Wednesday, May 19, 2010

कोकणातील वैविध्यपूर्ण किल्ले

तीन दिवसांचा ट्रेक म्हणजे खूप तयारी, सामानाची जुळवाजुळव आणि घराबाहेर पडून नवीन जागा आणि किल्ले बघायची ओढ. पण या वेळेला सगळच वेगळ होत, कुठे जायचे तेच ठरले दोन दिवस आधी आणि मोहिम ठरली कोकणच्या किनाऱ्यावरील किल्ल्यांची. विजयदुर्गला पोहोचायचे ऎवढंच ठरलं आणि ह्या नंतर तीन दिवसात होतील तेवढे किनाऱ्यावरचे किल्ले करायचे आणि प्रवास? मिळेल त्या वाहनाने.


पहिला दिवस-- आम्हा चौघांच्या (चैतन्य,प्रणव,अनिरुध्द,अभिजीत) प्रवासाची सुरुवात झाली पुणे-कोल्हापूरच्या एस.टी ने. पहाटे कोल्हापूरला पोहोचल्यावर कळाले विजयदुर्ग गाडी लागायला अजून तास आहे, म्हणून समोर उभ्या असलेल्या गोवा स्टेट ट्रान्सपोर्ट च्या गाडीत बसलो आणि बावडा घाट उतरुन हायवे वरच्या तळेरे गावात दोन तासात आलो. तेथून लगेच विजयदुर्गाची एस.टी मिळाली. खरतर तळेरे-विजयदुर्ग सरळ अंतर फक्त ५४ कि.मी आहे. पण आमचा लाल डब्बा सरळ जाईल तर ना? या प्रवासाला तब्बल तीन तास लागले. अखेर विजयदुर्गला पोहोचलो. दुर्गाची अभेद्य तटबंदी पाहून मात्र तीन तासांचा कंटाळा कुठल्याकुठे पळून गेला.




हा किल्ला आरमाराचे मूख्य केंद्र होता. किल्ल्याच्या तीन बाजूस समुद्र आहे आणि चौथ्या बाजूस जमीनीची चिंचोळी पट्टी आहे. किल्ल्यावर बघायला खूप तटबंदी, बुरुजांवर बांधलेल्या माड्य़ा, खलबतखाना, पाण्याचा बांधलेला सुंदर तलाव, तोफ आणि जेथून सुर्यावर हेलीयम आहे याचा शोध लागला ती जागा. होय हा शोध भारतात लागला. एका इंग्लिश शास्त्र्तद्याने इथे राहून हा शोध लावला होता. किल्ला यथेच्छ बघून पुढे निघालो. पुढचा टप्पा होता जैतापुरचा यशवंतगड. जैतापुरला जाण्यासाठी गावातून एस.टी. नाही. त्यामुळे काय करायचे असा प्रश्न पडला होता. पण तेव्हाच दादाने (प्रणव) एकाला विचारले आणि कळाले की पांगारे येथे जायला एक होडी लगेच सुटणार आहे. पांगारे पासून जैतापुर जवळ आहे हे माहीत असल्याने लगेच होडीत उड्य़ा मारल्या. अर्ध्या तासात खाडी ओलांडून पांगारेला पोहोचलो आणि तेथून रिक्शाने जैतापुर. अंतर १२-१३ कि.मी. एका खानावळीत जेवून चालत नाट्याच्या रस्त्याला लागलो. अंतर ७ कि.मी. थोडे चालून गेल्यावर एक पोलीस व्हॅन आली. तिलाच हात दाखवून मामांना विचारले आणि त्यांनी सुध्धा होकार दिला. मग काय चौघे भीतभीतच त्या व्हॅन मधे बसलो आणि हो खरंच सांगतोय, चौघांचीही पहिलीच वेळ होती. मग त्यांनी आम्हाला नाट्याला सोडले. गावातल्या खूप लोकांना यशवंतगड असा किल्ला आहे हेच माहीत नव्ह्ते. मग एका काकांना विचारुन रस्ता धरला. रस्त्यावरच यशवंतगड आहे.



दुर्लक्षित पण खूप सुंदर किल्ला आहे हा. त्याची बांधणी बघण्यासारखी आहे. किल्ल्याला चार दरवाजे आणि १७ बुरूज आहेत. बालेकिल्ल्याच्या आणि परकोटाच्या मधे खंदक आहे. दोन पाण्याच्या खोदलेल्या विहीरी देखील आहेत. पण खूप झाडी असल्याने या गोष्टी थोड्य़ाश्या शोधाव्या लागतात. किल्ला बघून बाहेर रस्त्यावर आलो आणि आंबोळगडला जायला काही वाहन मिळते का याची वाट बघत बसलो. अंतर ७ कि.मी आहे. पण उशिर झाल्याने आम्ही तो नाद सोडला आणि सरळ पावसला सुमोने निघालो. अंतर सुमारे ३६ कि.मी. त्या दिवशी रात्र पावसच्या भक्त-निवासात काढली. अतिशय सुंदर सोय आहे हा भक्त-निवास.


दुसरा दिवस-- सकाळी लवकर उठून नाक्यावर आलो आणि पूर्णगड कडे जाणाऱ्या एस.टी. ची वाट बघत बसलो. पण एस.टी आलीच नाही. शेवटी रिक्षाने हे ८ कि.मी कापले आणि पूर्णगड गावात पोहोचलो. अतिशय सुंदर गाव आहे. थोडे चालून गेल्यावर पूर्णगडाचा दरवाजा लागतो. हा किल्ला बघून मात्र डोळ्याचे पारणे फिटले. याचे बांधकाम पेशवे कालीन आहे. अप्रतिम लोकेशन, सु-स्थितितील बांधकाम,आणि दोन दरवाजे बघण्यासारखे आहेत.




खरंच नावाप्रमाणे असलेल्या या पूर्णगडचा पूर्ण आनंद घेऊन किल्ल्यातून बाहेर पडलो. पुढचे लक्ष्य होते रत्नागिरी. पूर्णगड-रत्नागिरी सतत एस.टी. आहेत. अंतर सुमारे २५ कि.मी. रत्नागिरीला पोहोचलो आणि रत्नदुर्गला जाणारी बस पकडली. ही बस किल्ल्याच्या साधारण मध्यावर सोडते. मग तेथून थोड्य़ा पायऱ्या चढून किल्ल्यावर पोहोचलो. किल्ल्याचा पसारा प्रचंड आहे. त्यामुळे फक्त बालेकिल्ला बघायचे ठरवले. जर स्वतः ची गाडी असेल तर मात्र पूर्ण किल्ला बघता येतो. किल्ल्यावर भगवतीचे मंदीर, तटबंदी बघण्यासारखे. वरुन भगवतीबंदराचा परिसर पहाण्यासारखा आहे. किल्ला बघून परत रत्नागिरी स्टँड वर आलो. तेथून जयगड ची २ ची एस.टी. पकडायची होती. पण प्रत्यक्षात एस.टी. लागली ३.३० ला आणि त्यामुळे त्या गाडीला "न भुतो ना भविष्यति" अशी गर्दी होती. त्यातूनच वाट काढत दादा आणि अनिरुध्द वर चढले आणि जागा पकडल्या. मी आणि अभिजीत ने आमच्या भल्यामोठ्य़ा सॅक्स खिडकीतून कश्यातरी वर दिल्या आणि एस.टीत चढलो. ती एस.टी. होती रत्नागिरी-बोरिवली. पण ती सरळ हायवेने न जाता आत जयगड ला जाते आणि मग परत हायवे ने मुंबई गाठते म्हणजे फक्त ८० कि.मी चा टल्ला मारते. ज्यांनी कोणी हे रुट काढले त्यांना सलाम केला आणि जयगडचा प्रवास चालू केला. दोन तासात हे अंतर कापले. जयगड गावात शिरताच आमचे स्वागत केले ते नवीनच उभ्या राहीलेल्या जिंदालच्या पॉवरप्लान्टने. खर सांगायच तर त्याच्या मुळे गावाच्या शांततेची (आणि गावाचीही) वाट लागली आहे. बराच उशीर झाल्यामुळे जयगडाच्या जवळच टेंट मारला.


काय लोकेशन होते ते. समोर खाडीचा अप्रतिम नजारा, बाजूलाच असलेला जयगडचा तट आणि आजूबाजूला मोकळे मैदान. अश्या ठिकाणी रहायची मजा काही औरंच असते. पण त्या रात्रीचा अजून एक अविस्मरणीय भाग होता तो उकाडा. वारा पूर्ण पडला होता आणि टेंट मधे इतके उकडत होते की आम्ही घामाने पूर्ण भिजलो होतो. त्या रात्री आम्ही पावसात ओले होऊ तसे चिंब ओले होतो.


तिसरा दिवस-- रात्री फारशी झोप झाली नव्हती. पण तरी लवकर उठलो आणि लगेचच आवरून जयगड बघायला बाहेर पडलो. प्रथम बालेकिल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्यावर गणपतीचे मंदीर, तीन भयंकर खोल खोदलेल्या विहीरी, दरवाजे आणि काही पडक्या इमारती आहेत. बालेकिल्ल्याच्या अभेद्य तटबंदी वरुन एक फेरी मारली आणि तेव्हाच लक्षात आले किल्ला इथेच संपलेला नाही, किल्लातर पार समुद्रापर्यंत बांधलेला आहे. आता अशी तटबंदी आणि बुरुज बघण्याची संधी आम्ही सोडतोय होय.





लगेच खाली आलो आणि ती समुद्रातील बुरुज, तटबंदी डोळे भरुन पाहीले. किल्ला बघायला साधारण २.३० तास लागले. परत जयगड गावात आलो आणि रत्नागिरीची बस पकडून निवळी फाट्याला उतरलो. तेथून रस्ता ओलांडला आणि १० सेकंद थांबलो असू-नसू की एक खासगी गाडी आली. त्याने आम्हाला चिपळूण ला सोडले अंतर ७२ कि.मी. मग चिपळूण वरुन पुण्याला येणारी एशियाड पकडली. त्यातही नशीबाने आमची साथ दिली. बस मधे फक्त दोन विदाऊट रिझर्वेशन जागा होत्या आणि त्याच नेमक्या आम्ही पकडल्या. मग थोडा वेळ दोघांनी उभे राहायचे, दोघांनी बसायचे असे करुन पुणे गाठले.


खरंच, अश्या प्रकारे फारसं प्लॅनींग न करता बाहेर पडायला मजा येते. वर्षातून काही ट्रेक्स असेच करायचे असा निर्धार करुनच या ट्रेक ची सांगता केली.