सह्यभ्रमण ब्लॉगवर कधीपासुन माझ्या फ़्रान्समधल्या ट्रीपचा वृत्तान्त लिहायचं ठरवतोय, पण आज शेवटी मुहूर्त मिळालाय. सह्यभ्रमण हा ब्लॉग फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत न ठेवता त्यामधे इतर भटकंतीची माहितीसुद्धा आम्ही लिहायचं ठरवलंय.
नुकताच मी ल्युक्झेम्बुर्ग नावाच्या एका छोट्या पण अतिशय सुंदर देशामधे भटकंती करून आलो. त्याबद्दल लिहायचा हा एक प्रयत्न. गेले अनेक दिवस ल्युक्झेम्बुर्गला जायचं जायचं असं ठरत होतं. पण शेवटी ७ आणि ८ ऑगस्ट २०१० ला जायचं निश्चित झालं. माझी काथेलीन नावाची एक मैत्रीण या देशात रहात असल्यामुळे मला योग्य ती माहिती मिळु शकली. अजुन एक चांगली गोष्ट होती की जिचा संबंध थेट महाराष्ट्राशी होता. ती म्हणजे काथेलीन ज्या एन.जी.ऒ. साठी काम करते त्यांचं सध्या महाराष्ट्राशी संबंधित काम चालु आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की ल्युक्झेम्बुर्ग सारख्या इतक्या छोट्याश्या देशामधली एखादी संस्था भारतासाठी काम करत आहे.
तर ७ ऑगस्टला मी सारगोमीनहुन (फ़्रान्समध्यॆ ज्या ठिकाणी मी सध्या रहातो) निघालो. मी जिथे रहातो ते शहर फ़्रान्स, जर्मनी आणि ल्युक्झेंबुर्ग या तीनही देशांच्या सीमेवर आहे. त्यामुळे मला जरा सोयीस्कर होतं. मी जर्मनी मधल्या जार्ब्रुकेन नावाच्या शहरातुन लुक्झेंबुर्ग सिटी मधे पोचलो. मुळातच देश लहान असल्यामुळे इथली शहरं पण खुप छोटी आहेत. माझी मैत्रीण मला स्टेशनवर घ्यायला आली होती. साधारण सकाळी १०.४५ च्या सुमारास आम्ही पहिल्या ठिकाणी म्हणजे "शातो द विऑन्देन" ला जायला निघालो. जाता जाता मला शहराचं दर्शन घडत होतं. मला असं समजलं की या देशाच्या दक्षिणेकडील भागात बऱ्याच प्रमाणात वस्ती आहे आणि उत्तरेकडील भाग हा त्या मानानी कमी वस्तीचा आहे. आम्ही देशाच्या उत्तरेला चाललो होतो. साहजिकच मला मोकळी मैदानं, त्यामधेच काही घनदाट जंगलं बघायला मिळत होती. युरोपमधल्या आजवरच्या भटकंतीमधे मला एकदाही कुठे खराब रस्ते आहेत किंवा रस्तेच नाहीयेत असा प्रकार बघायला मिळाला नाही. साधारण तास भराच्या ड्राईव्ह नंतर (म्हणजे साधारण ७०-८० कि.मी) आम्ही शातो द विऑन्देन च्या पायथ्याशी आलो. हा किला विऑन्देन नावच्या एका गावाला लागुन असलेल्या टेकडी वर बांधला आहे. आजुबाजुला असलेल्या घनदाट झाडी मुळे या किल्याच्या जवळ येइपर्यंत याचं दर्शन होत नाही. आपल्याकडे दुर्दैवानी आजही किल्ले पर्यटनाच्या द्रुष्टीनी दुर्लक्षीतच आहेत. पण युरोप मधे याच्या बरोबर विरुद्ध परिस्थीती आहे. सहाजीकच आम्हाला इथे किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसत होते. इतके की आम्हाला आमची कार काही अंतरावर ठेउन चालत जावं लागलं. किल्ल्याच्या बाजुनी मुख्य प्रवेश द्वाराकडे जायची वाट आहे. एक १० मिनीटं चालल्यावर आम्ही किल्ल्यामधे येऊन पोचलो. इथे प्रत्येक किल्ल्यामधे जाण्यासाठी प्रवेश फी असते. ती भरुन आम्ही किल्य्यामधे प्रवेश केला. त्या आठवड्यामधे या किल्ल्यामधे विविध सांस्क्रुतिक कार्यक्रम होते. त्याचाच एक भाग म्हणजे इथे काही लोक पुर्वीच्या काळी घालत तसा वेश घालुन दिसत होते. किल्यामधे शिरताच आम्हाला या किल्ल्याचं म्हणा किंवा त्या काळात वाजवत तसं संगीत ऐकायला मिळालं. सॅक्सोफोन सारखी वाद्य आणि त्याबरोबर ड्रम असा त्यांचा ताफा होता. त्यांच्या बरोबरच काही लोक पुर्वीच्या काळी वापरत ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, भांडी, दागिने आणि इतकच नाही तर शस्त्रांची (खरी नाही) विकत होते. आम्ही किल्य्याच्या भोवती फेरी मारुन मुख्य दालनात प्रवेश केला. २ मोठे भव्य हॉल होते ते की जिकडे खाण्याच्या पदार्थां पासुन, वेगवेगळ्या प्रकारची पेय (स्वाभाविकपणे दारु देखील),भांडी, दागिने अश्या नानाविध गोष्टी विकायला होत्या. हे सगळं जरा वेगळच होतं यात काही शंका नाही. त्या नंतर आम्ही एका मोठ्या खोलीत प्रवेश केला जिकडे या किल्य्याच्या प्रतिक्रुती ठेवल्या होत्या. किल्ल्यच्या अगदी आरंभापसुन किल्ला कसा बांधत गेले याची काळाप्रमाणे झालेली स्थित्यंतर त्या प्रतिक्रुती मधुन दाखवली गेली होती. मुळात हा किल्ला ११व्या ते १४व्या शतकांच्या दरम्यान बांधला गेला होता. १५ व्या शतका पर्यंत हा किल्ला म्हणजे विऑंदेन मधल्या "काउंट", जे स्वतः ला फ़्रेंच रॉयल फ़ॅमिली चा हिस्सा मानायचे, त्यांच्या साठी एक महत्वपुर्ण जागा होती. तर आम्ही पुढच्या दालनात प्रवेश केला. हे म्हणजे या किल्या मधला स्वयंपाकघर होतं. ईथली भली मोठाली भांडी विशेष लक्षं वेधणारी होती. इथंला "बॅक्वेट हॉल" ज्याला मराठी मधे डायनिंग रूम :) असं म्हणतात तो देखील अति भव्य होता. इथल्या प्रत्येक खोली मधे पुर्वीच्या वापरात असलेल्या वस्तु आजही व्यवस्थीत जतन करुन ठेवल्या आहेत. वरील दालाना मधे नृत्य प्रयोग आणि संगीताचे कार्यक्रम चालु होते. सुदैवानी हे सगळं बघण्याचा योग जुळुन आला. किल्ल्याच्या सगल्यात वरच्या मजल्या वरुन विऑंदेन गाव आणि आजुबाजुचा परिसर फारच सुरेख दिसत होता. संपुर्ण किल्ला बघायला साधारण दीड तास लागतो. सध्या हा किल्ला युरोप मधल्या काही महत्वपुर्ण किल्ल्यांपैकी एक समजला जातो.
किल्ल्याच्या आतील प्रशस्त दालन
नॅशनल म्युजियम मीन दी फ़र (राष्टीय खाण संग्रहालय)
ल्युक्झेम्बुर्ग देशाच्या साधारण मध्यवर्ती भागात हे संग्रहालय आपल्याला बघायला मिळतं. एक अविस्मर्णीय अनुभव असच मी याचं वर्णन करीन. ल्युक्झेम्बुर्ग हा देश एके काळी खाणीं चा देश होता असं म्हणायला हरकत नाही इतक्या प्रमाणात इथे लोखंडच्या खाणी होत्या. इथल्या लोकांच उदर्निवाहाचं ते एकमेव साधन होतं असं म्हणायला हरकत नाही. पण आजच्या घडीला या सगळ्या खाणी बंद झाल्या आहेत. त्याची असतील अनेक कारणं. तर आम्ही दुपारी ३ च्या सुमारास या संग्रहालयापाशी येऊन पोचलो. जमिनीपासुन साधारण १०० मीटर खाली ही पुर्वीची खाण आणि आजचं संग्रहालय आहे. त्यामुळे खाली जाण्यासाठी एक छोटी ट्रेन आहे. काळजी करु नका ही ट्रेन १०० मीटर सरळ खाली जात नाही तर बरीच लांबुन फिरत खाली जाते. इथे दर अर्ध्या किंवा एक तासानी ही ट्रेन आहे. ही ट्रेन सहाजीकच पुर्ण्पणे बंद असते त्यामुळे काही लोकांना याची भीती वाटु शकते त्यातुन खाली जाताना पुर्णपणे अंधार असतो. या ट्रेन बरोबर म्हणजे त्या ट्रेन मधल्या ग्रुप बरोबर एक गाइड असतो जो किंवा जी आपल्याला संपुर्ण संग्रहालयाची माहीती देतात. इथे एक अडचण अशी आहे की ही माहीती फ़्रेंच किंवा जर्मन मधे दिली जाते त्यामुळे तुम्हाला भाषा तरी माहीती पाहीजे किंवा तुमच्या बरोबर अशी व्यक्ती पाहीजे जी तुम्हाला समजावु शकेल. अजुन एक म्हणजे आपण १०० मीटर खाली जात असल्यामुळे तापमानात एकदम फरक पडतो. साधारणपणे खाली ९ ते १० डिग्री तापमान असतं (माझ्या मते अजुनही कमी) त्यामुळे स्वेटर्स घेऊन जाणं चांगल. तर ४ वाजता आम्ही ट्रेन नी खाणी मधे जायला सुरुवात केली. जसे जसे आम्ही खाली जाउ लागलो तशी थंडी जाणवायला लागली. साधारण २०-२५ मि. आम्ही खाणीमधे येऊन पोचलो. जाताना वाटेत खाणी मधे वापरलेली जुनी मशीन्स, हत्यारं, लोखंड वाहून नेण्याच्या गाड्या ज्याला फ़्रेंच मधे "बर्लिन"असं म्हणतात पहायला मिळाले. खाली पोचल्यावर आमच्या गाईड नी आम्हाला माहीती द्यायला सुरूवात केली. पुर्वी या खाणीमधे खाण कामगार कंदिलाच्या दिव्यामधे काम करत असत. कामाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशी १२ तास. २ कामगार मिळुन साधारणपणे २ टन लोखंड बर्लिन मधुन वाहून नेत असत. कामगारांना त्यानी जमवलेल्या लोखंडा वर पैसे मिळत. त्यातुन या कामगारांना डोक्यावार घालायला हेल्मेट पण नसत. ही सगळी माहीती एकून त्या काळातल्या लोकांनी कशी कामं केली असतील हेच समजत नाही. पुढे बर्लिन वाहुन नेण्यासाठी घोड्यांच वापर चालु झाला. जसा जसा काळ सरत गेला तशी तशी आधुनिक यंत्र वापरत येऊ लागली. सुरूंग लावण्याच्या पद्धती बदलल्या. या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी जतन करुन ठेवल्या आहेत. अगदी कामागारांनी वापारलली हत्यारं, त्यांचे कपडे, त्या वेळी औषधोपचारासाठी वापारण्यात आलेल्या वस्तु सगळं इथे बघायला मिळतात. केवळ पोटासाठी किती मोठी जोखीम त्यावेळचे कामगार घेत होते हे आपल्याला समजत. संपूर्ण खाण किंवा हे संग्रहालय बघायला साधारण १ ते १.३० तास लागतो पण हा वेळ कधी निघुन जातो हे समजत नाही.साधारण साठ च्या दशकात इथल्या सगळ्या खाणी बंद झाल्या. तुम्ही ल्युक्झेम्बुर्ग ला आलात तर ह्या संग्रहालयाला नकीच भेट दिली पाहीजे.
१०० मीटर जमिनीखालील खाण
खाणीमधला रेल्वे मार्ग
ल्युक्झेम्बुर्ग सिटि
ल्युक्झेम्बुर्ग शहर म्हणजे साधारण पाच लाख लोकसंख्या असलेल्या या देशातल मुख्य शहर किंवा मुख्य भाग अस आपण म्हणू. ल्युक्झेम्बुर्ग शहरामधली महत्वाची ठिकाणं म्हणजे इथलं "नोत्र दाम" नावाच चर्च, इथल्या राजाचा उंची महाल आणि इथला किल्ला. मुळात हे शहर एक टेकडी वर वसलं होतं जो इथला एक किल्ला आहे. महाराजांच्या काळात किल्ल्याची जी संकल्पना होती तीच इथे वापरली होती. त्यामुळेच इथली सगळी महत्वाची ठिकाणं (ज्याचा उल्लेख मी केला आहे) ती आणि सगळी सरकारी कार्यालायं याच किल्य्यामधे आहेत. हा किल्ल्याचा भाग आणि जी नवीन वस्ती आहे यांना जोडणारे अनेक ब्रीज आपल्याला बघायल मिळतात. याच शहरात आर्सेलर मित्तल(म्हणजे लक्ष्मी मित्तल या जगप्रसिद्ध उद्योगपती ज्याला स्टील मॅन असही म्हणता येइल) या कंपनीचं मुख्य कार्यालय पण आहे. या देशात तीन भाषा बोलल्या जातात. ल्युक्झेंबुर्ज्वाज ही त्यांची भाषा आणि त्याच बरोबर फ़्रेंच आणि जर्मन या भाषा देखील बोलल्या जातात. शहरामधे बसेसची उत्तम सोय आहे त्याच बरोबर मेट्रो सेवा सुधा उपलब्ध आहे. युरोपच्या दॄष्टीनी या शहराला विशेष महत्व आहे कारण युरोपीयन युनियन ची काही महत्वपुर्ण कार्यालयं याच शहरामधे आहेत.
इथल्या राजाचं "ड्युक" च निवासस्थान
किल्ल्याचा काही भाग
नोत्रदाम चर्च
आर्सेलर मित्तल कंपनीच मुख्य कार्यालयसंपुर्ण शहर हे साधारण २ तासामधे बघुन होतं. मी तुम्हाला साधारण कल्पना येईल या दृष्टीनी लिहायचा प्रयत्न केला आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला या माहीतीचा उपयोग होईल.
No comments:
Post a Comment