैकी सुटला.सकाळ झाल्यावर वेध लागले ते मुंबई येण्याचे. जग फिरून आलात तरी सुद्धा शेवट ओढ लागते ती आपल्या घराची, आमचंही असंच  झालं होतं आणि शेवटी २९ ला दुपारी १२ च्या सुमारास मुंबई दिसायला लागली तसं मनात गारगार आणि बाहेरून मात्र गरम गरम व्हायला लागलं कारण मध्यप्रदेशातली थंडी आणि नंतर ए.सी गाडीमुळे आम्ही सगळे स्वेटर्स घालूनच होतो ते आता मुंबई मध्ये आल्यावर नकोसे झाले बॅग्स मध्ये तर जागा नव्हती त्यामुळे हातावरच स्वेटर्स वागवत आम्ही गाडीतून बाहेर पडलो,तसं प्रत्येक मुंबईकर जाडी जॅकेट्स आणि स्वेटर्स घेऊन फिरणाऱ्या आमच्या कडेच पाहतोय कि काय असं वाटत होतं. स्टेशन बाहेर आलो तेव्हा भूक तर लागलीच होती पण अंघोळ नसल्याने आणि आता आम्ही "कायम उकाडा हाच मुख्य ऋतू" असणाऱ्या मुंबईत असल्याने, किमान हातपाय धुवून स्वच्छ होणं अत्यावश्यक होतं. गाडी CST ला न गेल्याने “कॅनन पावभाजी” चा बेत तर बारगळलाच होता त्यामुळे आता जरा चांगल्या हॉटेल मध्ये जायचं ठरलं,तेव्हा तिथे जवळच असलेल्या हॉटेल प्रीतम मध्ये आम्ही गेलो.तिथे आमचं भरपूर सामान रिसेपन काउंटर वर सुरक्षित ठेवण्याची सोय झाली. सगळ्यात आधी आम्ही २-२ जण फ्रेश झालो,बाकीच्यांनी तोवर ऑर्डर दिली. हॉटेल छान होतं वातावरण निर्मिती मस्त होती, गझल गायक जगजीत सिंग इथे बरेचदा येत असत असं कळलं,जेवण आल्यावर पुन्हा पुढची ५ मिनिट्स सगळेजण गप्प होते कारण गाठ हातातोंडाची होती. मगाशी मेनूकार्ड बघून ऑर्डर देताना आमच्या भुवया जरा उंचावल्या होत्या कारण ते हॉटेल तसं जरा उंची प्रकरणच असल्याने किमती पण तशाच होत्या,पण आता आम्ही आत येऊन बराच वेळ झाला होता आम्ही आवरून सावरून बसलो होतो आणि आता पुन्हा एखादं साधंसं हॉटेल शोधण्याइतपत त्राण कुणातच नव्हता,त्यामुळे त्या किमती बघता फार व्हरायटी न मागवता पोट भरेल असं साधंच पंजाबी भाजी आणि रोटीचं जेवण मागवायचं ठरलं.त्याप्रमाणे आलेलं हे जेवण आम्हाला पुरलं आणि चव पण चांगली होती.आता पुणं गाठायला शिवनेरी पकडायची होती,सुदैवाने शिवनेरी चा थांबा जवळच होता. जेवण आटोपून आम्ही सामानाची मोजणी करून त्या बस स्टॉप कडे गेलो,तिकिटं लगेच पुढच्याच गाडीची मिळाली.आम्ही आरामात गाडीत जाऊन बसलो आणि गाडी सुटली. या ट्रिप चा शेवटचा म्हणजेच पुणं-मुंबई दरम्यान चा प्रवास आम्ही करत होतो,गाडीत बसल्यावर बहुदा आम्हा सगळ्यांनाच झोपा लागल्या आणि साधारण पुण्याच्या जवळ आल्यावरच जागे झालो. ओळखीच्या इमारती दिसायला लागल्या,रोजचं काम आठवायला लागलं नशिबाने शनिवार असल्याने अगदी उद्यापासूनच कामावर जायचं नाहीये एवढा दिलासा होता.वनाज स्टॉप ला उतरून आम्ही रिक्षा केल्या आणि आपापल्या घराकडे निघालो ट्रिप च्या सुंदर आठवणींना जिवंत करायला अर्थात फोटो बघायला कधी भेटायचं ते ठरवून पण मनात मात्र संपूर्ण सहलीतल्या आठवणींचा चलचित्रपट कधीच सुरु झाला होता…