Saturday, June 12, 2010

किल्ले तैलबैल

लोणावळ्याजवळचे तुंग-तिकोना, लोहगड-विसापुर, कोराईगड, घनगड हे गड आम्ही बघितले होते. पण याच भागातला एक किल्ला त्याच्या विशिष्ट आकारामुळे आमचं नेहमीच लक्षं वेधुन घेत असे. आमचंच नाही तर गिर्यारोहण करणाऱ्या प्रत्येकाला ह्या किल्ल्यावर जायची ओढ असते यात काही शंकाच नाही. हा किल्ला म्हणजे "तैलबैला". हा किल्ला म्हणजे दोन सरळसोट, साधारण आयताकृती कातळ कडे की जे पार करण्यासाठी प्रस्तरारोहण हा एकच मार्ग आहे. एखाद्या डोंगरावर दोन भिंती आणुन बसवाव्या अशी याची रचना आहे. पण या किल्याचं भौगोलिक स्थान हे पण महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इतिहासाचा थोडासा संदर्भ घेतला तर याचं महत्व आपल्याला लक्षात येईल. हा किल्ला आहे घाटावर, पण त्याचवेळेस कोकण भागाला अत्यंत जवळ. स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाबरोबरच ज्या गडाचा विचार झाला होता तो सुधागड तैलबैल किल्ल्यावरुन अगदी समोर हाकेच्या अंतरावर दिसतो. त्यामुळे सुधागडाचं रक्षण करण्यासाठी ह्या किल्ल्याला नक्कीच महत्वपुर्ण स्थान होतं. अजुन एक कारण म्हणजे "सवाष्णी घाट", जो कोकण आणि घाटामधला एक महत्वपुर्ण दुवा होता. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठीही तैलबैल किल्ल्याचं स्थान उपयुक्त होतं.

या किल्ल्यावर जायचं अचानक जमुन आलं. दुर्गरसिक-इग्नाईट अशा दोन ट्रेकिंग करणाऱ्या संस्थांनी ह्या किल्ल्यावर जायचा बेत आखला होता. ह्या ग्रुपबरोबर जायची संधी आम्हाला मिळाली. एखाद्या ट्रेकिंग ग्रुपबरोबर जायची ही आमची पहिलीच वेळ होती. पण अशा किल्ल्यावर जायचं म्हणजे ग्रुपबरोबर जाणं हेच उपयोगी पडत असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरं कारण म्हणजे प्रस्तरारोहणाचा मनमुराद आनंद इथे घेता येणार होता. आमचा नुकताच अलंग-मदन ट्रेक झाल्यामुळे सहाजिकच जाण्याचा उत्साह अधिक होता. एक गोष्ट इथे नमुद कराविशी वाटते. ती म्हणजे प्रस्तरारोहणाची भिती वाटायलाच हवी कारण कुणी असं म्हटत असेल की मला ह्याची अजिबात भिती वाटत नाही तर याचा अर्थ तुम्हाला त्याची गंभीरता समजत नाही. ती भितीच आपल्याला कायम जागरुक ठेवते.

तर आम्ही ठरल्याप्रमाणे ७ जानेवारी २००८ ला रात्री ९.३० वाजता मनोजच्या घरी जमलो. अमोघ ठाण्याहून परस्पर लोणावळ्याला येणार होता. आमच्या ग्रुपमध्ये अमोघ आणि चैतन्य हे दोन हशम पुण्याबाहेर नोकरी करतात. पण तितक्याच उत्साहानी प्रत्येक ट्रेकला असतातच ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. ट्रेकिंगचं वेड, अजुन दुसरं काही नाही. पुण्याहुन निघुन सुमोने आम्ही लोणावळ्याला आलो. अमोघ तिथे आम्हाला जॉइन झाला आणि आम्ही गडाकडे कूच केलं. लोणावळ्याहुन आय. एन. एस. शिवाजीच्या रस्त्याला (ज्याला वायुमार्ग असंही म्हणतात) आम्ही लागलो. कोराईगडावरुन पुढे आल्यावर उजवीकडे आंबवणे गावाकडे जाणारा रस्ता पकडला. आंबवणे-सालतर अशी गावं सोडली की उजवीकडे तैलबैल गावाकडे जाणारी पाटी आपल्याला दिसते. या रस्त्याला आम्ही लागलो त्यावेळेस रात्रीचे १२.३० वाजले होते. पौर्णिमा असल्यामुळे स्वच्छ चंद्रप्रकाश पडला होता. त्यामध्ये दिसणाऱ्या त्या किल्ल्याच्या दोन भिंती फारच सुंदर दिसत होत्या. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडं चांगदेवांना भेटायला एका भिंतीवर बसुन गेले होते. कदाचित त्यातलीच एक भिंत इथे असावी. यातला गमतीचा भाग सोडा, पण इतक्या सरळसोट अशा ह्या तैलबैल किल्ल्याच्या भिंती आहेत. पहाटे साधारण १.१५ वाजण्याच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे तैलबैल गावामध्ये येऊन पोहोचलो. गावामध्ये एक मारुती मंदिर आहे. त्या मंदिराच्या आवारात आम्ही आमचा डेरा टाकला. चंद्राचा छान प्रकाश पडला होता, मध्येच वाऱ्याची एखादी झुळुक येत होती. झोप न लागण्याचं काही कारणच नव्हतं. अशा वातावरणात रहाण्याची मजा काही औरच आहे. त्याचं शब्दामध्ये वर्णन करणं शक्य नाही.

सकाळी ६.१५ ला आम्ही उठलो. ह्यावेळेस ग्रुप बरोबर आलो असल्यामुळे सकाळी उठुन चहा-नाश्ता बनवणे ही भानगडच नव्हती. उलट आमच्या हातामधे तयार उपमा आणि चहा देण्यात आला. हे आमच्यासाठी खुपच वेगळं होतं. सकाळी ७.३० ला आम्ही "कोल" च्या म्हणजे खिंडीच्या दिशेनी जायला निघालो. आम्ही जसे कातळकड्य़ांच्या जवळ येऊ लागलो तशी त्यांची भीषणता जाणवायलात लागली. काही क्षणात आम्ही त्या दोन महाकाय भिंतींच्या पायथ्याशी येऊन पोचलो. ह्या दोन कातळ टप्प्यांसमोर आम्ही म्हणजे किड्य़ा-मुंगीसारखे होतो. साधारण ८.०० वाजता आम्ही प्रत्यक्ष खिंडीमध्ये येऊन पोहोचलो. इथे एक शंकराचं मंदिर आहे, आणि बाजुला पाण्याचं एक टाकं आहे. हा सगळा परिसर प्रस्तरारोहण करणारी माणसं आणि त्यांना लागणारी हत्यारं ह्यानी पावन झाला होता. गेल्यागेल्या आम्हाला तिथे एक फॉर्म भरायला सांगितला. नंतर आम्ही सगळ्यांनी कमरेचा खोगीरपट्टा(सीट हार्नेस), स्क्रुड कॅरॅबिनर्स, डिसेंडर, कमरेला सुरक्षेचा उपाय म्हणुन स्लिंग (अत्यंत दणकट रोप) अशा सगळ्या साहित्यानिशी सुसज्ज झालो. पुढच्या तासाभारामध्ये सर्व क्लाईंबर्सनी आपापल्या पोझिशन्स घेतल्या आणि ९,१५ वाजता सह्यभ्रमणने चढाईला सुरुवात केली. पहिला प्रस्तरारोहणाचा ४० फुटांचा टप्पा पार करावा लागतो. हा टप्पा पार करता यावा म्हणुन क्लाईंबर्सनी रोप व्यतिरिक्त एक शिडी लावुन ठेवली होती. या रोप लाइनच्या आणि हलत्या शिडीच्या सहाय्यानी हा टप्पा पार करणं शक्य झालं. अर्थात हा टप्पा सोपा नक्कीच नव्हता. दोन्ही हातांनी एकतर शिडीला किंवा रोपला धरुन शिडीवर पाय टाकत जाताना हाताची आणि खांद्यांची खरंच वाट लागत होती. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःचं शरीर जोर लावुन वरती खेचावं लागत होतं.
पहिल्या टप्प्यासाठी लावलेली शिडी

तर अशा प्रकारे पहिली किर्ती मग मी त्यापाठोपाठ प्रणव, मनोज, अभय, अनिरुध्द असे सगळे हा टप्पा पार करुन वरती आलो. हा ३० ते ४० फुटांचा टप्पा पार केल्यावर अजुन एका २५ फुटांच्या कातळ टप्प्याशी आम्ही येऊन पोहोचलो. इथे दस्तुरखुद्द भाऊच (विकास सातारकर) मदतीला असल्यामुळे पुढचा टप्पा पार करण्याचं टेन्शन आपोआप कमी झालं. हा पुढचा टप्पा छोटा असला तरी ह्याला "एक्सपोजर" खुप आहे. आणि जाण्याची जागासुधा त्यामानाने खुपच छोटी आहे. ह्या टप्प्यावर तीन रोपलाईन्स, होत्याच पण त्याशिवाय पाय ठेवायला सोपं जावं म्हणुन "स्टाईप्स"सुधा मारुन ठेवल्या होत्या. कातळ टप्प्याच्या खालच्या बाजुला भाऊ आणि वरच्या बाजुला रवी देशपांडे असे दोन अत्यंत अनुभवी क्लाईंबर्स होते. येणाऱ्या प्रत्येकाला हापसुन वर खेचण्याचं अत्यंत जिकिरीचं काम हे दोघंजण पार पाडत होते. हे दोघे क्लाईंबर्स कड्य़ाच्या इतक्या टोकावर थांबले होते की जिथे हलायला बिल्कुल वाव नव्हता.

दुसऱ्या टप्प्यानंतर लागणाऱ्या अरुंद पायऱ्या

हा कातळटप्पा पार केला की अजुन एक छोटासा टप्पा लागतो. इथे प्रचंड प्रमाणात "स्क्री" आहे. त्यामुळे पावलं जपुन टाकावी लागतात. तर असे एकुण तीन टप्पे पार करुन आम्ही समीटला म्हणजे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. गडाच्यामाथ्यावरुन आपण दोन वेगवेगळ्या लेव्हल्स सहज पाहु शकतो. वर म्हणजे घाट माथा आणि खाली कोकण. गडावरुन एका बाजुला सुधागड आणि पालीचा सरसगड, तर दुसऱ्या बाजुला घनगड दिसतो. आणि ह्या सगळ्यांमधे काही दिसत असेल तर फक्त पाताळ. सह्याद्रीचं रौद्र रूप आपल्याला इथुन दिसतं.

गडाचा माथा


गड माथ्यावरुन दिसणारा सुधागड

नेहमीप्रमाणे आम्ही गडमाथ्यावर एक चमुचित्र काढुन परत खाली उतरायला लागलो. प्रस्तरारोहणाचे दोन टप्पे पार करुन आम्ही टाक्यापाशी येऊन पोहोचलो. इथुन १५० फुटाचा टप्पा पार करायचा होता. याचं वैशिष्ठ्य ते असं की ३०-४० फुटांचा टप्पा पार केला की एक पुढे आलेला प्रस्तर (ओव्हरहॅग) येतो की जिथुन पुढे आपल्याला कसलाही आधार न घेता हवेमधे ९० अंशामधे बसुन रोपच्या साहाय्याने खाली यावं लागतं. रॅपलिंगचा खरा आनंद आपल्याला इथे मिळतो. आम्ही नुकतंच सरसरत खाली जाणं (रॅपलिंग) केलेलं असल्यामुळे हा १५० फुटाचा टप्पा आम्ही खुप छान अनुभव घेत पार केला. हा सरसरत खाली जाण्याचा टप्पा पार करायला आम्हाला प्रत्येकाला सधारण ४ ते ५ मिनिटं लागली. प्रत्येकजण खाली आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि ते समाधान हे शब्दामध्ये उतरवणं खरच कठीण आहे. ज्याला याचा अनुभव घेता येईल त्याने खरच तो घ्यावा. ब्रम्हानंद असं मी याचं वर्णन करीन.
सकाळी ९.१५ वाजल्यापासुन ते शेवटचा हशम खाली येइपर्यंत म्हणजे साधारण दुपारी २.१५ पर्यंत एकेक क्षण आम्ही अक्षरशः "एन्जॉय" केला. अत्यंत अविस्मरणीय असा हा तैलबैल किल्याचा आमचा अनुभव ठरला.उतरताना केलेलं रॅपलिंग


मोहिम फ़त्ते केलेला सह्यभ्रमण चमु

1 comment: