Saturday, June 12, 2010

किल्ले तैलबैल

लोणावळ्याजवळचे तुंग-तिकोना, लोहगड-विसापुर, कोराईगड, घनगड हे गड आम्ही बघितले होते. पण याच भागातला एक किल्ला त्याच्या विशिष्ट आकारामुळे आमचं नेहमीच लक्षं वेधुन घेत असे. आमचंच नाही तर गिर्यारोहण करणाऱ्या प्रत्येकाला ह्या किल्ल्यावर जायची ओढ असते यात काही शंकाच नाही. हा किल्ला म्हणजे "तैलबैला". हा किल्ला म्हणजे दोन सरळसोट, साधारण आयताकृती कातळ कडे की जे पार करण्यासाठी प्रस्तरारोहण हा एकच मार्ग आहे. एखाद्या डोंगरावर दोन भिंती आणुन बसवाव्या अशी याची रचना आहे. पण या किल्याचं भौगोलिक स्थान हे पण महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इतिहासाचा थोडासा संदर्भ घेतला तर याचं महत्व आपल्याला लक्षात येईल. हा किल्ला आहे घाटावर, पण त्याचवेळेस कोकण भागाला अत्यंत जवळ. स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाबरोबरच ज्या गडाचा विचार झाला होता तो सुधागड तैलबैल किल्ल्यावरुन अगदी समोर हाकेच्या अंतरावर दिसतो. त्यामुळे सुधागडाचं रक्षण करण्यासाठी ह्या किल्ल्याला नक्कीच महत्वपुर्ण स्थान होतं. अजुन एक कारण म्हणजे "सवाष्णी घाट", जो कोकण आणि घाटामधला एक महत्वपुर्ण दुवा होता. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठीही तैलबैल किल्ल्याचं स्थान उपयुक्त होतं.

या किल्ल्यावर जायचं अचानक जमुन आलं. दुर्गरसिक-इग्नाईट अशा दोन ट्रेकिंग करणाऱ्या संस्थांनी ह्या किल्ल्यावर जायचा बेत आखला होता. ह्या ग्रुपबरोबर जायची संधी आम्हाला मिळाली. एखाद्या ट्रेकिंग ग्रुपबरोबर जायची ही आमची पहिलीच वेळ होती. पण अशा किल्ल्यावर जायचं म्हणजे ग्रुपबरोबर जाणं हेच उपयोगी पडत असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरं कारण म्हणजे प्रस्तरारोहणाचा मनमुराद आनंद इथे घेता येणार होता. आमचा नुकताच अलंग-मदन ट्रेक झाल्यामुळे सहाजिकच जाण्याचा उत्साह अधिक होता. एक गोष्ट इथे नमुद कराविशी वाटते. ती म्हणजे प्रस्तरारोहणाची भिती वाटायलाच हवी कारण कुणी असं म्हटत असेल की मला ह्याची अजिबात भिती वाटत नाही तर याचा अर्थ तुम्हाला त्याची गंभीरता समजत नाही. ती भितीच आपल्याला कायम जागरुक ठेवते.

तर आम्ही ठरल्याप्रमाणे ७ जानेवारी २००८ ला रात्री ९.३० वाजता मनोजच्या घरी जमलो. अमोघ ठाण्याहून परस्पर लोणावळ्याला येणार होता. आमच्या ग्रुपमध्ये अमोघ आणि चैतन्य हे दोन हशम पुण्याबाहेर नोकरी करतात. पण तितक्याच उत्साहानी प्रत्येक ट्रेकला असतातच ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. ट्रेकिंगचं वेड, अजुन दुसरं काही नाही. पुण्याहुन निघुन सुमोने आम्ही लोणावळ्याला आलो. अमोघ तिथे आम्हाला जॉइन झाला आणि आम्ही गडाकडे कूच केलं. लोणावळ्याहुन आय. एन. एस. शिवाजीच्या रस्त्याला (ज्याला वायुमार्ग असंही म्हणतात) आम्ही लागलो. कोराईगडावरुन पुढे आल्यावर उजवीकडे आंबवणे गावाकडे जाणारा रस्ता पकडला. आंबवणे-सालतर अशी गावं सोडली की उजवीकडे तैलबैल गावाकडे जाणारी पाटी आपल्याला दिसते. या रस्त्याला आम्ही लागलो त्यावेळेस रात्रीचे १२.३० वाजले होते. पौर्णिमा असल्यामुळे स्वच्छ चंद्रप्रकाश पडला होता. त्यामध्ये दिसणाऱ्या त्या किल्ल्याच्या दोन भिंती फारच सुंदर दिसत होत्या. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडं चांगदेवांना भेटायला एका भिंतीवर बसुन गेले होते. कदाचित त्यातलीच एक भिंत इथे असावी. यातला गमतीचा भाग सोडा, पण इतक्या सरळसोट अशा ह्या तैलबैल किल्ल्याच्या भिंती आहेत. पहाटे साधारण १.१५ वाजण्याच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे तैलबैल गावामध्ये येऊन पोहोचलो. गावामध्ये एक मारुती मंदिर आहे. त्या मंदिराच्या आवारात आम्ही आमचा डेरा टाकला. चंद्राचा छान प्रकाश पडला होता, मध्येच वाऱ्याची एखादी झुळुक येत होती. झोप न लागण्याचं काही कारणच नव्हतं. अशा वातावरणात रहाण्याची मजा काही औरच आहे. त्याचं शब्दामध्ये वर्णन करणं शक्य नाही.

सकाळी ६.१५ ला आम्ही उठलो. ह्यावेळेस ग्रुप बरोबर आलो असल्यामुळे सकाळी उठुन चहा-नाश्ता बनवणे ही भानगडच नव्हती. उलट आमच्या हातामधे तयार उपमा आणि चहा देण्यात आला. हे आमच्यासाठी खुपच वेगळं होतं. सकाळी ७.३० ला आम्ही "कोल" च्या म्हणजे खिंडीच्या दिशेनी जायला निघालो. आम्ही जसे कातळकड्य़ांच्या जवळ येऊ लागलो तशी त्यांची भीषणता जाणवायलात लागली. काही क्षणात आम्ही त्या दोन महाकाय भिंतींच्या पायथ्याशी येऊन पोचलो. ह्या दोन कातळ टप्प्यांसमोर आम्ही म्हणजे किड्य़ा-मुंगीसारखे होतो. साधारण ८.०० वाजता आम्ही प्रत्यक्ष खिंडीमध्ये येऊन पोहोचलो. इथे एक शंकराचं मंदिर आहे, आणि बाजुला पाण्याचं एक टाकं आहे. हा सगळा परिसर प्रस्तरारोहण करणारी माणसं आणि त्यांना लागणारी हत्यारं ह्यानी पावन झाला होता. गेल्यागेल्या आम्हाला तिथे एक फॉर्म भरायला सांगितला. नंतर आम्ही सगळ्यांनी कमरेचा खोगीरपट्टा(सीट हार्नेस), स्क्रुड कॅरॅबिनर्स, डिसेंडर, कमरेला सुरक्षेचा उपाय म्हणुन स्लिंग (अत्यंत दणकट रोप) अशा सगळ्या साहित्यानिशी सुसज्ज झालो. पुढच्या तासाभारामध्ये सर्व क्लाईंबर्सनी आपापल्या पोझिशन्स घेतल्या आणि ९,१५ वाजता सह्यभ्रमणने चढाईला सुरुवात केली. पहिला प्रस्तरारोहणाचा ४० फुटांचा टप्पा पार करावा लागतो. हा टप्पा पार करता यावा म्हणुन क्लाईंबर्सनी रोप व्यतिरिक्त एक शिडी लावुन ठेवली होती. या रोप लाइनच्या आणि हलत्या शिडीच्या सहाय्यानी हा टप्पा पार करणं शक्य झालं. अर्थात हा टप्पा सोपा नक्कीच नव्हता. दोन्ही हातांनी एकतर शिडीला किंवा रोपला धरुन शिडीवर पाय टाकत जाताना हाताची आणि खांद्यांची खरंच वाट लागत होती. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःचं शरीर जोर लावुन वरती खेचावं लागत होतं.
पहिल्या टप्प्यासाठी लावलेली शिडी

तर अशा प्रकारे पहिली किर्ती मग मी त्यापाठोपाठ प्रणव, मनोज, अभय, अनिरुध्द असे सगळे हा टप्पा पार करुन वरती आलो. हा ३० ते ४० फुटांचा टप्पा पार केल्यावर अजुन एका २५ फुटांच्या कातळ टप्प्याशी आम्ही येऊन पोहोचलो. इथे दस्तुरखुद्द भाऊच (विकास सातारकर) मदतीला असल्यामुळे पुढचा टप्पा पार करण्याचं टेन्शन आपोआप कमी झालं. हा पुढचा टप्पा छोटा असला तरी ह्याला "एक्सपोजर" खुप आहे. आणि जाण्याची जागासुधा त्यामानाने खुपच छोटी आहे. ह्या टप्प्यावर तीन रोपलाईन्स, होत्याच पण त्याशिवाय पाय ठेवायला सोपं जावं म्हणुन "स्टाईप्स"सुधा मारुन ठेवल्या होत्या. कातळ टप्प्याच्या खालच्या बाजुला भाऊ आणि वरच्या बाजुला रवी देशपांडे असे दोन अत्यंत अनुभवी क्लाईंबर्स होते. येणाऱ्या प्रत्येकाला हापसुन वर खेचण्याचं अत्यंत जिकिरीचं काम हे दोघंजण पार पाडत होते. हे दोघे क्लाईंबर्स कड्य़ाच्या इतक्या टोकावर थांबले होते की जिथे हलायला बिल्कुल वाव नव्हता.

दुसऱ्या टप्प्यानंतर लागणाऱ्या अरुंद पायऱ्या

हा कातळटप्पा पार केला की अजुन एक छोटासा टप्पा लागतो. इथे प्रचंड प्रमाणात "स्क्री" आहे. त्यामुळे पावलं जपुन टाकावी लागतात. तर असे एकुण तीन टप्पे पार करुन आम्ही समीटला म्हणजे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. गडाच्यामाथ्यावरुन आपण दोन वेगवेगळ्या लेव्हल्स सहज पाहु शकतो. वर म्हणजे घाट माथा आणि खाली कोकण. गडावरुन एका बाजुला सुधागड आणि पालीचा सरसगड, तर दुसऱ्या बाजुला घनगड दिसतो. आणि ह्या सगळ्यांमधे काही दिसत असेल तर फक्त पाताळ. सह्याद्रीचं रौद्र रूप आपल्याला इथुन दिसतं.

गडाचा माथा


गड माथ्यावरुन दिसणारा सुधागड

नेहमीप्रमाणे आम्ही गडमाथ्यावर एक चमुचित्र काढुन परत खाली उतरायला लागलो. प्रस्तरारोहणाचे दोन टप्पे पार करुन आम्ही टाक्यापाशी येऊन पोहोचलो. इथुन १५० फुटाचा टप्पा पार करायचा होता. याचं वैशिष्ठ्य ते असं की ३०-४० फुटांचा टप्पा पार केला की एक पुढे आलेला प्रस्तर (ओव्हरहॅग) येतो की जिथुन पुढे आपल्याला कसलाही आधार न घेता हवेमधे ९० अंशामधे बसुन रोपच्या साहाय्याने खाली यावं लागतं. रॅपलिंगचा खरा आनंद आपल्याला इथे मिळतो. आम्ही नुकतंच सरसरत खाली जाणं (रॅपलिंग) केलेलं असल्यामुळे हा १५० फुटाचा टप्पा आम्ही खुप छान अनुभव घेत पार केला. हा सरसरत खाली जाण्याचा टप्पा पार करायला आम्हाला प्रत्येकाला सधारण ४ ते ५ मिनिटं लागली. प्रत्येकजण खाली आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि ते समाधान हे शब्दामध्ये उतरवणं खरच कठीण आहे. ज्याला याचा अनुभव घेता येईल त्याने खरच तो घ्यावा. ब्रम्हानंद असं मी याचं वर्णन करीन.
सकाळी ९.१५ वाजल्यापासुन ते शेवटचा हशम खाली येइपर्यंत म्हणजे साधारण दुपारी २.१५ पर्यंत एकेक क्षण आम्ही अक्षरशः "एन्जॉय" केला. अत्यंत अविस्मरणीय असा हा तैलबैल किल्याचा आमचा अनुभव ठरला.उतरताना केलेलं रॅपलिंग


मोहिम फ़त्ते केलेला सह्यभ्रमण चमु

अलंग-मदन

आज पहिल्यांदाच स्वतःहुन काहीतरी लिहायचा प्रयत्न करतोय. बघू कितपत जमतंय ते. तसं ट्रेकिंग आता काही नवीन राहिलं नाहिये. उलट आता त्याचं वेड लागलंय. पण जसं म्हणतात की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, तसंच वेड लागल्याशिवाय तो बघूनही होत नाही. कदाचित या वेडापायीच आज जवळ जवळ ७५ ते ८० किल्ले बघून झाले आहेत. आज कुठे त्याबद्दल लिहावं असं वाटलं. हरकत नाही. ते म्हणतात ना "बेटर लेट दॅन नेव्हर".

आता जरा पार्श्वभुमी सांगतो. तसं २००६ मधे मी, प्रणव, अनिरुद्ध (दोघेही केळकर), अंबरीश हिंगे आणि मानस पाटणकर असा ग्रुप झाला आणि आम्ही ट्रेकिंग चालू केलं. तेव्हापासून जे सुरू झालं ते आजही सुरुच आहे. याला खरी गती मिळाली ती डिसें २००७ मध्ये किल्ले तोरण्यापासुन. जिथुन शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्य उभारणीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला, त्या तोरण्यापासुनच आम्ही किल्ले बघण्याचा सपाटा लावला आहे. बहुतेक या किल्ल्यामधेच काहितरी जादूई शक्ती आहे. पण खरं कारण म्हणजे आमच्या ग्रुप मधे अजून दोन ट्रेकिंग वेड्य़ा लोकांचा झालेला समावेश आणि ते दोघं म्हणजे श्री आणि सौ किर्ती मनोज केळकर. त्यानंतर अजुन दोन ट्रेकिंग वेड्य़ा व्यक्ति यात आल्या. त्या म्हणजे अमोघ बापट आणि अभय नेरूरकर. आता आमचा ग्रुप आम्ही "सह्यभ्रमण" या नावानी संबोधतो. यामधे आम्ही आठ जण असे आहोत की जे प्रत्येक ट्रेक मध्ये असतातच. ५ केळकर, चितळे, बापट आणि नेरुरकर असा आमचा ग्रुप आहे.

आत्तापर्यंत आम्ही अनेक छोटे मोठे ट्रेक केले, मग तो कोयना नगर-चांदोली चा भैरवगड, प्रचितगड, महिमतगड असोत किंवा मग सोलापूर-औसा-परांड्य़ाचे भुईकोट किल्ले असोत. पण ह्यावेळचा ट्रेक जरा वेगळाच होता. कारण ह्यावेळी आम्ही अलंग-मदन या दोन महाकाय गडांवर जायचा बेत केला होता. सह्याद्रीतल्या काही कठीण किल्ल्यांपैकी असे हे दोन किल्ले म्हणायला हरकत नाही. कारण ह्यांना फक्त उंचीच नाहीये तर इथे प्रस्तरारोहण केल्याशिवाय वर जाताच येत नाही. अनेक दिवस आम्ही ह्या ट्रेकचा बेत आखत होतो आणि तारखांची जुळवाजुळव करत होतो. अखेरीस २६ ते २९ डिसें २००८ ह्या चार दिवसात हा ट्रेक करायचा बेत पक्का झाला. या वेळेस फक्त आम्ही ८ लोकंच नव्हतो तर क्लाईंबर्सना सुद्धा जमणं तितकंच महत्वाचं होतं. सुदैवानी त्याच दरम्यान हे क्लाईंबर्स याच दोन गडांवर अजून एका ग्रुपला घेऊन जाणार असल्यामुळे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित जमून आल्या. विकास (ज्यांना भाऊ असंच म्हणतात), हेमंत आणि चिन्या असे तीन क्लाईंबर्स आमच्या बरोबर होते. यांच वैशिष्ठ्य म्हणजे यांनी आम्हाला नुसतीच रॉक क्लाईंबिंगला मदत नाही केली तर त्यासाठी जी काही हत्यारं लागतात त्याचीही माहिती दिली आणि ती कशी वापरायची हे पण व्यवस्थित सांगितलं. ह्यामुळे जरी हा आमचा पहिलाच रॉक क्लाईंबिंगचा अनुभव असला तरी भिती कधी वाटली नाही.

झालं, आमच्या जायच्या तारखा नक्की झाल्या आणि नेहमीप्रमाणे एकमेकांना फोन करणं, काय काय वस्तु घ्यायच्या या सगळ्याची तयारी करणं या गोष्टी ओघानी आल्याच. ह्या ट्रेकला परदेश प्रवासाला जाताना जसं बॅगच्या वजनाचं बंधन असतं तशीच काहीशी परिस्थिती होती. कारण खुप उंची गाठायची होती आणि पायपीट सुद्धा खुप करावी लागणार होती. ह्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे सॅक पाठीवर घेऊन रॉक क्लाईंबिंग करायचं होतं. असं सगळं असलं तरी "सैन्य हे नेहमी पोटावर चालतं" हे वाक्य कायम डोक्यात ठेऊन नेहमीप्रमाणे खाण्या-पिण्याचा मुबलक साठा आम्ही घेतला होता. त्यासाठी चार दिवस आधी खरेदी करण्यात आली. रेडी-टू-ईट भाज्या, उपमा, सुप, टेट्रा पॅक मिल्क, कॉर्नफ्लेक्स इ. इ. इ. मी लिहीत बसलो तर हे पान संपुन जाईल. पण एक मात्र नक्की की ट्रेकला तुम्ही रिकाम्या पोटी गेलात की त्रास हा होणारच. भरल्यापोटी "यू कॅन गो प्लेसेस". तर ठरल्याप्रामाणे सामानाची जमवाजमव आणि बांधाबांध करुन आम्ही ठरल्याप्रमाणे रात्री १०.१५ ला मनोजच्या घरी पोचलो. साधारणपणे आम्ही सुमो करून ट्रेकला जातो. ह्यावेळी नेहमीचं ५ केळकर, चितळे, बापट, नेरूरकर हे समीकरण जरा बदललं होतं. अंबरीश हा आमच्या ग्रुपमधला "हशम" अनेक महिन्यांच्या गॅपनंतर परत ग्रुपमध्ये सामील झाला होता. अंबरीश बरोबरच आनंद आणि निलेश असे एकुण तीन जण या ट्रेकमध्ये अ‍ॅड झाले होते. या सेनेचे सेनापती म्हणजे तीन क्लाईंबर्स असा एकुण १४ जणांचा ग्रूप बनला. त्यामुळे ह्यावेळी १७ लोकांची टेम्पो ट्रॅव्हलर केली होती.

२६ डिसें. ला रात्री ११.०० च्या सुमारास आम्ही प्रवासाला सुरूवात केली. पुण्याहून संगमनेर-राजूर-अकोले-बारी-आंबेवाडी असा आमचा प्रवास होता. पुण्याहुन निघाल्यावर पहाटे साधारण २.३० ते ३.०० च्या सुमारास आम्ही बारी नावाच्या गावामधे पोचलो. बारी म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याचं गाव. पहाटेच्या वेळेस गोठवणाऱ्या थंडीत आम्ही इथे थोडावेळ थांबलो होतो. सहाजिकच बाहेर पडण्याची हिंमत कोणामधे नव्हती. याचं कारण म्हणजे ती वेळ एकतर असं बाहेर फिरण्याची नव्हती आणि कोणी धाडस करून गेलं तरी तो दुसऱ्या मिनिटाला बसमध्ये येऊन बसणार इतक्या प्रमाणात इथे थंडी पडली होती. आम्ही ११ जणं डांबुन ठेवल्यासाखे बसमध्ये बसलो होतो. साधारण ६ वाजण्याच्या सुमारास आम्ही बारी गावामधून प्रयाण केलं. इथलं वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या आडगावामधेही रस्ते एकदम सुस्थितीतले होते. अचानक आमचं लक्ष उजवीकडे डोंगरावर असणाऱ्या पवनचक्क्यांनी वेधुन घेतलं. हा कुठला डोंगर असा विचार करेपर्यंत त्यांची नावेही पुकारून झाली होती. आड-आवंढा-पट्टा-बित्तिंगा या चार किल्ल्यांपैकी आड आणि पट्टा असे ते दोन गड होते. किर्ती आणि मनोज केळकर या दोघांनी मिळुन जवळ जवळ २५० किल्ले बघितले आहेत. त्यापैकीच हे दोन किल्ले होते बहुतेक. नुसते डोंगर बघुन ते ओळखण्याची दैवी देणगी ज्या काही लोकांना असते त्यापैकी हे श्री आणि सौ केळकर. या किल्ल्यांची नावं ऐकली की एखाद्याला वाटेल की हे कर्नाटकातल्या "बिदर" किंवा "हुबळी" भागातले असतील. काही अंतर पुढे गेल्यावर एका वळणावर अलंग-मदन-कुलंग या त्रयींचं दर्शन घडलं आणि त्यावर जाण्याची उत्सुकता अजुनच वाढायला लागली. आतापर्यंत नारायणरावांनी आपलं डोकं वर काढलं असल्यामुळे थंडीचा कडाका कमी होण्यास सुरूवात झाली होती. पुढे जाऊन आंबेवाडीच्या जरा आधी एका शेतात आम्ही नाश्ता करायला थांबलो. साधारणपणे नाश्ता म्हटलं की आम्ही उपमा हा सर्वमान्य आणि पोटभरीचा पर्याय अवलंबतो. पण ह्यावेळेस मात्र यात बदल झाला होता. अनिरूद्धनी चक्क उकडलेली अंडी आणली होती. आमच्या सह्यभ्रमणच्या ट्रेकला खायची वगैरे अशी वेळ नसतेच. मग ते रात्रीचे १२ असोत किंवा पहाटेचे ३ वाजलेले असोत किंवा अगदी सकाळचे ९, आम्ही सगळे नाश्त्यावर तेवढाच ताव मारतो. त्यामुळे उकडलेली अंडी आणि ब्रेड हे संपायला फार वेळ नाही लागला. त्यानंतर क्लासेसनी चहा आणि मासेसनी कॉफी असा शेवट झाला. आम्ही कुठेही ट्रेकला गेलो असलो तरी एक वेळ नाश्ता किंवा जेवण करायला विसरु पण चहापानाचा कार्यक्रम व्ह्यायलाच हवा. तर अशा प्रकारे नाश्ता आणि चहापान आटपुन आम्ही आंबेवाडीकडे कुच केलं. आमची गाडी गावात येते ना येते तोच सारा गाव आमच्या भोवती जमायला सुरुवात झाली. आम्ही सगळ्या सामानाची आवराआवर केली, ड्रायव्हरची खायची प्यायची (जी ड्रायव्हरनी नंतर स्वतंत्रपणे सुधा केली असेल) व्यवस्था करून अलंगगडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. सकाळचे साधारणपणे ९.३० वाजले असतील. सगळ्यांकडेच प्रचंड प्रमाणात सामान असल्यामुळे चालण्याचा वेग तसा हळुच होता. थोडी चढण चढुन गेल्यावर आम्ही एका ओढ्याच्या कडेला येऊन पोहोचलो. यानंतर खरा रस्ता उजवीकडे गेला होता, पण आम्ही रस्ता चुकणे या आमच्या प्रथेला अनुसरुन डावीकडील चुकीची पायवाट पकडली. यामधे आमचा जवळजवळ एक तास वाया गेला. पण अखेरीस आम्हाला योग्य वाट सापडली आणि आम्ही अलंगगडावर जायच्या रस्त्याला परत लागलो. काही अंतर पुढे गेल्यावर जेव्हा वर बघितलं तेव्हा आम्हाला प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाईंबिंगचा) पॅच द्रुष्टीस पडला. आमच्या आधी गडावर जो ग्रुप गेला होता तो ग्रुप हा प्रस्तरारोहणचा टप्पा खाली उतरत होता. ते दृष्य पाहून छातीत थोडी धडकी भरली. पण प्रस्तरारोहणाचा टप्पा अजुन आला नव्हता त्यामुळे अज्ञानात सुख मानून आम्ही पुढे चालत राहीलो. काही अंतर गेल्यावर आम्ही एका दगडामधे कोरलेल्या मारुतीजवळ आलो. सगळेच जण चालुन आणि जड सॅक्स वाहुन दमलो होतो. त्यामुळे थोडी विश्रांती घेतली. आता पुढे खडी चढण आणि मग प्रस्तरारोहणाचा टप्पा असल्यामुळॆ देवाच्या चरणी नारळ फोडून आणि पुढे जाण्याची शक्ति दे अशी प्रार्थना करुन आम्ही आता शेवटचा टप्पा पार करण्यासाठी पुढे निघालो. पुढील टप्प्यामधे जरी तीव्र चढ असला तरी रॉक क्लाईंबिंगच्या ओढीने आम्ही ती खडी चढण झटकन पार केली. अखेरीस आम्ही अंतिम रॉक पॅच पाशी येऊन पोहोचलो. भाऊ, म्हणजे विकास सातारकर, हे आमच्या स्वागताला होतेच. रॉक पॅचचा पहिला टप्पा तसा सोपा होता. इथे दोन रोप बांधुन ठेवले होते. एक होता तो सेफ्टी बेल्ट जो आम्ही कमरेला बांधला होता आणि दुसऱ्या रोपला धरून आम्ही वरती चढत गेलो. हा रॉक पॅच साधारण २५ ते ३० फुटांचा असेल.

अलंगचा पहिला रॉक पॅच

आता इथुन पुढे आमची खरी कसोटी होती. पुढे किल्ल्याचा साधारण ५० ते ६० फुटांचा सरळसोट कातळकडा चढुन वरती जायचं होतं. भाऊंनी आधी आम्हाला कातळावर लावलेल्या रोपची आणि प्रस्तरारोहणात वापरण्यात येणाऱ्या हत्यारांची प्राथमिक माहिती दिली. या कातळकड्य़ावर ४ रोप लावले होते. त्यापैकी प्रत्येक रोपचं काय महत्व आहे ते भाऊंनी आम्हाला समजावुन सांगितलं. यानंतर भाऊ स्वतः त्या कातळ कड्य़ावरून फ्री क्लईंब करुन वर गेले. ते इतक्या लिलया वर चढत गेले की हे किती सोपं आहे असं वाटायला लागलं. पण तेव्हा कुठे माहीत होतं की हा केवळ एक भ्रम होता. यानंतर प्रथम किर्ती हा कातळ टप्पा पार करण्यासाठी तयार झाली आणि काही मिनिटांत तिने हा कातळ टप्पा पार केला. कातळावर लावलेल्या ४ रोप पैकी एका रोपला दोन्ही हातानी पकडुन वर जावं लागणार होतं. त्या रोपचं दुसरं टोक वर लावलेल्या पुली मधुन पास करून खाली सोडलं होतं. एकतर स्वतः एक रोप खेचत स्वतःला वर खेचायचं (ज्यामध्ये दोन्ही हात आणि खांदे बधीर होतात) किंवा खाली उभा असलेला माणुस एक रोप खेचतो जेणेकरून क्लाईंबिंग करणारा वरती जाऊ शकतो. अशी ही एकंदरीत यंत्रणा होती. तर अशाप्रकारे किर्ती, प्रणव, अनिरूध्द असे एकापाठोपाठ एक तो टप्पा पार करुन गेले. मी आणि अमोघ ही आमच्या ग्रुप मधली वजनदार व्यक्तिमत्वं असल्यामुळे सहजिकच आम्हाला खेचण्यासाठी जास्त जोर लावावा लागणार होता. मी हा टप्पा पार करताना स्वतःला खेचत वरती गेलो. त्यामुळे वरती पोहोचेपर्यंत माझा पूर्णपणे शक्तिपात झाला होता. इतरांनी मदत केलीच. यात अमोघ, हेमंत, चैतन्य, अंबरीश या लोकांचे विशेष आभार मानायला पाहिजेत कारण ८५ किलो वजन खेचणं ही कही चेष्टा नाहीये. एकेक करुन साधारण १ ते १.३० तासांनी आम्ही ११ जणांनी हा टप्पा पार केला. हे सगळं सुरळीत पार पडलं याचं एकमेव कारण म्हणजे भाऊ, हेमंत आणि चिन्या. या तिघांचे विशेष आभार मानायला पाहिजेत. अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने या तिघांनी आम्हाला प्रस्तरारोहण शिकवलं आणि आमच्याकडुन करवून घेतलं.

अलंगचा दुसरा रॉक पॅच

हा टप्पा सोडल्यावर पुढे उजवीकडे कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या. एका वेळेस एक माणुस जाऊ शकेल एवढ्याच आकाराच्या या पायऱ्या होत्या. त्यावर भल्यामोठ्य़ा सॅक घेऊन चढणं म्हणजे खरंच कसरत होती कारण उजव्या बाजुला जरासा जरी पाय घसरला असता तरी........ ह्या टप्प्यावर सुद्धा सेफ्टी रोप्स होते. त्यामुळे हा टप्पा पार करणं फारसं कठीण गेलं नाही. तर अशी सधारण २.३० ते ३ तासांची कसरत करुन आम्ही अखेरीस दुपारी ३.३० च्या सुमारास गडमाथ्यावर पोचलो असु. सकाळी ९.३० वाजल्यापासुन (काही वेळाची विश्रांती वगळता) आमची सतत पायपीट चालु होती. त्यामुळे सगळ्यांनाच भुक लागली होती. गडावर एका वेळेस २० ते २५ लोक राहु शकतील एवढी मोठी गुहा आहे. गुहेमध्ये गेल्यावर सामान ठेवलं आणि स्टोव्ह पेटवला. पाणी गरम करायचं होतं. आमच्याकडे असलेल्या रेडी-टू-इट भाज्या गरम केल्या. पोळ्या, गरम गरम भाजी, श्रीखंड हे संपायला फार वेळ लागायचं काही कारणच नव्हतं. सगळ्यांनी अक्षरशः जेवणावर ताव मारला.

अलंगगडाचे विहंगम दृश्य

साधारण ५.०० वाजण्याच्या सुमारास आम्ही गडावर फेरफटका मारायला निघालो. गुहेच्याच बाजुनी एक वाट वर जाते. काही अंतर गेल्यावर आपल्याला वाड्य़ाचे काही अवशेष दिसतात. काही जोती दिसतात. यानंतर काही अंतर पुढे गेलं की एकात एक गुंफलेली १० ते १२ टाकी दिसतात. ही सगळी बांधीव टाकी आहेत हे त्यांच्या एका बाजुला असलेल्या कठड्य़ावरून सहज लक्षात येतं. ही टाकी मागे टाकुन पुढे जातो तोच आमची नजर उजवीकडे असलेल्या वाड्य़ाकडे गेली. याची एक बाजु पुर्णपणे जमीनदोस्त झाली होती. बाकी तिन्ही बाजु अजुन चांगल्या स्थितीत आहेत. गडावर एक देऊळ पण आहे पण ते जमीनदोस्त झालेलं आहे. देऊळ आहे असं समजतं कारण त्याचे खांब आणि कळस सहज ओळखता येतात. पूर्वी यामधे शंकराची आणि देवीची मूर्ती असावी. जवळच एक शीलालेख सापडतो, जो मोडी लिपीमधे आहे.

एकात एक गुंफलेली टाकी

देवळाचे अवशेष आणि शिलालेख


अलंगगडावरुन दिसणारा मलंगगड

आम्ही फिरत होतो खरे, पण आमचं लक्षं सुर्याकडेही होतं. थंडीचे दिवस, त्यामुळे साहजिकच दिवस लवकर संपतो. मावळतीच्या सुर्याची किरणं डोळ्यात साठवून आम्ही ६.१५ च्या दरम्यान परत गुहेच्या दिशेने परत फिरलो. ७.०० वाजेपर्यंत पुर्ण काळोख पडला होता. संध्याकाळी ५.०० वा. जरी जेवण झालं असलं तरीपण आता रात्रीचं जेवण करायची गरज नाही असं कोणाच्या म्हणण्यात येण्याचं काही कारणच नव्हतं. फेरफटका मारून आलो नाही तर लगेच स्टोव्हचा आवाज परत चालु झाला. कॉर्न सुप, अंडाकरी, श्रीखंड, पोळ्या असा शाही बेत असल्यावर पोट भरलेला माणुस सुद्धा ताव मारुन जेवेलच. तर अशाप्रकारे २६ आणि २७ डिसें. ह्या अत्यंत कष्टमय दिवसांची सांगता झाली आणि सगळेजण झोपी गेले.


२८ डिसेंबर २००८

सकाळी उठल्यावर आवरून ८.०० वाजता आम्ही परत गडफेरीसाठी निघालो.अलंगगडाच्या सर्वोच्च माथ्यावर उभं राहिलं, की आपल्याला आपण किती उंचीवर आहोत त्याची कल्पना येते. ह्या एवढ्या उंचीवर असल्यामुळेच अलंगगडावरुन "सप्तश्रुंगी", "मार्कंड्य़ा", "रवळ्या-जवळ्या", "धोडप", कांचना, इखारा, राजधेर-कोळधेर-इंद्राई-चांदवड, साल्हेर-सालोटा, हातगड, ढाकोबा, सिद्धगड, त्याच्या अलिकडे जीवधन, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, रतनगड, असे तब्बल अठरा ते एकोणीस किल्ले बघावयास मिळतात. असे दुरवर असलेले किल्ले शोधुन काढण्यात जी काही मजा आहे, ती अनुभवण्यासाठी अशी भटकंतीच करावी लागते. आमच्या नशिबाने आम्ही ती करु शकतोय.

अलंगगडावरुन दिसलेली वणीची रांग: (डावीकडुन) सप्तश्रुंगीगड, मार्कंड्य़ा, रवळ्या, जवळ्या, धोडप, इखारा

आम्हाला गडाच्या उत्तर टोकाला असलेला दरवाजा बघायचा होता. यासाठी गडाची पूर्ण फेरी मारावी लागते. बरीच पायपीट केल्यावर आम्ही एका घळीपाशी येऊन पोहोचलो. पण खाली रस्ता नक्की कुठे जातोय हे माहीत नसल्यामुळे आम्ही तिथुन परत फिरलो. काही मित्रांशी फोनाफोनी झाल्यावर असं लक्षात आलं की जो दरवाजा आम्ही शोधत होतो तो गडाच्या बऱ्याच खालच्या भागात आहे. त्यामुळे तो मागे टाकुन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. परत गुहेमध्ये येऊन सगळ्या सामानाची बांधाबांध केली. अलंगगडाला रामराम ठोकुन आता आम्ही परत निघालो. एकापठोपाठ एक असं करत अत्यंत सावकाशपणे आम्ही पायऱ्या उतरून प्रस्तरारोहणाच्या (रॉक क्लाईंबिंगच्या) टप्प्यावर आलो. रॅपलिंग हा एक नवीन अनुभव आम्हाला घ्यायचा होता. आमचे हात पाय लटपटत होते, पण तरीसुद्धा तेवढाच उत्साहदेखील होता. सर्व प्रकारचे सेफ्टी बेल्ट्स लावून आम्ही एकेक जण खाली उतरू लागलो. दुसऱ्याला उतरताना बघितलं की हे किती सोपं आहे असा जो आपला भ्रम होतो त्याचा निरास त्या कातळ कड्य़ापाशी आलं की आपोआपच होतो. असं असलं तरी रॅपलिंग हा एक मजेशीर पण घाबरवुन सोडणारा असा एकत्रित अनुभव आहे. ह्या कातळ टप्प्यावरुन उतरायला साधारण १.३० तास लागला. शेवटचा माणुस कातळ कड्य़ावरुन कसा उतरतो ही एक अत्यंत कुतुहलाची बाब आहे आणि भाऊंनी काय जुगाड केला आणि ते सगळे रोप्स घेऊन खाली कसे उतरले हे माझ्यासाठी अजुनही कोडंच आहे.
कातळ टप्पा पार केल्यावर आम्ही मदनगडाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. मदनगडावर जाणाऱ्या वाटेचा अंदाज अलंगगडावरुन घेतल्यामुळे छातीत धडकी भरली होती. अलंग आणि मदन या दोन गडांमधे एक खिंड आहे. अलंग उतरून या खिंडीमध्ये येईपर्यंत दुपारचे ३.०० वाजले होते. वाटेत काहीना काही तरी खाणं चालु होतंच. खिंडीमध्ये सगळे पोचले आणि मदनगडच्या पायथ्याशी असलेल्या पायऱ्यांपाशी आम्ही सगळे येऊन पोहोचलो. या पायऱ्या कातळामधे खोदलेल्या आहेत आणि त्यासुद्धा ९० अंशाच्या कोनामधे, म्हणजे जवळजवळ सरळसोटच आहेत. माणसाच्या गुडघ्याच्या उंचीच्या असलेल्या या पायऱ्या चढुन जाताना खरंच खुप दमछाक होते. या पायऱ्या चढुन आम्ही एका कातळकड्य़ाच्या पायथ्याशी येउन पोचलो. इथुन पुढे विकास, हेमंत आणि चिन्या असे तिघंही क्लाईंबर्स पुढे गेले. मदन गडावरचा कातळ टप्पा पार करायचा असल्यामुळे या तिघांनी पुढे जाऊन रोप्स लावुन ठेवले. आम्ही एकापाठोपाठ एक असे हा टप्पा पार करण्यासाठी पुढे जाऊ लागलो. या कातळटप्प्याच्या पायथ्याशी दोनपेक्षा जास्ती माणसं राहुच शकत नाहीत त्यामुळे आम्ही एकेक करुन तिथपर्यंत येऊन थांबत होतो आणि आपण हा टप्पा कसा पार करणार असा विचार करत आधी जाणाऱ्याकडे बघत बसलो होतो. कारण खाली दोन ते अडीच हजार फूट खोल दरी बघायची हिंमत कोणामध्येच नव्हती.

मदनगडाचा रॉक पॅच

हा कातळ टप्पा पार करुन सगळेजण वरती आले. संध्याकाळचे ६.३० वाजून गेले होते. यानंतरचा टप्पा अंधारातच पार करावा लागणार होता. पण अज्ञानात सुख म्हणतात ना तसं डाव्या-उजव्या बाजुला किती खोल दरी आहे हे आम्हाला काळोखात समजतंच नव्हतं. त्यामुळे पुढे चालत होतो. पुढे परत कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत. अत्यंत कमी जागेमध्ये, म्हणजे एक माणुस जेमतेम बसेल, एवढ्याच आकाराच्या पायऱ्यांचा हा टप्पा आहे. हा साधारण २० ते २५ मिनिटांचा टप्पा पार करुन आम्ही सगळेजण मदनगडावर पोचलो. आम्ही किती अवघड टप्पा पार करुन वरती आलो होतो हे आम्हाला अजुनही समजलं नव्हतं. मदनगडाच्या माथ्यावर पोचेपर्यंत संध्याकाळचे ७.३० वाजुन गेले होते. गडावर सधारणपणे ५० माणसं सहज झोपु शकतील एवढी मोठी गुहा आहे. दिवसभराची पायपीट करुन सगळेच थकले होते. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झाली. कदाचित वाचणाऱ्याला वाटेल की आम्ही गिर्यारोहणाला जातो की फक्त जेवायला. पण परत एकदा सांगतो की सैन्य हे पोटावर चालतं. व्हेज पुलाव करण्याचा आमचा बेत होता. मी, मनोज आणि प्रणव असे तिघं स्टोव्ह पेटवणे आणि पेटलेला स्टोव्ह टिकवणे याचे अटोकाट प्रयत्न करत होतो, तर किर्ती, अमोघ आणि अभय असे तिघं भाज्या कापण्यामधे गुंतले होते. निलेश व अनिरुद्ध पाणी आणण्यासाठी बाहेर पडले होते. प्रत्येक जण काहीना काही कामामध्ये गुंतला होता. ह्या सगळ्या टीमवर्कचं फळ आम्हाला काही वेळातच मिळालं. फळ नको तर पुलाव मिळाला असं आपण म्हणु. पुलाव असा काही झाला होता की दोन पातेली भरुन केलेला पुलाव कधी आणि कसा संपला काही समजलंच नाही. उलट भुक एवढी लागली होती की बरोबर आणलेले मेथी पराठेही आम्ही सगळ्यांनी फस्त करुन टाकले. यानंतरचा मी, अनिरुद्ध आणि अभय असा आम्हा तिघांचा नेहमीचा, म्हणजे भांडी घासण्याचा कार्यक्रम पार पडला. १२.०० वाजण्याच्या सुमारास सगळे गुडुप्प झाले.


२९ डिसेंबर सकाळ:
मदनगडावर राहण्याची काय मजा आहे, हे आम्हाला सुर्योदय बघितल्यावर समजलं. एका बाजूला अर्धवर्तुळाकार पसरलेला महाकाय अलंग, त्यामागुन उगवलेला सुर्य, आणि दुसऱ्या बाजुला कुलंग आणि त्याच्या माथ्यावर पडलेला सुर्याचा प्रकाश. सकाळच्या ८.०० वाजण्याच्या सुमारास हे दृश्य प्रत्यक्षंच अनुभवायला हवं. ते फोटोमध्ये किंवा शब्दांमध्ये उतरवणं खुप कठीण आहे.

मदनगडावरील सुर्योदय

मदनगडावरुन दिसणारे ते दृश्य डोळ्यात साठवून आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलो होतो. मदनगड उतरताना कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्यांच्या टप्प्याशी आम्ही पोहोचलो. खाली पाताळाकडे पाहून डोळे फिरण्याची वेळ आली होती. कुणाचीही उजवीकडे बघण्याची हिम्मतच होत नव्हती. कारण जरा तोल गेला, की थेट पाताळात अशीच ती जागा होती. अत्यंत हळुहळु आम्ही हा टप्पा उतरून खाली आलो. अजुनही रॅपलिंगचा टप्पा बाकी होता. पण आम्ही आता या सर्व प्रकारांना सरावलो होतो. त्यामुळे रॅपलिंग करायला फार वेळ लागला नाही. साधारण दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास आम्ही अलंग आणि मदन ह्यामधील खिंडीपर्यंत येऊन पोहोचलो. पुढे पायाला चाकं लावल्याप्रमाणे आम्ही दिड तासामध्ये आंबेवाडीमध्ये आलो.


अलंग-मदन ट्रेकचा आमचा चमु

तीन दिवसांचा हा अविस्मरणीय असा अनुभव होता. मी या लिखाणमध्ये तो जास्तीत जास्तं उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी म्हणतात तसं - "यू हॅव गॉट टू सी इट टू बिलिव्ह ईट".