Monday, December 27, 2010

इर्शाळगड

पावसाळ्यानंतर खरतरं बाहेर पडणे झालेच नव्हते. शेवटी एकदाचा तो मुर्हूत सापडला. कुठे जायचा हा प्रश्ण पडल्या क्षणी अनेक पर्याय समोर आले. पण सर्वानुमते इर्शाळगडाची मोहीम निच्शित झाली.
पुण्याहून ५ जणं ( चैतन्य, प्रणव, अनिरुध्द, मेधा आणि आशिष) आणि ठाण्याहून अमोघ असे ६ जणं, जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरच्या चौक फाट्यावर भेटलो. चौक फाटा खोपोली पासून १० कि.मी वर आहे. चौक फाट्याच्या उजव्या हाताला ( पुण्याकडून मुंबई ला जाताना) मोरवे धरण दिसते. मोरवे धरणाच्या भिंतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून साधारण २ कि.मी आत ठाकूरवाडी गाव आहे. ठाकूरवाडीत गाडी लावली. समोरच खोगीराच्या आकारासारख्या दिसणाऱ्या इर्शाळचे दर्शन झाले. गावातूनचं इर्शाळवाडी कडे जाणारी मळलेली वाट पकडली. साधारण १ तासाने माचीवर असलेल्या इर्शाळवाडीत पोहोचलो. वाडीतून गडावर जायला व्यवस्थित मळलेली वाट आहे. १० मिनीटे चालल्यावर दोन वाटा फुटतात. येथे खाली जाणाऱ्या वाटेवर फूली मारलेली आहे. तीथेचं वर जाणारी एक वाट आहे. ती पकडली आणि गडावर पोहोचलो. गडाला ३ शिखरं आहेत.

त्यांना उजवीकडे ठेवून जाणारी वाट पकडली. ही वाट थेट नेढ्याकडे जाते. वर चढतानाचं एक खोदीव पाण्याचे टाकेही लागते. पाणी उत्तम आहे. याच टाक्याजवळ वर जायला एक छोटी लाकडी शिडी आहे. त्यावरून गेल्यावर एक सोपा रॉक पॅच लागतो.

तो पार केल्यावर थेट नेढ्यात पोहोचलो.
नेढ्यात पोहोचायला इर्शाळवाडीतून ४५ मिनीटे लागतात. नेढे पार करून थोडे पुढे गेल्यावर एक कातळभिंत लागते. यावर चढायला रॉक क्लायंबिंगची साधने लागतात. ती नसल्यामुळे याच कडय़ामधे असलेल्या टाक्यावर गेलो. इर्शाळ्गडावरून चंदेरी- म्हैसमाळ, प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा, माथेरान दिसतात.

Saturday, November 20, 2010

खादयभ्रमण

आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण ट्रेकिंगच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागु होत नसली तरी किल्लोबा नंतर पोटोबाला नक्कीच स्थान आहे. एका दिवसाच्या ट्रेकला हे एवढं जाणवत नसलं तरी २-३ दिवसांच्या ट्रेकदरम्यान जेवणाला, खास करुन रात्रीच्या जेवणाला, महत्व दयावंच लागतं. जर रात्रीचं जेवण व्यवस्थित झालं तर दुसऱ्या दिवशीची चढाई अथवा फिरणं अधिक उत्साहाने होऊ शकतं. त्यामुळेच आमच्या ट्रेक्समध्ये रात्रीचं जेवण अगदी साग्रसंगीत बनवलं जातं.

ट्रेकदरम्यान सर्वांनी मिळुन जेवण बनविण्याची मजा काही औरच असते. ट्रेकला निघताना नवीन गाव, नवीन प्रदेश, नवीन किल्ला, त्याची चढाई, किल्ल्यावरील महत्वाची ऐतिहासिक ठिकाणं याबद्दल जेवढं आकर्षण असतं तेवढंच आकर्षण तिथे बनवणार असलेल्या जेवणाचं असतं. हे जेवण बनतं किल्ल्यावरील एखादया गुहेत अथवा देवळात. पिण्याच्या पाण्याचं टाकं सहसा जवळच असतं. पण काही किल्ल्यांवर (जसे की रांगणागड वा रतनगड) पाण्यासाठी जरा चालावं लागतं. अशा ठिकाणी रात्रीच्या अंधारात टॉर्च घेऊन बाटल्या भरून पाणी आणलं जातं. स्टोव्ह पेटवला जातो. आज २१व्या शतकातही आम्ही ब्रिटीशांच्या काळातील स्टोव्हच ट्रेकसाठी वापरतो. त्या स्टोव्हवर सुप उकळायला ठेवलं जातं. ते बनेपर्यंत सगळेजण मिळुन भाज्या चिरतात. मधल्या काळात सुप बनलेलं असतं. मग ह्या भाज्या घातलेला पुलाव शिजेपर्यंत सुप फुंकर आणि भुरके मारत पिलं जातं. बाहेर कोणीतरी शेकोटी पेटवलेली असते. त्यात कांदे-बटाटे भाजले जातात. जेवण बनल्यावर सगळेजण गोल करुन बसतात. गरमागरम भाजी अथवा पुलाव, तयार आणलेल्या पोळ्या, आम्रखंड, भाजलेले कांदे-बटाटे, एखादी चटणी याने ताट भरुन जातं. त्यावर लगेचच हल्ला चढवला जातो आणि १०-१५ मिनिटांत सगळं जेवण फस्त केलं जातं. मेणबत्तीच्या उजेडात चालणारा हा सगळा कार्यक्रम म्हणजे आमचं  Candle Light Dinner असतं. त्यासोबत चालणाऱ्या गप्पा, जुने किस्से, अनुभव, एकमेकांची केली जाणारी थट्टा या कार्यक्रमात अजुनच मजा आणतात. त्यामुळे किल्ल्याबरोबरच तिथे बनलेलं जेवणही तेवढंच लक्षात रहातं. मग तो मदनगडावरील पुलाव असो, नळदुर्गाबाहेरील एका झोपडीत बनवलेला उपमा असो किंवा दाजीपुर-गगनबावडा दरम्यानच्या जंगलात रात्री केलेली खिचडी असो.

अश्या ह्या खादयभ्रमणाच्या फोटोजचा एक छोटासा व्हिडिओ बनवलाय. तेव्हा आता "वदनि कवळ घेता" म्हणा आणि ह्या खादयभ्रमणाचा आस्वाद घ्या.

Monday, October 25, 2010

ग्रेट स्मोकी माऊंटन्स पार्क

पुर्व आणि मध्य अमेरिकेच्या राज्यांमध्ये विंटर सिझनचा बर्फ सुरु होण्याआधी झाडांची पाने गळुन जातात. समर संपताना हिरवीगार असणारी पाने हळुहळु रंग बदलु लागतात. पिवळा, केशरी, गुलाबी, लाल, चॉकलेटी असे विविध रंग घेत ही पाने अखेर गळुन पडतात. ह्या सिझनला Fall अथवा Autumn असे म्हणतात. सप्टेंबरच्या अखेरीस सुरु होऊन हा सिझन नोव्हेंबरच्या सुरुवातीला संपतो. ह्या एक-दिड महिन्यांत होणारी ही रंगांची उधळण अतिशय सुंदर आणि प्रेक्षणिय अशी असते. अमेरिकेत भरपुर वृक्षसंपदा असल्यामुळे छोट्यातल्या छोट्या गावापासुन मोठयातल्या मोठया शहरापर्यंत हे Fall Colours पहाता येतात. पण तरीही काही ठिकाणे या Fall Colours साठी खास प्रसिद्ध आहेत जशी की New Hampshire, Vermont ही राज्ये आणि Smoky Mountains ही पर्वतरांग.

२००६ मध्ये New Hampshire चे अद्भुत Fall Colours पाहिले होते आणि २००७ मध्ये थोडया प्रमाणात Ohio  राज्यामधले रंग बघितले होते. ह्या वेळच्या अमेरिकावारीत माझा स्मोकी माऊंटन्स मध्ये जाण्याचा योग जुळुन आला. त्याबद्दल लिहायचा हा प्रयत्न.

स्मोकी माऊंटन्स विषयी थोडंसं:
Appalachian Mountain Range ही पुर्व अमेरिकेतील एक महत्वाची पर्वतरांग. उत्तरेकडील कॅनडाला लागुन असलेल्या Maine ह्या राज्यात सुरु झालेली ही पर्वतरांग दक्षिणेकडील Georgia ह्या राज्यात संपते. २१०० मैल एवढा प्रचंड विस्तार आहे हिचा. स्मोकी माऊंटन्स ही ह्याच अ‍ॅपलेशियन रांगेतील एक उपरांग म्हणता येईल. स्मोकी माऊंटन्सचा बराचसा भाग Tennessee राज्यात येतो तर काही भाग North Carolina ह्या राज्यात येतो. पावसानंतर ह्या डोंगररांगेत धुकं पसरतं ज्याला निळसर रंगाची झाक असते. त्यामुळे या परिसराला स्मोकी माऊंटन्स असं म्हटलं जातं. १९३४ साली याला नॅशनल पार्कचा दर्जा देण्यात आला. आज हे अमेरिकेतील सगळ्यात जास्ती गर्दी खेचणारे नॅशनल पार्क बनले आहे. दरवर्षी जवळपास ९० लाख लोक इथे भेट देतात.

माझ्यापासुन ही जागा अगदी जवळ म्हणजे ६ तासांवर असल्याने ह्या वर्षीचा फॉल बघण्यासाठी इथे जाण्याचा बेत बनत होता. बाकी सर्व मित्रांची स्मोकीवारी झालेली असल्याने मी आणि आशिष असे दोघंच जाणार होतो. ११ ऑक्टोबरला, म्हणजे सोमवारी, कोलंबस डे निमित्त ऑफिसला सुट्टी होती. लॉंग विकेण्ड असल्याने जाण्याचा बेत निश्चित करण्यात आला. इंटरनेट वरुन सगळी माहिती जमविली, कार रेंट केली, हॉटेल बुक केलं आणि ९ ऑक्टोबरला सकाळी निघायचं ठरलं.


दिवस पहिला - शनिवार, ९ ऑक्टोबर २०१०
पहाटे ५.१५ ला घरुन निघालो. GPS मध्ये हॉटेलचा address feed केला आणि त्याच्या सुचनेनुसार प्रवास सुरु केला. सकाळी ८.०० च्या दरम्याने केंटकी राज्यात एक एक्झिट घेऊन कॉफी घेतली आणि प्रवास पुन्हा सुरु केला. आता गाडीचं चक्र माझ्या हाती होतं. डोंगर फोडुन काढलेला रस्ता, त्यावर अगदी मोजकीच वाहने, वाटेत लागणाऱ्या अनेक नद्या, मध्येच येणारं दाट धुकं, हळुहळु रंग बदलायला लागलेले डोंगर हे सगळं बघताना कधी टेनेसी राज्यात शिरलो ते कळलंच नाही. दुपारी ११.३० वाजता ३२५ मैलांचा प्रवास करुन Pigeon Forge ह्या गावात शिरलो.
हे स्मोकी माउंटन्स जवळच्या मैदानी प्रदेशात वसलेलं एक सुंदर गाव आहे. पट्टीने आखल्यासारखा गावामधुन जाणारा सरळ रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा असलेली असंख्य हॉटेल्स व रेस्टॉरंट्स आणि मागे पसरलेली प्रचंड पर्वतरांग अशी एखाद्या चित्रासारखी याची रचना आहे. River Place Inn नावाच्या हॉटेलचं आमचं बुकिंग होतं. गाडी सरळ हॉटेलवर नेली आणि एकदा बुकिंग निश्चित असल्याची खात्री केली. काउंटरवरील बाई भारतीयच होती. दुपारी ३.०० वाजता चेक-इन असल्याचं तिनं सांगितलं. ३.०० वाजायला बराच वेळ असल्याने तोपर्यंत जवळचा एखादा स्पॉट बघायचा असं ठरवलं. पार्कचा मॅप पाहिला आणि जवळच असणाऱ्या Cades Cove च्या दिशेने निघालो. दिशादर्शनाच्या मदतीस GPS होताच.

गावाबाहेर पडल्याबरोबर लगेच डोंगर सुरु झाले. इथे अजुनही फॉल सुरु नव्हता झालेला. सगळे डोंगर हिरवे होते. वाटेत एका नदीवर फोटो काढुन अर्ध्या तासात Cades Cove ला पोचलो. गर्द झाडी, त्यातुन जाणारा लुप रोडचा scenic drive, वाटेत अनेक ट्रेल्स आणि ह्या परिसरातील पहिली वसाहत असल्याचे ऐतिहासिक महत्व या कारणांमुळे अनेक पर्यटक इथे भेट देतात.

 
Cades Cove कडे जाणारा रस्ता


वाटेत एका ट्रेलची पाटी पाहुन आम्ही थांबलो. १ मैलाचा छोटा ट्रेल आणि हाताशी भरपुर वेळ म्हणुन गाडी पार्क केली आणि ट्रेलच्या मार्गावर चालायला सुरुवात केली. थोडं चालल्यावर अजुन एका ट्रेलची पाटी दिसली. तो ट्रेल ३.६ मैलांचा होता. शक्यतो हे लुप ट्रेल्स असतात. जिथुन सुरु होतात तिथेच येऊन संपतात. हा ट्रेलही तसाच असेल अश्या समजुतीने हा मोठा ट्रेल सुरु केला. वाटेत लागणाऱ्या डोंगरांवर बरेच ओक वॄक्ष होते. फॉल सुरु असल्यामुळे त्यांची फळे (ज्यांना acorn म्हणतात) खाली पडत होती. ट्रेलच्या त्या पायवाटेवर आम्ही दोघं सोडता कोणीही नव्हतं. त्यात ह्या फळांच्या पडतानाच्या आवाजाने भयाण वाटत होतं. अनेक डोंगर आणि झरे पार करत ३ तासांनंतर शेवटी एकदाचा डांबरी रस्ता दिसला आणि ट्रेल संपल्याचा आनंद झाला.


ट्रेलच्या वाटेतील जंगल

रस्त्यावर आलो आणि असं लक्षात आलं की आम्ही भलतीकडेच बाहेर आलोय. आमची गाडी बरीच मागे राहिली होती. ट्रेलच्या वाटेने परत उलटं जाण्यापेक्षा रस्त्यावरुनच चालत जायला सुरुवात केली. बराच वेळ चालल्यानंतरही गाडी पार्क केलेली जागा काही दिसत नव्हती. आम्ही बरोबर दिशेने चाललोय का अशी शंका यायला लागली. तेवढ्यात एक आजी-आजोबा दिसले जे त्यांचं सामान गाडीत भरुन निघायच्या तयारीत होते. त्यांच्याकडे असलेल्या मॅपवरुन आम्ही चालत असलेली दिशा बरोबर असल्याचं कळलं. पण अजुन किती चालणं शिल्लक आहे हे लक्षात येईना. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्यांनीही ती दिली आणि आम्ही त्यांच्या गाडीतुन निघालो. सुरक्षिततेच्या दॄष्टिने इथे एकतर कोणी लिफ्ट मागत नाही, आणि मागितली तरी कोणी देत नाही. त्यामुळे आम्हाला आजी-आजोबांचं कौतुक वाटलं. आजी गाडी चालवत होत्या. आम्ही काही खाल्लं आहे का याची आजींनी आवर्जुन चौकशी केली. पाच मिनिटांतच आम्ही आमच्या गाडीपाशी पोचलो. आजी-आजोबांना धन्यवाद देऊन आम्ही परत पिजन फोर्जच्या दिशेने निघालो.

एव्हाना संध्याकाळचे ५.०० वाजले होते. सरळ हॉटेल गाठलं. आम्ही साधी रुम बुक केली होती. पण आमच्या इंडियन हॉटेलवालीने एक मोठी शाही रुम आम्हाला अपग्रेड म्हणुन दिली, आणि तीही तेवढ्याच पैशात. रुम ताब्यात घेऊन पटकन फ्रेश झालो. Cades Cove ला झालेल्या तंगडतोडीत दुपारचं जेवण झालं नव्हतं. त्यामुळे भुकेने पोटातल्या कावळ्यांचे हत्ती झाले होते. जवळच्याच एका IHOP मध्ये शिरलो. इथले पॅनकेक्स मला खुप आवडतात. नेमकी तेव्हा त्यांच्याकडे एक ऑफर सुरु होती ज्यात एका रेग्युलर डिशबरोबर अनलिमिटेड पॅनकेक्स मिळत होते. मग काय, प्रत्येकी ४ पोर्क सॉसेजेस, हॅशब्राऊन्स, स्क्रॅंबल्ड एग्ज आणि ७ पॅनकेक्स गिळंकॄत करुन परत हॉटेलवर आलो. ह्या खाण्यावरुन मुल्हेर-मोरा उतरुन सटाण्याजवळच्या सैनिक ढाब्यावर केलेल्या राक्षसी जेवणाची आठवण झाली. चालण्याची नसलेली सवय आणि प्रचंड चापलेले पॅनकेक्स यामुळे आशिष हॉटेलवर लगेच झोपी गेला.

बाहेर पायी फिरणाऱ्यांची खुप गर्दी दिसत होती. त्यामुळे मला हॉटेलवर रहावेना. मी मग एकटाच पायी भटकायला बाहेर पडलो. पिजन फोर्ज मधला मुख्य रस्ता एकदम गजबजुन गेला होता. रस्त्याच्या मानाने त्यावर खुपच गाडया होत्या. त्या सर्व मुंगीच्या वेगाने आणि मुंगीसारख्याच शिस्तीत जात होत्या. फुटपाथवर फिरणाऱ्यांची गर्दी होती. गिफ्टशॉप्समध्ये सोविनीयर घेणाऱ्यांची गजबज दिसत होती. प्रत्येक हॉटेलबाहेर हॅलोवीनसाठी केलेली सजावट आणि छानशी विद्युत रोषणाई दिवाळीसारखी भासत होती. बऱ्याच ठिकाणी गेमिंग आर्केड्स मध्ये गो-कार्टींग, मिनी गोल्फ, थ्रिलींग राईड्स सुरु होत्या. अनेक थिएटर्समध्ये Live Shows सुरु होते. एकीकडे रस्त्याशेजारीच मोठी टायटॅनिक बोट ठेवली होती आणि त्यात एक प्रदर्शन सुरु होतं. ही बोट खऱ्या टायटॅनिक सारखीच बनवलेली आहे. तशीच मेन लॉबी, डायनिंग एरिया, केबिन्स, स्टेअरकेस आणि तसाच "I am king of the world" वाला डेक. इथल्या प्रदर्शनात खऱ्या टायटॅनिकमध्ये मिळालेल्या अनेक वस्तुही ठेवलेल्या आहेत. ह्या बोटीजवळच वंडरलॅंड नावाची एक बिल्डींग आहे. तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती बिल्डींग उलटी आहे, छप्पर खाली आणि पाया वर. अश्या विविध प्रकारच्या गोष्टींनी रस्ता अगदी गजबजुन गेला होता. हे सगळं बघताना ९.०० कधी वाजले ते कळलंच नाही. परत मागे फिरलो आणि हॉटेलवर आलो. संध्याकाळचं खाणं खुप झालं असल्यामुळे रात्री न जेवता आम्ही तसेच झोपी गेलो.


पिजन फोर्जमधील वंडरलॅंड बिल्डींग


दिवस दुसरा - रविवार, १० ऑक्टोबर २०१०
सकाळी ७.०० लाच बाहेर पडलो आणि गॅटलिनबर्ग गाव बायपास करुन सरळ स्मोकी माऊंटन्स पार्कमध्ये शिरलो. नुकतं उजाडत होतं. अजुन लोक फिरायला बाहेर पडले नसल्याने रस्त्यावर अगदी सामसुम होती. पार्कमध्ये फॉलला सुरुवात झाली होती. जवळपास सगळ्या झाडांची पाने पिवळी झाली होती.
आजचा आमचा पहिला टप्पा होता, Chimney Tops Trail. हा ट्रेल स्मोकीजमधे खुप लोकप्रिय आहे. २ मैलांचा असलेला हा ट्रेल बराच दमवणारा आहे. ट्रेल जिथे सुरु होतो तिथे गाडी लावली आणि बरोब्बर ८.०० वाजता चालायला सुरुवात केली. पायवाट आधी जरा दरीत उतरते, आणि एक छोटी नदी ओलांडुन पलिकडच्या डोंगरावर चढु लागते. हा सुरु होणारा चढ डोंगरमाथ्यावर जिथे ट्रेल संपतो तिथेच संपतो.

ट्रेलमध्ये लागलेली नदी


 
नदी ओलांडण्यासाठी असलेला लाकडी पुल


९.३० ला आम्ही मुख्य सुळक्याखाली पोचलो. हा सुळका पार करण्यासाठी ५० फुटांचा रॉकपॅच आहे. पॅचला एक्सपोजर बरेच आहे, पण भरपुर होल्ड्स असल्याने तो पार करणं अवघड नाही. आशिषला मधले काही होल्ड्स न जमल्याने तो खालीच थांबला. मी एकटाच वर गेलो.
वरुन दिसणारं दॄष्य अवर्णनिय होतं. कळसावर जाणवणारी सकाळची थंड हवा, सभोवताली पसरलेली शुगरलॅंड व्हॅली, हळुहळु रंग बदलु लागलेले डोंगर, उशीरा उजाडत असल्याने १०.०० वाजताही एकदम कोवळी असणारी किरणे आणि सभोवताली पसरलेली प्रचंड शांतता. हे सगळं बघुन एकदम मला मदनगडावरील सुर्योदय आठवला. हे सर्व अनुभवायला वरती मी आणि अजुन ३ जणांची एक गोरी फॅमिली असे आम्ही चौघच होतो. तेवढ्यात आशिषला वर यायची दुसरी सोपी वाट सापडली आणि तोही वर आला. वरती बरेच फोटो काढुन पोटपुजा केली आणि ह्या दुसऱ्या वाटेने खाली उतरुन परतीच्या वाटेला लागलो.माथ्यावर जाण्यासाठी पार करावा लागणारा रॉकपॅचमाथ्यावरुन दिसणारी शुगरलॅंड व्हॅली

वर येणारे बरेच लोक आता वाटेत दिसत होते. "भैया, और कितना है?" विचारणारे (अर्थात इंग्रजीतुन) एक सरदार दांपत्यही वाटेत भेटले. ११.०० वाजता आम्ही परत गाडीपाशी आलो आणि पुढे निघालो.
१५ मिनिटांतच Newfound Gap इथे पोचलो. टेनेसी आणि नॉर्थ कॅरोलीना या राज्यांच्या सीमेवरील ही एक खिंड आहे. ३५०० किमी लांबीचा अ‍ॅपलेशियन ट्रेल ह्या खिंडीतुन जातो.न्युफाऊंड गॅपमधील रॉकफेलर मेमोरियल

जरा वेळ तिथे थांबुन जवळच असणाऱ्या Clingmans Dome कडे निघालो. Clingmans Dome हा टेनेसी राज्यातील सर्वात उंच डोंगर. इथे पोचण्यासाठी अर्धा मैल चालावं लागतं. डोंगरावर एक observation tower आहे. येथुन बऱ्याच दुरवरील परिसर न्याहाळता येतो. असं म्हणतात की चांगली दॄष्यता असल्यास येथुन १०० मैलांवरील आणि ७ राज्यांतील परिसर दिसु शकतो. टॉवरवर जाण्यासाठी गोलाकार बांधीव मार्ग आहे. वरती बरीच गर्दी होती. प्रत्येकजण फोटो काढण्यात मग्न होता. आम्हीही काही फोटो काढले आणि खाली आलो.


Clingman's Dome Observation Tower


आमचा पुढचा टप्पा होता नॉर्थ कॅरोलिना राज्यातील शेरोकी (Cherokee) गाव. हे गाव स्मोकी डोंगररांगेच्या बाहेर आणि बरेच खाली आहे. इथे जाणारा रस्ता अतिशय सिनीक असा होता. पुर्ण रस्ता वळणं घेत डोंगर उतरणारा होता. एका बाजुने वाहणारी नदी, वाटेत घनदाट जंगले आणि वेगवेगळ्या रंगाचे उंच वृक्ष. २० मैलांचा हा प्रवास कधीही संपु नये असं वाटणारा होता.

 
शेरोकीला जाणारा रस्ता


दुपारी २.०० वाजता आम्ही शेरोकीला पोचलो. हे एक फारच छोटं पण अतिशय सुंदर गाव आहे. शेकडो वर्षांपासुन ह्या परिसरात राहणाऱ्या शेरोकी ह्या रेड इंडियन जमातीवरुन गावाला हे नाव पडलं. अजुनही हे लोक इथे रहातात. इथल्या रस्त्यांची नावे इंग्रजीबरोबरच शेरोकी भाषेतही आहेत. भुक खुप लागलेली असल्याने सरळ आम्ही एका हॉटेलमध्ये शिरलो. हे एक अमेरिकन हॉटेल होतं. आम्ही इथे बफे घेतला. चिकन, उकडलेले बटाटे, भज्यांसद्रूश एक पदार्थ, बीन्स, पास्ता, भरपुर सॅलड, विविध प्रकारचे सॉसेस आणि नावे माहीत नसलेले व वर्णन न करता येण्याजोगे अनेक पदार्थ खाल्ले. हे सगळं कमी की काय म्हणुन डेझर्टमध्ये केक, डार्क केशरी आणि हिरव्या रंगाची जेली चापली. साहजिकच जेवण अति झालं असल्याने शतपावली घालण्याच्या उद्देशाने जवळच्याच एका गिफ्टशॉपमध्ये शिरलो. स्थानिक जमातीने बनवलेल्या काही वस्तुंची खरेदी करुन बाहेर पडलो आणि शेरोकी गावातच असलेल्या Oconaluftee Indian Village मध्ये गेलो. शेकडो वर्षांपुर्वीच्या जमातीच्या खेडयासारखेच हे खेडे वसविले आहे. गर्द झाडी, मधुन वाहणारे झरे, छोट्या पायवाटा, बसकी लाकडाची घरे, छोटा तलाव व बाग आणि पारंपारिक लोककला सादर करणारे शेरोकी लोक आपल्याला त्या काळात घेऊन जातात. स्मोकीला येणारे फार कमी लोक इथे येतात. पण अगदी आवर्जुन भेट देण्याजोगी अशी ही जागा आहे.


गावातील झोपडीची प्रतिकॄती


घराची प्रतिकॄती आणि त्यासमोरील भाजीपाल्याची बागशेरोकी संग्रहालयाबाहेरील भव्य पुतळा

इथे संध्याकाळचे ४.३० कधी वाजले ते समजलंच नाही. आल्या वाटेने परत स्मोकीजच्या दिशेने जायला निघालो. वाटेत जंगलात एके ठिकाणी ट्राफिक जाम झालेला दिसला. पुढे गेल्यावर रस्त्याशेजारीच १०-१५ एल्क्सचा एक कळप दिसला. एल्क हे उत्तर अमेरिकेत आढळणारं मोठया आकाराचं हरीण. हा कळप पाहण्यासाठी बरेच लोकं थांबलेले. शेवटी फॉरेस्ट रेंजर आला आणि त्याने लोकांना पांगवले. Newfound Gap मधुन परत टेनेसीमध्ये शिरलो आणि अचानक वाटेत आमच्या पुणे ऑफिसमधील एक ग्रुप भेटला. ते क्लिव्हलंडहुन आले होते. त्यांना हाय-हॅलो करुन आम्ही निघालो आणि स्मोकीजच्या अगदी पायथ्यापाशी असलेल्या गॅटलिनबर्ग ह्या गावात पोचलो. गाडी पार्क केली आणि पायी भटकायला निघालो.

गावातला मुख्य रस्ता छोटासा आहे. त्याच्या दोन्ही बाजुला प्रशस्त फुटपाथ आहेत आणि त्याला खेटुन अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॉफीशॉप्स आणि गिफ्टशॉप्स आहेत. दोन्ही बाजुंचे फुटपाथ पर्यटकांनी गजबजलेले होते. झगमगीत विद्युत रोषणाई, हालते देखावे, बोलक्या बाहुल्या, भितीदायक मेकप करुन लोकांना घाबरवणारे कलाकार यांचा वापर करुन गेमिंग आर्केड्स पर्यटकांना आकर्षित करीत होती. आमच्या कॅमेऱ्याची बॅटरी दुपारीच डाऊन झाल्याने गॅटलिनबर्गच्या ह्या रस्त्याचा एकही फोटो काढता आला नाही. कॅमेऱ्याची एव्हढी गरज ह्यापुर्वी मला कधीच जाणवली नव्हती. पण काही इलाज नव्हता. त्यामुळे ते सर्व दॄष्य डोळ्यांत साठवत आम्ही फिरत होतो. एव्हढ्यात शेजारच्या डोंगरावर जाणाऱ्या केबल कार्स दिसल्या. लगेच तिकीट काढलं आणि एका केबल कारमध्ये बसलो. ५ मिनीटांतच डोंगरावर पोचलो. इथे एक गिफ्ट शॉप कम रेस्टॉरंट आणि observation deck आहे. ह्या डेकवरुन समोर दिसते स्मोकीजची रांग आणि खाली पसरलेलं गॅटलिनबर्ग. संध्याकाळचे ७.०० वाजुन गेले असल्याने गावात दिव्यांचा झगमगाट होता आणि त्यात मुख्य रस्ता उजळुन निघाला होता. जवळपास अर्धा तास आम्ही ते दॄष्य बघत होतो. तिथुन निघावसं वाटतच नव्हतं. खाली जाणाऱ्या केबल कारमध्ये बसुन पुन्हा गॅटलिनबर्गच्या मुख्य रस्त्यावर आलो. थोडी खरेदी केली आणि तिथुन फक्त ७ मैलांवर असणाऱ्या पिजन फोर्जच्या आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी निघालो.

गाडी सुरु केली आणि असं लक्षात आलं की आमचा GPS हँग झालाय. तो अजुन जंगलातल्या एका रस्त्यावर अडकला होता. अनेकदा restart करुनही तो काही मार्ग दाखविना. जाऊन-येऊन रस्त्याचा थोडा अंदाज आलेला होता. त्यामुळे त्या भरवशावरच पिजन फोर्ज गाठलं. रात्रीचे १०.०० वाजले होते. एका इटालियन हॉटेलमध्ये शिरलो. इटालियन डिशेसबद्दल काही माहित नसल्यामुळे तिथल्या वेट्रेसने सुचविलेली ऑर्डर दिली. आलेले पदार्थ फार काही चांगले नव्हते. ते कसेबसे संपवुन आणि औपचारिकतेसाठी वेट्रेसचे आभार मानुन तिथुन निघालो. हॉटेलवर येऊन लगेच झोपी गेलो.


दिवस तिसरा - सोमवार, ११ ऑक्टोबर २०१०
पहाटे लवकर उठुन ६.०० वाजताच परतीचा प्रवास सुरु केला. GPS अजुन जंगलातच अडकला होता. बॅकप म्हणुन आम्ही गुगल मॅपच्या प्रिंट्स घेतल्या होत्या. त्या कामी आल्या. त्या follow करत दुपारी १२.०० ला आम्ही घरी पोचलो.

२.५ दिवसांची ही प्रेक्षणिय आणि रंगतदार अशी ट्रिप आता कायमच्या लक्षात राहील ती निसर्गरम्य स्मोकीज परिसर आणि तिथल्या सुंदर अश्या फॉल कलर्ससाठी.

Monday, August 23, 2010

ल्युक्झेम्बुर्ग ट्रिप

सह्यभ्रमण ब्लॉगवर कधीपासुन माझ्या फ़्रान्समधल्या ट्रीपचा वृत्तान्त लिहायचं ठरवतोय, पण आज शेवटी मुहूर्त मिळालाय. सह्यभ्रमण हा ब्लॉग फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत न ठेवता त्यामधे इतर भटकंतीची माहितीसुद्धा आम्ही लिहायचं ठरवलंय.

नुकताच मी ल्युक्झेम्बुर्ग नावाच्या एका छोट्या पण अतिशय सुंदर देशामधे भटकंती करून आलो. त्याबद्दल लिहायचा हा एक प्रयत्न. गेले अनेक दिवस ल्युक्झेम्बुर्गला जायचं जायचं असं ठरत होतं. पण शेवटी ७ आणि ८ ऑगस्ट २०१० ला जायचं निश्चित झालं. माझी काथेलीन नावाची एक मैत्रीण या देशात रहात असल्यामुळे मला योग्य ती माहिती मिळु शकली. अजुन एक चांगली गोष्ट होती की जिचा संबंध थेट महाराष्ट्राशी होता. ती म्हणजे काथेलीन ज्या एन.जी.ऒ. साठी काम करते त्यांचं सध्या महाराष्ट्राशी संबंधित काम चालु आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की ल्युक्झेम्बुर्ग सारख्या इतक्या छोट्याश्या देशामधली एखादी संस्था भारतासाठी काम करत आहे.
तर ७ ऑगस्टला मी सारगोमीनहुन (फ़्रान्समध्यॆ ज्या ठिकाणी मी सध्या रहातो) निघालो. मी जिथे रहातो ते शहर फ़्रान्स, जर्मनी आणि ल्युक्झेंबुर्ग या तीनही देशांच्या सीमेवर आहे. त्यामुळे मला जरा सोयीस्कर होतं. मी जर्मनी मधल्या जार्ब्रुकेन नावाच्या शहरातुन लुक्झेंबुर्ग सिटी मधे पोचलो. मुळातच देश लहान असल्यामुळे इथली शहरं पण खुप छोटी आहेत. माझी मैत्रीण मला स्टेशनवर घ्यायला आली होती. साधारण सकाळी १०.४५ च्या सुमारास आम्ही पहिल्या ठिकाणी म्हणजे "शातो द विऑन्देन" ला जायला निघालो. जाता जाता मला शहराचं दर्शन घडत होतं. मला असं समजलं की या देशाच्या दक्षिणेकडील भागात बऱ्याच प्रमाणात वस्ती आहे आणि उत्तरेकडील भाग हा त्या मानानी कमी वस्तीचा आहे. आम्ही देशाच्या उत्तरेला चाललो होतो. साहजिकच मला मोकळी मैदानं, त्यामधेच काही घनदाट जंगलं बघायला मिळत होती. युरोपमधल्या आजवरच्या भटकंतीमधे मला एकदाही कुठे खराब रस्ते आहेत किंवा रस्तेच नाहीयेत असा प्रकार बघायला मिळाला नाही. साधारण तास भराच्या ड्राईव्ह नंतर (म्हणजे साधारण ७०-८० कि.मी) आम्ही शातो द विऑन्देन च्या पायथ्याशी आलो. हा किला विऑन्देन नावच्या एका गावाला लागुन असलेल्या टेकडी वर बांधला आहे. आजुबाजुला असलेल्या घनदाट झाडी मुळे या किल्याच्या जवळ येइपर्यंत याचं दर्शन होत नाही. आपल्याकडे दुर्दैवानी आजही किल्ले पर्यटनाच्या द्रुष्टीनी दुर्लक्षीतच आहेत. पण युरोप मधे याच्या बरोबर विरुद्ध परिस्थीती आहे. सहाजीकच आम्हाला इथे किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसत होते. इतके की आम्हाला आमची कार काही अंतरावर ठेउन चालत जावं लागलं. किल्ल्याच्या बाजुनी मुख्य प्रवेश द्वाराकडे जायची वाट आहे. एक १० मिनीटं चालल्यावर आम्ही किल्ल्यामधे येऊन पोचलो. इथे प्रत्येक किल्ल्यामधे जाण्यासाठी प्रवेश फी असते. ती भरुन आम्ही किल्य्यामधे प्रवेश केला. त्या आठवड्यामधे या किल्ल्यामधे विविध सांस्क्रुतिक कार्यक्रम होते. त्याचाच एक भाग म्हणजे इथे काही लोक पुर्वीच्या काळी घालत तसा वेश घालुन दिसत होते. किल्यामधे शिरताच आम्हाला या किल्ल्याचं म्हणा किंवा त्या काळात वाजवत तसं संगीत ऐकायला मिळालं. सॅक्सोफोन सारखी वाद्य आणि त्याबरोबर ड्रम असा त्यांचा ताफा होता. त्यांच्या बरोबरच काही लोक पुर्वीच्या काळी वापरत ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, भांडी, दागिने आणि इतकच नाही तर शस्त्रांची (खरी नाही) विकत होते. आम्ही किल्य्याच्या भोवती फेरी मारुन मुख्य दालनात प्रवेश केला. २ मोठे भव्य हॉल होते ते की जिकडे खाण्याच्या पदार्थां पासुन, वेगवेगळ्या प्रकारची पेय (स्वाभाविकपणे दारु देखील),भांडी, दागिने अश्या नानाविध गोष्टी विकायला होत्या. हे सगळं जरा वेगळच होतं यात काही शंका नाही. त्या नंतर आम्ही एका मोठ्या खोलीत प्रवेश केला जिकडे या किल्य्याच्या प्रतिक्रुती ठेवल्या होत्या. किल्ल्यच्या अगदी आरंभापसुन किल्ला कसा बांधत गेले याची काळाप्रमाणे झालेली स्थित्यंतर त्या प्रतिक्रुती मधुन दाखवली गेली होती. मुळात हा किल्ला ११व्या ते १४व्या शतकांच्या दरम्यान बांधला गेला होता. १५ व्या शतका पर्यंत हा किल्ला म्हणजे विऑंदेन मधल्या "काउंट", जे स्वतः ला फ़्रेंच रॉयल फ़ॅमिली चा हिस्सा मानायचे, त्यांच्या साठी एक महत्वपुर्ण जागा होती. तर आम्ही पुढच्या दालनात प्रवेश केला. हे म्हणजे या किल्या मधला स्वयंपाकघर होतं. ईथली भली मोठाली भांडी विशेष लक्षं वेधणारी होती. इथंला "बॅक्वेट हॉल" ज्याला मराठी मधे डायनिंग रूम :) असं म्हणतात तो देखील अति भव्य होता. इथल्या प्रत्येक खोली मधे पुर्वीच्या वापरात असलेल्या वस्तु आजही व्यवस्थीत जतन करुन ठेवल्या आहेत. वरील दालाना मधे नृत्य प्रयोग आणि संगीताचे कार्यक्रम चालु होते. सुदैवानी हे सगळं बघण्याचा योग जुळुन आला. किल्ल्याच्या सगल्यात वरच्या मजल्या वरुन विऑंदेन गाव आणि आजुबाजुचा परिसर फारच सुरेख दिसत होता. संपुर्ण किल्ला बघायला साधारण दीड तास लागतो. सध्या हा किल्ला युरोप मधल्या काही महत्वपुर्ण किल्ल्यांपैकी एक समजला जातो.विऑंदेन किल्ला

किल्ल्याच्या आतील प्रशस्त दालन


नॅशनल म्युजियम मीन दी फ़र (राष्टीय खाण संग्रहालय)

ल्युक्झेम्बुर्ग देशाच्या साधारण मध्यवर्ती भागात हे संग्रहालय आपल्याला बघायला मिळतं. एक अविस्मर्णीय अनुभव असच मी याचं वर्णन करीन. ल्युक्झेम्बुर्ग हा देश एके काळी खाणीं चा देश होता असं म्हणायला हरकत नाही इतक्या प्रमाणात इथे लोखंडच्या खाणी होत्या. इथल्या लोकांच उदर्निवाहाचं ते एकमेव साधन होतं असं म्हणायला हरकत नाही. पण आजच्या घडीला या सगळ्या खाणी बंद झाल्या आहेत. त्याची असतील अनेक कारणं. तर आम्ही दुपारी ३ च्या सुमारास या संग्रहालयापाशी येऊन पोचलो. जमिनीपासुन साधारण १०० मीटर खाली ही पुर्वीची खाण आणि आजचं संग्रहालय आहे. त्यामुळे खाली जाण्यासाठी एक छोटी ट्रेन आहे. काळजी करु नका ही ट्रेन १०० मीटर सरळ खाली जात नाही तर बरीच लांबुन फिरत खाली जाते. इथे दर अर्ध्या किंवा एक तासानी ही ट्रेन आहे. ही ट्रेन सहाजीकच पुर्ण्पणे बंद असते त्यामुळे काही लोकांना याची भीती वाटु शकते त्यातुन खाली जाताना पुर्णपणे अंधार असतो. या ट्रेन बरोबर म्हणजे त्या ट्रेन मधल्या ग्रुप बरोबर एक गाइड असतो जो किंवा जी आपल्याला संपुर्ण संग्रहालयाची माहीती देतात. इथे एक अडचण अशी आहे की ही माहीती फ़्रेंच किंवा जर्मन मधे दिली जाते त्यामुळे तुम्हाला भाषा तरी माहीती पाहीजे किंवा तुमच्या बरोबर अशी व्यक्ती पाहीजे जी तुम्हाला समजावु शकेल. अजुन एक म्हणजे आपण १०० मीटर खाली जात असल्यामुळे तापमानात एकदम फरक पडतो. साधारणपणे खाली ९ ते १० डिग्री तापमान असतं (माझ्या मते अजुनही कमी) त्यामुळे स्वेटर्स घेऊन जाणं चांगल. तर ४ वाजता आम्ही ट्रेन नी खाणी मधे जायला सुरुवात केली. जसे जसे आम्ही खाली जाउ लागलो तशी थंडी जाणवायला लागली. साधारण २०-२५ मि. आम्ही खाणीमधे येऊन पोचलो. जाताना वाटेत खाणी मधे वापरलेली जुनी मशीन्स, हत्यारं, लोखंड वाहून नेण्याच्या गाड्या ज्याला फ़्रेंच मधे "बर्लिन"असं म्हणतात पहायला मिळाले. खाली पोचल्यावर आमच्या गाईड नी आम्हाला माहीती द्यायला सुरूवात केली. पुर्वी या खाणीमधे खाण कामगार कंदिलाच्या दिव्यामधे काम करत असत. कामाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशी १२ तास. २ कामगार मिळुन साधारणपणे २ टन लोखंड बर्लिन मधुन वाहून नेत असत. कामगारांना त्यानी जमवलेल्या लोखंडा वर पैसे मिळत. त्यातुन या कामगारांना डोक्यावार घालायला हेल्मेट पण नसत. ही सगळी माहीती एकून त्या काळातल्या लोकांनी कशी कामं केली असतील हेच समजत नाही. पुढे बर्लिन वाहुन नेण्यासाठी घोड्यांच वापर चालु झाला. जसा जसा काळ सरत गेला तशी तशी आधुनिक यंत्र वापरत येऊ लागली. सुरूंग लावण्याच्या पद्धती बदलल्या. या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी जतन करुन ठेवल्या आहेत. अगदी कामागारांनी वापारलली हत्यारं, त्यांचे कपडे, त्या वेळी औषधोपचारासाठी वापारण्यात आलेल्या वस्तु सगळं इथे बघायला मिळतात. केवळ पोटासाठी किती मोठी जोखीम त्यावेळचे कामगार घेत होते हे आपल्याला समजत. संपूर्ण खाण किंवा हे संग्रहालय बघायला साधारण १ ते १.३० तास लागतो पण हा वेळ कधी निघुन जातो हे समजत नाही.साधारण साठ च्या दशकात इथल्या सगळ्या खाणी बंद झाल्या. तुम्ही ल्युक्झेम्बुर्ग ला आलात तर ह्या संग्रहालयाला नकीच भेट दिली पाहीजे.


१०० मीटर जमिनीखालील खाण

खाणीमधला रेल्वे मार्ग


ल्युक्झेम्बुर्ग सिटि

ल्युक्झेम्बुर्ग शहर म्हणजे साधारण पाच लाख लोकसंख्या असलेल्या या देशातल मुख्य शहर किंवा मुख्य भाग अस आपण म्हणू. ल्युक्झेम्बुर्ग शहरामधली महत्वाची ठिकाणं म्हणजे इथलं "नोत्र दाम" नावाच चर्च, इथल्या राजाचा उंची महाल आणि इथला किल्ला. मुळात हे शहर एक टेकडी वर वसलं होतं जो इथला एक किल्ला आहे. महाराजांच्या काळात किल्ल्याची जी संकल्पना होती तीच इथे वापरली होती. त्यामुळेच इथली सगळी महत्वाची ठिकाणं (ज्याचा उल्लेख मी केला आहे) ती आणि सगळी सरकारी कार्यालायं याच किल्य्यामधे आहेत. हा किल्ल्याचा भाग आणि जी नवीन वस्ती आहे यांना जोडणारे अनेक ब्रीज आपल्याला बघायल मिळतात. याच शहरात आर्सेलर मित्तल(म्हणजे लक्ष्मी मित्तल या जगप्रसिद्ध उद्योगपती ज्याला स्टील मॅन असही म्हणता येइल) या कंपनीचं मुख्य कार्यालय पण आहे. या देशात तीन भाषा बोलल्या जातात. ल्युक्झेंबुर्ज्वाज ही त्यांची भाषा आणि त्याच बरोबर फ़्रेंच आणि जर्मन या भाषा देखील बोलल्या जातात. शहरामधे बसेसची उत्तम सोय आहे त्याच बरोबर मेट्रो सेवा सुधा उपलब्ध आहे. युरोपच्या दॄष्टीनी या शहराला विशेष महत्व आहे कारण युरोपीयन युनियन ची काही महत्वपुर्ण कार्यालयं याच शहरामधे आहेत.

इथल्या राजाचं "ड्युक" च निवासस्थान

किल्ल्याचा काही भाग
नोत्रदाम चर्च
आर्सेलर मित्तल कंपनीच मुख्य कार्यालय

संपुर्ण शहर हे साधारण २ तासामधे बघुन होतं. मी तुम्हाला साधारण कल्पना येईल या दृष्टीनी लिहायचा प्रयत्न केला आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला या माहीतीचा उपयोग होईल.

Monday, July 12, 2010

अहमदनगरचा भुईकोट किल्ला आणि मांजरसुंभा

पावसाळ्यात कमी पावसाच्या ठिकाणांनी भटकंतीची सुरूवात करायची असे ठरवून ११ जुलैला अहमदनगरचा भुईकोट किल्ला आणि मांजरसुंभा अश्या वेगळ्या धाटणीच्या किल्ल्यांना जायचे ठरवले. रविवारी सकाळी ५.३० वाजता एकत्र जमलो. मनोजदादा, कीर्ति, प्रणव, चैतन्य, अभय, अभिजीत, आणि वल्लरी ( वय वर्षे ........सॉरी महिने अवघे ९). झोपेतून उठल्यावर अर्ध्या तासात भूक लागलीच पाहीजे ह्या नियमाला हा दिवसही अपवाद नव्हता आणि म्हणूनच सकाळी ६ वाजता गुडलक मधे बन-ऑम्लेट चापले आणि मगचं नगरकडे निघालो. पुण्याहून नगरला पोहोचायला २.३० तास लागले. प्रथम मांजरसुंभ्याला जायचे ठरवले. हे प्रकरण काय आहे हे फारसे कोणालाच माहीत नाही आहे. याचा उल्लेख क्वचितच कुठेतरी आढळतो. नगर - औरंगाबाद हायवे वर शेंडी फाट्याला वळून डोंगरगण आणि पुढे मांजरसुंभा येथे आलो. अंतर ९ कि.मी आहे. गावातूनच वरती जायला वाट आहे. साधारण १०-१२ मिनीटात वर पोहोचलो आणि पोहोचताच लक्षात आले की आता काय बघायला मिळणार आहे. आल्या आल्या आमचे स्वागत केले ते महादरवाज्याने. नावाप्रमाणेचं महाकाय असलेला हा दरवाजा पूर्ण बांधलेला आणि सुस्थितीत आहे.पुढे गेल्यावर एका तीन मजली विशाल वाडयाचे अवशेष बघायला मिळाले. आता जरी त्याची दुरावस्था असली तरी कधीकाळी त्याने वैभव बघितलेले असणार हे मात्र निश्‍चित. त्याच्याच शेजारी भला मोठा बांधलेला तलाव आहे. काही अंतर पुढे गेल्यावर एक दुमजली इमारत दिसली. काही पायऱ्या उतरल्यावर बुरुजाच्या खाली पोहोचलो.तिथे एक अजब गोष्ट पाहिली. बुरुजाच्या आत एक मोट लावून पाणी काढायची सोय आहे. त्याच्या साधारण २० फूट किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खाली पाण्याचे खोदीव टाके आहे. जर शत्रुने किल्ल्याला वेढा घातला तर पाणी काढायची ही सोय आहे. किल्ल्यावर बारमाही पाण्याची सोय नसल्याने इतके उपद्वयाप. त्यांच्या कल्पकतेला सलाम केला आणि पुढे निघालो.हे सर्व बघायला साधारण २.३० तास लागले. महत्वाचे सांगायचे म्हणजे ह्या सर्व अजब प्रकाराला किल्ला असं म्हणलं जात नाही. कुठेही त्याचा किल्ला म्हणून तर सोडाच पण साधा उल्लेखही सापडत नाही.परत नगरला आलो. भूका लागलेल्याच होत्या. परतीच्या रस्त्यावर एका हॉटेलात राजस्थानी थाळी चा समाचार घेतला. फक्कड प्रकार होता. तृप्त होऊन बाहेर पडलो आणि त्यानंतर नगरच्या किल्ल्याकडे मोहरा वळवला. हा किल्ला मिलीटरीच्या ताब्यात आहे. त्यामुळे तो फक्त रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीच ९.०० ते ५.०० खुला असतो. किल्ल्याच्या आत सर्वत्र जंगल वाढलेलं आहे. त्यामुळे काही ठराविक ठिकाणीच जाता येतं, पण तटबंदीवरुन मात्र पूर्ण गड फेरी मारता येते. तटबंदीवर चढताच प्रथम लक्ष गेले ते डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याकडे. त्याला सलाम केला आणि पुढे निघालो. जसे जसे पुढे गेलो तसतसा किल्ल्याचा विस्तार दिसु लागला. किल्ल्याला असंख्य बुरुज आहेत. तटबंदी पूर्णपणे शाबूत आहे. एका बुरुजाचा विस्तार एव्हढा आहे की त्यावरुन चक्कर मारायला ५-६ मिनीटं लागली. याच बुरुजाच्या पोटात एक बोगदा आहे जो तुम्हाला बुरुजाच्या दुसऱ्या बाजूस पोहोचवतो. किल्ला आणि मुख्य जमीन यामधे एक प्रचंड खंदक आहे. काही बुरुजांच्या बाहेरील बाजूस शरभ कोरलेले आहेत. सुमारे २ तास चालल्यावर आलो ते किल्ल्याच्या मुख्य दरवाज्या जवळ. दरवाजा गोमुखी रचनेचा आहे आणि दोन दरवाज्यांमधे मोठा चौक आहे. इथेच तटबंदी वर कोरलेला फारसी शिलालेख आहे. ह्या दरवाजातून बाहेर मात्र पडता येत नाही. तो बंद केला आहे. तटबंदी वरुन गडफेरी पूर्ण केली आणि खाली उतरलो. या किल्ल्यातच जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल यासारख्या स्वातंत्र्यसेनानींना तुरूंगात ठेवले होते. त्यांना ठेवलेल्या खोलीत त्यांच्या वापरातील काही वस्तु ठेवल्या आहेत. त्या बघुन साधारण २.३० तासानी परत आलो.
अशी ही एका दिवसाची भटकंती कायम लक्षात राहील. पण एक खंत वाटत राहील की एव्हढा वारसा आपल्याकडे आहे, पण तो आपल्याला अजून माहीतच नाही आहे. त्यामुळे पुढची भेट असेच एखादे दुर्लक्षित ठिकाण घेऊन.

Saturday, June 12, 2010

किल्ले तैलबैल

लोणावळ्याजवळचे तुंग-तिकोना, लोहगड-विसापुर, कोराईगड, घनगड हे गड आम्ही बघितले होते. पण याच भागातला एक किल्ला त्याच्या विशिष्ट आकारामुळे आमचं नेहमीच लक्षं वेधुन घेत असे. आमचंच नाही तर गिर्यारोहण करणाऱ्या प्रत्येकाला ह्या किल्ल्यावर जायची ओढ असते यात काही शंकाच नाही. हा किल्ला म्हणजे "तैलबैला". हा किल्ला म्हणजे दोन सरळसोट, साधारण आयताकृती कातळ कडे की जे पार करण्यासाठी प्रस्तरारोहण हा एकच मार्ग आहे. एखाद्या डोंगरावर दोन भिंती आणुन बसवाव्या अशी याची रचना आहे. पण या किल्याचं भौगोलिक स्थान हे पण महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इतिहासाचा थोडासा संदर्भ घेतला तर याचं महत्व आपल्याला लक्षात येईल. हा किल्ला आहे घाटावर, पण त्याचवेळेस कोकण भागाला अत्यंत जवळ. स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाबरोबरच ज्या गडाचा विचार झाला होता तो सुधागड तैलबैल किल्ल्यावरुन अगदी समोर हाकेच्या अंतरावर दिसतो. त्यामुळे सुधागडाचं रक्षण करण्यासाठी ह्या किल्ल्याला नक्कीच महत्वपुर्ण स्थान होतं. अजुन एक कारण म्हणजे "सवाष्णी घाट", जो कोकण आणि घाटामधला एक महत्वपुर्ण दुवा होता. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठीही तैलबैल किल्ल्याचं स्थान उपयुक्त होतं.

या किल्ल्यावर जायचं अचानक जमुन आलं. दुर्गरसिक-इग्नाईट अशा दोन ट्रेकिंग करणाऱ्या संस्थांनी ह्या किल्ल्यावर जायचा बेत आखला होता. ह्या ग्रुपबरोबर जायची संधी आम्हाला मिळाली. एखाद्या ट्रेकिंग ग्रुपबरोबर जायची ही आमची पहिलीच वेळ होती. पण अशा किल्ल्यावर जायचं म्हणजे ग्रुपबरोबर जाणं हेच उपयोगी पडत असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरं कारण म्हणजे प्रस्तरारोहणाचा मनमुराद आनंद इथे घेता येणार होता. आमचा नुकताच अलंग-मदन ट्रेक झाल्यामुळे सहाजिकच जाण्याचा उत्साह अधिक होता. एक गोष्ट इथे नमुद कराविशी वाटते. ती म्हणजे प्रस्तरारोहणाची भिती वाटायलाच हवी कारण कुणी असं म्हटत असेल की मला ह्याची अजिबात भिती वाटत नाही तर याचा अर्थ तुम्हाला त्याची गंभीरता समजत नाही. ती भितीच आपल्याला कायम जागरुक ठेवते.

तर आम्ही ठरल्याप्रमाणे ७ जानेवारी २००८ ला रात्री ९.३० वाजता मनोजच्या घरी जमलो. अमोघ ठाण्याहून परस्पर लोणावळ्याला येणार होता. आमच्या ग्रुपमध्ये अमोघ आणि चैतन्य हे दोन हशम पुण्याबाहेर नोकरी करतात. पण तितक्याच उत्साहानी प्रत्येक ट्रेकला असतातच ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. ट्रेकिंगचं वेड, अजुन दुसरं काही नाही. पुण्याहुन निघुन सुमोने आम्ही लोणावळ्याला आलो. अमोघ तिथे आम्हाला जॉइन झाला आणि आम्ही गडाकडे कूच केलं. लोणावळ्याहुन आय. एन. एस. शिवाजीच्या रस्त्याला (ज्याला वायुमार्ग असंही म्हणतात) आम्ही लागलो. कोराईगडावरुन पुढे आल्यावर उजवीकडे आंबवणे गावाकडे जाणारा रस्ता पकडला. आंबवणे-सालतर अशी गावं सोडली की उजवीकडे तैलबैल गावाकडे जाणारी पाटी आपल्याला दिसते. या रस्त्याला आम्ही लागलो त्यावेळेस रात्रीचे १२.३० वाजले होते. पौर्णिमा असल्यामुळे स्वच्छ चंद्रप्रकाश पडला होता. त्यामध्ये दिसणाऱ्या त्या किल्ल्याच्या दोन भिंती फारच सुंदर दिसत होत्या. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडं चांगदेवांना भेटायला एका भिंतीवर बसुन गेले होते. कदाचित त्यातलीच एक भिंत इथे असावी. यातला गमतीचा भाग सोडा, पण इतक्या सरळसोट अशा ह्या तैलबैल किल्ल्याच्या भिंती आहेत. पहाटे साधारण १.१५ वाजण्याच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे तैलबैल गावामध्ये येऊन पोहोचलो. गावामध्ये एक मारुती मंदिर आहे. त्या मंदिराच्या आवारात आम्ही आमचा डेरा टाकला. चंद्राचा छान प्रकाश पडला होता, मध्येच वाऱ्याची एखादी झुळुक येत होती. झोप न लागण्याचं काही कारणच नव्हतं. अशा वातावरणात रहाण्याची मजा काही औरच आहे. त्याचं शब्दामध्ये वर्णन करणं शक्य नाही.

सकाळी ६.१५ ला आम्ही उठलो. ह्यावेळेस ग्रुप बरोबर आलो असल्यामुळे सकाळी उठुन चहा-नाश्ता बनवणे ही भानगडच नव्हती. उलट आमच्या हातामधे तयार उपमा आणि चहा देण्यात आला. हे आमच्यासाठी खुपच वेगळं होतं. सकाळी ७.३० ला आम्ही "कोल" च्या म्हणजे खिंडीच्या दिशेनी जायला निघालो. आम्ही जसे कातळकड्य़ांच्या जवळ येऊ लागलो तशी त्यांची भीषणता जाणवायलात लागली. काही क्षणात आम्ही त्या दोन महाकाय भिंतींच्या पायथ्याशी येऊन पोचलो. ह्या दोन कातळ टप्प्यांसमोर आम्ही म्हणजे किड्य़ा-मुंगीसारखे होतो. साधारण ८.०० वाजता आम्ही प्रत्यक्ष खिंडीमध्ये येऊन पोहोचलो. इथे एक शंकराचं मंदिर आहे, आणि बाजुला पाण्याचं एक टाकं आहे. हा सगळा परिसर प्रस्तरारोहण करणारी माणसं आणि त्यांना लागणारी हत्यारं ह्यानी पावन झाला होता. गेल्यागेल्या आम्हाला तिथे एक फॉर्म भरायला सांगितला. नंतर आम्ही सगळ्यांनी कमरेचा खोगीरपट्टा(सीट हार्नेस), स्क्रुड कॅरॅबिनर्स, डिसेंडर, कमरेला सुरक्षेचा उपाय म्हणुन स्लिंग (अत्यंत दणकट रोप) अशा सगळ्या साहित्यानिशी सुसज्ज झालो. पुढच्या तासाभारामध्ये सर्व क्लाईंबर्सनी आपापल्या पोझिशन्स घेतल्या आणि ९,१५ वाजता सह्यभ्रमणने चढाईला सुरुवात केली. पहिला प्रस्तरारोहणाचा ४० फुटांचा टप्पा पार करावा लागतो. हा टप्पा पार करता यावा म्हणुन क्लाईंबर्सनी रोप व्यतिरिक्त एक शिडी लावुन ठेवली होती. या रोप लाइनच्या आणि हलत्या शिडीच्या सहाय्यानी हा टप्पा पार करणं शक्य झालं. अर्थात हा टप्पा सोपा नक्कीच नव्हता. दोन्ही हातांनी एकतर शिडीला किंवा रोपला धरुन शिडीवर पाय टाकत जाताना हाताची आणि खांद्यांची खरंच वाट लागत होती. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःचं शरीर जोर लावुन वरती खेचावं लागत होतं.
पहिल्या टप्प्यासाठी लावलेली शिडी

तर अशा प्रकारे पहिली किर्ती मग मी त्यापाठोपाठ प्रणव, मनोज, अभय, अनिरुध्द असे सगळे हा टप्पा पार करुन वरती आलो. हा ३० ते ४० फुटांचा टप्पा पार केल्यावर अजुन एका २५ फुटांच्या कातळ टप्प्याशी आम्ही येऊन पोहोचलो. इथे दस्तुरखुद्द भाऊच (विकास सातारकर) मदतीला असल्यामुळे पुढचा टप्पा पार करण्याचं टेन्शन आपोआप कमी झालं. हा पुढचा टप्पा छोटा असला तरी ह्याला "एक्सपोजर" खुप आहे. आणि जाण्याची जागासुधा त्यामानाने खुपच छोटी आहे. ह्या टप्प्यावर तीन रोपलाईन्स, होत्याच पण त्याशिवाय पाय ठेवायला सोपं जावं म्हणुन "स्टाईप्स"सुधा मारुन ठेवल्या होत्या. कातळ टप्प्याच्या खालच्या बाजुला भाऊ आणि वरच्या बाजुला रवी देशपांडे असे दोन अत्यंत अनुभवी क्लाईंबर्स होते. येणाऱ्या प्रत्येकाला हापसुन वर खेचण्याचं अत्यंत जिकिरीचं काम हे दोघंजण पार पाडत होते. हे दोघे क्लाईंबर्स कड्य़ाच्या इतक्या टोकावर थांबले होते की जिथे हलायला बिल्कुल वाव नव्हता.

दुसऱ्या टप्प्यानंतर लागणाऱ्या अरुंद पायऱ्या

हा कातळटप्पा पार केला की अजुन एक छोटासा टप्पा लागतो. इथे प्रचंड प्रमाणात "स्क्री" आहे. त्यामुळे पावलं जपुन टाकावी लागतात. तर असे एकुण तीन टप्पे पार करुन आम्ही समीटला म्हणजे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. गडाच्यामाथ्यावरुन आपण दोन वेगवेगळ्या लेव्हल्स सहज पाहु शकतो. वर म्हणजे घाट माथा आणि खाली कोकण. गडावरुन एका बाजुला सुधागड आणि पालीचा सरसगड, तर दुसऱ्या बाजुला घनगड दिसतो. आणि ह्या सगळ्यांमधे काही दिसत असेल तर फक्त पाताळ. सह्याद्रीचं रौद्र रूप आपल्याला इथुन दिसतं.

गडाचा माथा


गड माथ्यावरुन दिसणारा सुधागड

नेहमीप्रमाणे आम्ही गडमाथ्यावर एक चमुचित्र काढुन परत खाली उतरायला लागलो. प्रस्तरारोहणाचे दोन टप्पे पार करुन आम्ही टाक्यापाशी येऊन पोहोचलो. इथुन १५० फुटाचा टप्पा पार करायचा होता. याचं वैशिष्ठ्य ते असं की ३०-४० फुटांचा टप्पा पार केला की एक पुढे आलेला प्रस्तर (ओव्हरहॅग) येतो की जिथुन पुढे आपल्याला कसलाही आधार न घेता हवेमधे ९० अंशामधे बसुन रोपच्या साहाय्याने खाली यावं लागतं. रॅपलिंगचा खरा आनंद आपल्याला इथे मिळतो. आम्ही नुकतंच सरसरत खाली जाणं (रॅपलिंग) केलेलं असल्यामुळे हा १५० फुटाचा टप्पा आम्ही खुप छान अनुभव घेत पार केला. हा सरसरत खाली जाण्याचा टप्पा पार करायला आम्हाला प्रत्येकाला सधारण ४ ते ५ मिनिटं लागली. प्रत्येकजण खाली आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि ते समाधान हे शब्दामध्ये उतरवणं खरच कठीण आहे. ज्याला याचा अनुभव घेता येईल त्याने खरच तो घ्यावा. ब्रम्हानंद असं मी याचं वर्णन करीन.
सकाळी ९.१५ वाजल्यापासुन ते शेवटचा हशम खाली येइपर्यंत म्हणजे साधारण दुपारी २.१५ पर्यंत एकेक क्षण आम्ही अक्षरशः "एन्जॉय" केला. अत्यंत अविस्मरणीय असा हा तैलबैल किल्याचा आमचा अनुभव ठरला.उतरताना केलेलं रॅपलिंग


मोहिम फ़त्ते केलेला सह्यभ्रमण चमु

अलंग-मदन

आज पहिल्यांदाच स्वतःहुन काहीतरी लिहायचा प्रयत्न करतोय. बघू कितपत जमतंय ते. तसं ट्रेकिंग आता काही नवीन राहिलं नाहिये. उलट आता त्याचं वेड लागलंय. पण जसं म्हणतात की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, तसंच वेड लागल्याशिवाय तो बघूनही होत नाही. कदाचित या वेडापायीच आज जवळ जवळ ७५ ते ८० किल्ले बघून झाले आहेत. आज कुठे त्याबद्दल लिहावं असं वाटलं. हरकत नाही. ते म्हणतात ना "बेटर लेट दॅन नेव्हर".

आता जरा पार्श्वभुमी सांगतो. तसं २००६ मधे मी, प्रणव, अनिरुद्ध (दोघेही केळकर), अंबरीश हिंगे आणि मानस पाटणकर असा ग्रुप झाला आणि आम्ही ट्रेकिंग चालू केलं. तेव्हापासून जे सुरू झालं ते आजही सुरुच आहे. याला खरी गती मिळाली ती डिसें २००७ मध्ये किल्ले तोरण्यापासुन. जिथुन शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्य उभारणीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला, त्या तोरण्यापासुनच आम्ही किल्ले बघण्याचा सपाटा लावला आहे. बहुतेक या किल्ल्यामधेच काहितरी जादूई शक्ती आहे. पण खरं कारण म्हणजे आमच्या ग्रुप मधे अजून दोन ट्रेकिंग वेड्य़ा लोकांचा झालेला समावेश आणि ते दोघं म्हणजे श्री आणि सौ किर्ती मनोज केळकर. त्यानंतर अजुन दोन ट्रेकिंग वेड्य़ा व्यक्ति यात आल्या. त्या म्हणजे अमोघ बापट आणि अभय नेरूरकर. आता आमचा ग्रुप आम्ही "सह्यभ्रमण" या नावानी संबोधतो. यामधे आम्ही आठ जण असे आहोत की जे प्रत्येक ट्रेक मध्ये असतातच. ५ केळकर, चितळे, बापट आणि नेरुरकर असा आमचा ग्रुप आहे.

आत्तापर्यंत आम्ही अनेक छोटे मोठे ट्रेक केले, मग तो कोयना नगर-चांदोली चा भैरवगड, प्रचितगड, महिमतगड असोत किंवा मग सोलापूर-औसा-परांड्य़ाचे भुईकोट किल्ले असोत. पण ह्यावेळचा ट्रेक जरा वेगळाच होता. कारण ह्यावेळी आम्ही अलंग-मदन या दोन महाकाय गडांवर जायचा बेत केला होता. सह्याद्रीतल्या काही कठीण किल्ल्यांपैकी असे हे दोन किल्ले म्हणायला हरकत नाही. कारण ह्यांना फक्त उंचीच नाहीये तर इथे प्रस्तरारोहण केल्याशिवाय वर जाताच येत नाही. अनेक दिवस आम्ही ह्या ट्रेकचा बेत आखत होतो आणि तारखांची जुळवाजुळव करत होतो. अखेरीस २६ ते २९ डिसें २००८ ह्या चार दिवसात हा ट्रेक करायचा बेत पक्का झाला. या वेळेस फक्त आम्ही ८ लोकंच नव्हतो तर क्लाईंबर्सना सुद्धा जमणं तितकंच महत्वाचं होतं. सुदैवानी त्याच दरम्यान हे क्लाईंबर्स याच दोन गडांवर अजून एका ग्रुपला घेऊन जाणार असल्यामुळे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित जमून आल्या. विकास (ज्यांना भाऊ असंच म्हणतात), हेमंत आणि चिन्या असे तीन क्लाईंबर्स आमच्या बरोबर होते. यांच वैशिष्ठ्य म्हणजे यांनी आम्हाला नुसतीच रॉक क्लाईंबिंगला मदत नाही केली तर त्यासाठी जी काही हत्यारं लागतात त्याचीही माहिती दिली आणि ती कशी वापरायची हे पण व्यवस्थित सांगितलं. ह्यामुळे जरी हा आमचा पहिलाच रॉक क्लाईंबिंगचा अनुभव असला तरी भिती कधी वाटली नाही.

झालं, आमच्या जायच्या तारखा नक्की झाल्या आणि नेहमीप्रमाणे एकमेकांना फोन करणं, काय काय वस्तु घ्यायच्या या सगळ्याची तयारी करणं या गोष्टी ओघानी आल्याच. ह्या ट्रेकला परदेश प्रवासाला जाताना जसं बॅगच्या वजनाचं बंधन असतं तशीच काहीशी परिस्थिती होती. कारण खुप उंची गाठायची होती आणि पायपीट सुद्धा खुप करावी लागणार होती. ह्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे सॅक पाठीवर घेऊन रॉक क्लाईंबिंग करायचं होतं. असं सगळं असलं तरी "सैन्य हे नेहमी पोटावर चालतं" हे वाक्य कायम डोक्यात ठेऊन नेहमीप्रमाणे खाण्या-पिण्याचा मुबलक साठा आम्ही घेतला होता. त्यासाठी चार दिवस आधी खरेदी करण्यात आली. रेडी-टू-ईट भाज्या, उपमा, सुप, टेट्रा पॅक मिल्क, कॉर्नफ्लेक्स इ. इ. इ. मी लिहीत बसलो तर हे पान संपुन जाईल. पण एक मात्र नक्की की ट्रेकला तुम्ही रिकाम्या पोटी गेलात की त्रास हा होणारच. भरल्यापोटी "यू कॅन गो प्लेसेस". तर ठरल्याप्रामाणे सामानाची जमवाजमव आणि बांधाबांध करुन आम्ही ठरल्याप्रमाणे रात्री १०.१५ ला मनोजच्या घरी पोचलो. साधारणपणे आम्ही सुमो करून ट्रेकला जातो. ह्यावेळी नेहमीचं ५ केळकर, चितळे, बापट, नेरूरकर हे समीकरण जरा बदललं होतं. अंबरीश हा आमच्या ग्रुपमधला "हशम" अनेक महिन्यांच्या गॅपनंतर परत ग्रुपमध्ये सामील झाला होता. अंबरीश बरोबरच आनंद आणि निलेश असे एकुण तीन जण या ट्रेकमध्ये अ‍ॅड झाले होते. या सेनेचे सेनापती म्हणजे तीन क्लाईंबर्स असा एकुण १४ जणांचा ग्रूप बनला. त्यामुळे ह्यावेळी १७ लोकांची टेम्पो ट्रॅव्हलर केली होती.

२६ डिसें. ला रात्री ११.०० च्या सुमारास आम्ही प्रवासाला सुरूवात केली. पुण्याहून संगमनेर-राजूर-अकोले-बारी-आंबेवाडी असा आमचा प्रवास होता. पुण्याहुन निघाल्यावर पहाटे साधारण २.३० ते ३.०० च्या सुमारास आम्ही बारी नावाच्या गावामधे पोचलो. बारी म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याचं गाव. पहाटेच्या वेळेस गोठवणाऱ्या थंडीत आम्ही इथे थोडावेळ थांबलो होतो. सहाजिकच बाहेर पडण्याची हिंमत कोणामधे नव्हती. याचं कारण म्हणजे ती वेळ एकतर असं बाहेर फिरण्याची नव्हती आणि कोणी धाडस करून गेलं तरी तो दुसऱ्या मिनिटाला बसमध्ये येऊन बसणार इतक्या प्रमाणात इथे थंडी पडली होती. आम्ही ११ जणं डांबुन ठेवल्यासाखे बसमध्ये बसलो होतो. साधारण ६ वाजण्याच्या सुमारास आम्ही बारी गावामधून प्रयाण केलं. इथलं वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या आडगावामधेही रस्ते एकदम सुस्थितीतले होते. अचानक आमचं लक्ष उजवीकडे डोंगरावर असणाऱ्या पवनचक्क्यांनी वेधुन घेतलं. हा कुठला डोंगर असा विचार करेपर्यंत त्यांची नावेही पुकारून झाली होती. आड-आवंढा-पट्टा-बित्तिंगा या चार किल्ल्यांपैकी आड आणि पट्टा असे ते दोन गड होते. किर्ती आणि मनोज केळकर या दोघांनी मिळुन जवळ जवळ २५० किल्ले बघितले आहेत. त्यापैकीच हे दोन किल्ले होते बहुतेक. नुसते डोंगर बघुन ते ओळखण्याची दैवी देणगी ज्या काही लोकांना असते त्यापैकी हे श्री आणि सौ केळकर. या किल्ल्यांची नावं ऐकली की एखाद्याला वाटेल की हे कर्नाटकातल्या "बिदर" किंवा "हुबळी" भागातले असतील. काही अंतर पुढे गेल्यावर एका वळणावर अलंग-मदन-कुलंग या त्रयींचं दर्शन घडलं आणि त्यावर जाण्याची उत्सुकता अजुनच वाढायला लागली. आतापर्यंत नारायणरावांनी आपलं डोकं वर काढलं असल्यामुळे थंडीचा कडाका कमी होण्यास सुरूवात झाली होती. पुढे जाऊन आंबेवाडीच्या जरा आधी एका शेतात आम्ही नाश्ता करायला थांबलो. साधारणपणे नाश्ता म्हटलं की आम्ही उपमा हा सर्वमान्य आणि पोटभरीचा पर्याय अवलंबतो. पण ह्यावेळेस मात्र यात बदल झाला होता. अनिरूद्धनी चक्क उकडलेली अंडी आणली होती. आमच्या सह्यभ्रमणच्या ट्रेकला खायची वगैरे अशी वेळ नसतेच. मग ते रात्रीचे १२ असोत किंवा पहाटेचे ३ वाजलेले असोत किंवा अगदी सकाळचे ९, आम्ही सगळे नाश्त्यावर तेवढाच ताव मारतो. त्यामुळे उकडलेली अंडी आणि ब्रेड हे संपायला फार वेळ नाही लागला. त्यानंतर क्लासेसनी चहा आणि मासेसनी कॉफी असा शेवट झाला. आम्ही कुठेही ट्रेकला गेलो असलो तरी एक वेळ नाश्ता किंवा जेवण करायला विसरु पण चहापानाचा कार्यक्रम व्ह्यायलाच हवा. तर अशा प्रकारे नाश्ता आणि चहापान आटपुन आम्ही आंबेवाडीकडे कुच केलं. आमची गाडी गावात येते ना येते तोच सारा गाव आमच्या भोवती जमायला सुरुवात झाली. आम्ही सगळ्या सामानाची आवराआवर केली, ड्रायव्हरची खायची प्यायची (जी ड्रायव्हरनी नंतर स्वतंत्रपणे सुधा केली असेल) व्यवस्था करून अलंगगडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. सकाळचे साधारणपणे ९.३० वाजले असतील. सगळ्यांकडेच प्रचंड प्रमाणात सामान असल्यामुळे चालण्याचा वेग तसा हळुच होता. थोडी चढण चढुन गेल्यावर आम्ही एका ओढ्याच्या कडेला येऊन पोहोचलो. यानंतर खरा रस्ता उजवीकडे गेला होता, पण आम्ही रस्ता चुकणे या आमच्या प्रथेला अनुसरुन डावीकडील चुकीची पायवाट पकडली. यामधे आमचा जवळजवळ एक तास वाया गेला. पण अखेरीस आम्हाला योग्य वाट सापडली आणि आम्ही अलंगगडावर जायच्या रस्त्याला परत लागलो. काही अंतर पुढे गेल्यावर जेव्हा वर बघितलं तेव्हा आम्हाला प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाईंबिंगचा) पॅच द्रुष्टीस पडला. आमच्या आधी गडावर जो ग्रुप गेला होता तो ग्रुप हा प्रस्तरारोहणचा टप्पा खाली उतरत होता. ते दृष्य पाहून छातीत थोडी धडकी भरली. पण प्रस्तरारोहणाचा टप्पा अजुन आला नव्हता त्यामुळे अज्ञानात सुख मानून आम्ही पुढे चालत राहीलो. काही अंतर गेल्यावर आम्ही एका दगडामधे कोरलेल्या मारुतीजवळ आलो. सगळेच जण चालुन आणि जड सॅक्स वाहुन दमलो होतो. त्यामुळे थोडी विश्रांती घेतली. आता पुढे खडी चढण आणि मग प्रस्तरारोहणाचा टप्पा असल्यामुळॆ देवाच्या चरणी नारळ फोडून आणि पुढे जाण्याची शक्ति दे अशी प्रार्थना करुन आम्ही आता शेवटचा टप्पा पार करण्यासाठी पुढे निघालो. पुढील टप्प्यामधे जरी तीव्र चढ असला तरी रॉक क्लाईंबिंगच्या ओढीने आम्ही ती खडी चढण झटकन पार केली. अखेरीस आम्ही अंतिम रॉक पॅच पाशी येऊन पोहोचलो. भाऊ, म्हणजे विकास सातारकर, हे आमच्या स्वागताला होतेच. रॉक पॅचचा पहिला टप्पा तसा सोपा होता. इथे दोन रोप बांधुन ठेवले होते. एक होता तो सेफ्टी बेल्ट जो आम्ही कमरेला बांधला होता आणि दुसऱ्या रोपला धरून आम्ही वरती चढत गेलो. हा रॉक पॅच साधारण २५ ते ३० फुटांचा असेल.

अलंगचा पहिला रॉक पॅच

आता इथुन पुढे आमची खरी कसोटी होती. पुढे किल्ल्याचा साधारण ५० ते ६० फुटांचा सरळसोट कातळकडा चढुन वरती जायचं होतं. भाऊंनी आधी आम्हाला कातळावर लावलेल्या रोपची आणि प्रस्तरारोहणात वापरण्यात येणाऱ्या हत्यारांची प्राथमिक माहिती दिली. या कातळकड्य़ावर ४ रोप लावले होते. त्यापैकी प्रत्येक रोपचं काय महत्व आहे ते भाऊंनी आम्हाला समजावुन सांगितलं. यानंतर भाऊ स्वतः त्या कातळ कड्य़ावरून फ्री क्लईंब करुन वर गेले. ते इतक्या लिलया वर चढत गेले की हे किती सोपं आहे असं वाटायला लागलं. पण तेव्हा कुठे माहीत होतं की हा केवळ एक भ्रम होता. यानंतर प्रथम किर्ती हा कातळ टप्पा पार करण्यासाठी तयार झाली आणि काही मिनिटांत तिने हा कातळ टप्पा पार केला. कातळावर लावलेल्या ४ रोप पैकी एका रोपला दोन्ही हातानी पकडुन वर जावं लागणार होतं. त्या रोपचं दुसरं टोक वर लावलेल्या पुली मधुन पास करून खाली सोडलं होतं. एकतर स्वतः एक रोप खेचत स्वतःला वर खेचायचं (ज्यामध्ये दोन्ही हात आणि खांदे बधीर होतात) किंवा खाली उभा असलेला माणुस एक रोप खेचतो जेणेकरून क्लाईंबिंग करणारा वरती जाऊ शकतो. अशी ही एकंदरीत यंत्रणा होती. तर अशाप्रकारे किर्ती, प्रणव, अनिरूध्द असे एकापाठोपाठ एक तो टप्पा पार करुन गेले. मी आणि अमोघ ही आमच्या ग्रुप मधली वजनदार व्यक्तिमत्वं असल्यामुळे सहजिकच आम्हाला खेचण्यासाठी जास्त जोर लावावा लागणार होता. मी हा टप्पा पार करताना स्वतःला खेचत वरती गेलो. त्यामुळे वरती पोहोचेपर्यंत माझा पूर्णपणे शक्तिपात झाला होता. इतरांनी मदत केलीच. यात अमोघ, हेमंत, चैतन्य, अंबरीश या लोकांचे विशेष आभार मानायला पाहिजेत कारण ८५ किलो वजन खेचणं ही कही चेष्टा नाहीये. एकेक करुन साधारण १ ते १.३० तासांनी आम्ही ११ जणांनी हा टप्पा पार केला. हे सगळं सुरळीत पार पडलं याचं एकमेव कारण म्हणजे भाऊ, हेमंत आणि चिन्या. या तिघांचे विशेष आभार मानायला पाहिजेत. अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने या तिघांनी आम्हाला प्रस्तरारोहण शिकवलं आणि आमच्याकडुन करवून घेतलं.

अलंगचा दुसरा रॉक पॅच

हा टप्पा सोडल्यावर पुढे उजवीकडे कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या. एका वेळेस एक माणुस जाऊ शकेल एवढ्याच आकाराच्या या पायऱ्या होत्या. त्यावर भल्यामोठ्य़ा सॅक घेऊन चढणं म्हणजे खरंच कसरत होती कारण उजव्या बाजुला जरासा जरी पाय घसरला असता तरी........ ह्या टप्प्यावर सुद्धा सेफ्टी रोप्स होते. त्यामुळे हा टप्पा पार करणं फारसं कठीण गेलं नाही. तर अशी सधारण २.३० ते ३ तासांची कसरत करुन आम्ही अखेरीस दुपारी ३.३० च्या सुमारास गडमाथ्यावर पोचलो असु. सकाळी ९.३० वाजल्यापासुन (काही वेळाची विश्रांती वगळता) आमची सतत पायपीट चालु होती. त्यामुळे सगळ्यांनाच भुक लागली होती. गडावर एका वेळेस २० ते २५ लोक राहु शकतील एवढी मोठी गुहा आहे. गुहेमध्ये गेल्यावर सामान ठेवलं आणि स्टोव्ह पेटवला. पाणी गरम करायचं होतं. आमच्याकडे असलेल्या रेडी-टू-इट भाज्या गरम केल्या. पोळ्या, गरम गरम भाजी, श्रीखंड हे संपायला फार वेळ लागायचं काही कारणच नव्हतं. सगळ्यांनी अक्षरशः जेवणावर ताव मारला.

अलंगगडाचे विहंगम दृश्य

साधारण ५.०० वाजण्याच्या सुमारास आम्ही गडावर फेरफटका मारायला निघालो. गुहेच्याच बाजुनी एक वाट वर जाते. काही अंतर गेल्यावर आपल्याला वाड्य़ाचे काही अवशेष दिसतात. काही जोती दिसतात. यानंतर काही अंतर पुढे गेलं की एकात एक गुंफलेली १० ते १२ टाकी दिसतात. ही सगळी बांधीव टाकी आहेत हे त्यांच्या एका बाजुला असलेल्या कठड्य़ावरून सहज लक्षात येतं. ही टाकी मागे टाकुन पुढे जातो तोच आमची नजर उजवीकडे असलेल्या वाड्य़ाकडे गेली. याची एक बाजु पुर्णपणे जमीनदोस्त झाली होती. बाकी तिन्ही बाजु अजुन चांगल्या स्थितीत आहेत. गडावर एक देऊळ पण आहे पण ते जमीनदोस्त झालेलं आहे. देऊळ आहे असं समजतं कारण त्याचे खांब आणि कळस सहज ओळखता येतात. पूर्वी यामधे शंकराची आणि देवीची मूर्ती असावी. जवळच एक शीलालेख सापडतो, जो मोडी लिपीमधे आहे.

एकात एक गुंफलेली टाकी

देवळाचे अवशेष आणि शिलालेख


अलंगगडावरुन दिसणारा मलंगगड

आम्ही फिरत होतो खरे, पण आमचं लक्षं सुर्याकडेही होतं. थंडीचे दिवस, त्यामुळे साहजिकच दिवस लवकर संपतो. मावळतीच्या सुर्याची किरणं डोळ्यात साठवून आम्ही ६.१५ च्या दरम्यान परत गुहेच्या दिशेने परत फिरलो. ७.०० वाजेपर्यंत पुर्ण काळोख पडला होता. संध्याकाळी ५.०० वा. जरी जेवण झालं असलं तरीपण आता रात्रीचं जेवण करायची गरज नाही असं कोणाच्या म्हणण्यात येण्याचं काही कारणच नव्हतं. फेरफटका मारून आलो नाही तर लगेच स्टोव्हचा आवाज परत चालु झाला. कॉर्न सुप, अंडाकरी, श्रीखंड, पोळ्या असा शाही बेत असल्यावर पोट भरलेला माणुस सुद्धा ताव मारुन जेवेलच. तर अशाप्रकारे २६ आणि २७ डिसें. ह्या अत्यंत कष्टमय दिवसांची सांगता झाली आणि सगळेजण झोपी गेले.


२८ डिसेंबर २००८

सकाळी उठल्यावर आवरून ८.०० वाजता आम्ही परत गडफेरीसाठी निघालो.अलंगगडाच्या सर्वोच्च माथ्यावर उभं राहिलं, की आपल्याला आपण किती उंचीवर आहोत त्याची कल्पना येते. ह्या एवढ्या उंचीवर असल्यामुळेच अलंगगडावरुन "सप्तश्रुंगी", "मार्कंड्य़ा", "रवळ्या-जवळ्या", "धोडप", कांचना, इखारा, राजधेर-कोळधेर-इंद्राई-चांदवड, साल्हेर-सालोटा, हातगड, ढाकोबा, सिद्धगड, त्याच्या अलिकडे जीवधन, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, रतनगड, असे तब्बल अठरा ते एकोणीस किल्ले बघावयास मिळतात. असे दुरवर असलेले किल्ले शोधुन काढण्यात जी काही मजा आहे, ती अनुभवण्यासाठी अशी भटकंतीच करावी लागते. आमच्या नशिबाने आम्ही ती करु शकतोय.

अलंगगडावरुन दिसलेली वणीची रांग: (डावीकडुन) सप्तश्रुंगीगड, मार्कंड्य़ा, रवळ्या, जवळ्या, धोडप, इखारा

आम्हाला गडाच्या उत्तर टोकाला असलेला दरवाजा बघायचा होता. यासाठी गडाची पूर्ण फेरी मारावी लागते. बरीच पायपीट केल्यावर आम्ही एका घळीपाशी येऊन पोहोचलो. पण खाली रस्ता नक्की कुठे जातोय हे माहीत नसल्यामुळे आम्ही तिथुन परत फिरलो. काही मित्रांशी फोनाफोनी झाल्यावर असं लक्षात आलं की जो दरवाजा आम्ही शोधत होतो तो गडाच्या बऱ्याच खालच्या भागात आहे. त्यामुळे तो मागे टाकुन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. परत गुहेमध्ये येऊन सगळ्या सामानाची बांधाबांध केली. अलंगगडाला रामराम ठोकुन आता आम्ही परत निघालो. एकापठोपाठ एक असं करत अत्यंत सावकाशपणे आम्ही पायऱ्या उतरून प्रस्तरारोहणाच्या (रॉक क्लाईंबिंगच्या) टप्प्यावर आलो. रॅपलिंग हा एक नवीन अनुभव आम्हाला घ्यायचा होता. आमचे हात पाय लटपटत होते, पण तरीसुद्धा तेवढाच उत्साहदेखील होता. सर्व प्रकारचे सेफ्टी बेल्ट्स लावून आम्ही एकेक जण खाली उतरू लागलो. दुसऱ्याला उतरताना बघितलं की हे किती सोपं आहे असा जो आपला भ्रम होतो त्याचा निरास त्या कातळ कड्य़ापाशी आलं की आपोआपच होतो. असं असलं तरी रॅपलिंग हा एक मजेशीर पण घाबरवुन सोडणारा असा एकत्रित अनुभव आहे. ह्या कातळ टप्प्यावरुन उतरायला साधारण १.३० तास लागला. शेवटचा माणुस कातळ कड्य़ावरुन कसा उतरतो ही एक अत्यंत कुतुहलाची बाब आहे आणि भाऊंनी काय जुगाड केला आणि ते सगळे रोप्स घेऊन खाली कसे उतरले हे माझ्यासाठी अजुनही कोडंच आहे.
कातळ टप्पा पार केल्यावर आम्ही मदनगडाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. मदनगडावर जाणाऱ्या वाटेचा अंदाज अलंगगडावरुन घेतल्यामुळे छातीत धडकी भरली होती. अलंग आणि मदन या दोन गडांमधे एक खिंड आहे. अलंग उतरून या खिंडीमध्ये येईपर्यंत दुपारचे ३.०० वाजले होते. वाटेत काहीना काही तरी खाणं चालु होतंच. खिंडीमध्ये सगळे पोचले आणि मदनगडच्या पायथ्याशी असलेल्या पायऱ्यांपाशी आम्ही सगळे येऊन पोहोचलो. या पायऱ्या कातळामधे खोदलेल्या आहेत आणि त्यासुद्धा ९० अंशाच्या कोनामधे, म्हणजे जवळजवळ सरळसोटच आहेत. माणसाच्या गुडघ्याच्या उंचीच्या असलेल्या या पायऱ्या चढुन जाताना खरंच खुप दमछाक होते. या पायऱ्या चढुन आम्ही एका कातळकड्य़ाच्या पायथ्याशी येउन पोचलो. इथुन पुढे विकास, हेमंत आणि चिन्या असे तिघंही क्लाईंबर्स पुढे गेले. मदन गडावरचा कातळ टप्पा पार करायचा असल्यामुळे या तिघांनी पुढे जाऊन रोप्स लावुन ठेवले. आम्ही एकापाठोपाठ एक असे हा टप्पा पार करण्यासाठी पुढे जाऊ लागलो. या कातळटप्प्याच्या पायथ्याशी दोनपेक्षा जास्ती माणसं राहुच शकत नाहीत त्यामुळे आम्ही एकेक करुन तिथपर्यंत येऊन थांबत होतो आणि आपण हा टप्पा कसा पार करणार असा विचार करत आधी जाणाऱ्याकडे बघत बसलो होतो. कारण खाली दोन ते अडीच हजार फूट खोल दरी बघायची हिंमत कोणामध्येच नव्हती.

मदनगडाचा रॉक पॅच

हा कातळ टप्पा पार करुन सगळेजण वरती आले. संध्याकाळचे ६.३० वाजून गेले होते. यानंतरचा टप्पा अंधारातच पार करावा लागणार होता. पण अज्ञानात सुख म्हणतात ना तसं डाव्या-उजव्या बाजुला किती खोल दरी आहे हे आम्हाला काळोखात समजतंच नव्हतं. त्यामुळे पुढे चालत होतो. पुढे परत कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत. अत्यंत कमी जागेमध्ये, म्हणजे एक माणुस जेमतेम बसेल, एवढ्याच आकाराच्या पायऱ्यांचा हा टप्पा आहे. हा साधारण २० ते २५ मिनिटांचा टप्पा पार करुन आम्ही सगळेजण मदनगडावर पोचलो. आम्ही किती अवघड टप्पा पार करुन वरती आलो होतो हे आम्हाला अजुनही समजलं नव्हतं. मदनगडाच्या माथ्यावर पोचेपर्यंत संध्याकाळचे ७.३० वाजुन गेले होते. गडावर सधारणपणे ५० माणसं सहज झोपु शकतील एवढी मोठी गुहा आहे. दिवसभराची पायपीट करुन सगळेच थकले होते. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झाली. कदाचित वाचणाऱ्याला वाटेल की आम्ही गिर्यारोहणाला जातो की फक्त जेवायला. पण परत एकदा सांगतो की सैन्य हे पोटावर चालतं. व्हेज पुलाव करण्याचा आमचा बेत होता. मी, मनोज आणि प्रणव असे तिघं स्टोव्ह पेटवणे आणि पेटलेला स्टोव्ह टिकवणे याचे अटोकाट प्रयत्न करत होतो, तर किर्ती, अमोघ आणि अभय असे तिघं भाज्या कापण्यामधे गुंतले होते. निलेश व अनिरुद्ध पाणी आणण्यासाठी बाहेर पडले होते. प्रत्येक जण काहीना काही कामामध्ये गुंतला होता. ह्या सगळ्या टीमवर्कचं फळ आम्हाला काही वेळातच मिळालं. फळ नको तर पुलाव मिळाला असं आपण म्हणु. पुलाव असा काही झाला होता की दोन पातेली भरुन केलेला पुलाव कधी आणि कसा संपला काही समजलंच नाही. उलट भुक एवढी लागली होती की बरोबर आणलेले मेथी पराठेही आम्ही सगळ्यांनी फस्त करुन टाकले. यानंतरचा मी, अनिरुद्ध आणि अभय असा आम्हा तिघांचा नेहमीचा, म्हणजे भांडी घासण्याचा कार्यक्रम पार पडला. १२.०० वाजण्याच्या सुमारास सगळे गुडुप्प झाले.


२९ डिसेंबर सकाळ:
मदनगडावर राहण्याची काय मजा आहे, हे आम्हाला सुर्योदय बघितल्यावर समजलं. एका बाजूला अर्धवर्तुळाकार पसरलेला महाकाय अलंग, त्यामागुन उगवलेला सुर्य, आणि दुसऱ्या बाजुला कुलंग आणि त्याच्या माथ्यावर पडलेला सुर्याचा प्रकाश. सकाळच्या ८.०० वाजण्याच्या सुमारास हे दृश्य प्रत्यक्षंच अनुभवायला हवं. ते फोटोमध्ये किंवा शब्दांमध्ये उतरवणं खुप कठीण आहे.

मदनगडावरील सुर्योदय

मदनगडावरुन दिसणारे ते दृश्य डोळ्यात साठवून आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलो होतो. मदनगड उतरताना कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्यांच्या टप्प्याशी आम्ही पोहोचलो. खाली पाताळाकडे पाहून डोळे फिरण्याची वेळ आली होती. कुणाचीही उजवीकडे बघण्याची हिम्मतच होत नव्हती. कारण जरा तोल गेला, की थेट पाताळात अशीच ती जागा होती. अत्यंत हळुहळु आम्ही हा टप्पा उतरून खाली आलो. अजुनही रॅपलिंगचा टप्पा बाकी होता. पण आम्ही आता या सर्व प्रकारांना सरावलो होतो. त्यामुळे रॅपलिंग करायला फार वेळ लागला नाही. साधारण दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास आम्ही अलंग आणि मदन ह्यामधील खिंडीपर्यंत येऊन पोहोचलो. पुढे पायाला चाकं लावल्याप्रमाणे आम्ही दिड तासामध्ये आंबेवाडीमध्ये आलो.


अलंग-मदन ट्रेकचा आमचा चमु

तीन दिवसांचा हा अविस्मरणीय असा अनुभव होता. मी या लिखाणमध्ये तो जास्तीत जास्तं उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी म्हणतात तसं - "यू हॅव गॉट टू सी इट टू बिलिव्ह ईट".