Monday, January 3, 2011

वासोटा

सह्याद्रीमधे गिर्यारोहण म्हणलं की राजगड, रायगड, तोरणा हे जसे लगेच आठवतात तसाच अजून एक किल्ला गिर्यारोहकांच लक्ष वेधतो तो म्हणजे कोयनेच्या जंगलात असलेला वासोटा. एका बाजूला असलेलं कोयनेचं घनदाट जंगल तर दुसरीकडे थेट कोकणामधे उतरणाऱ्या खोल दऱ्या, अर्थात देश आणि कोकण यांच्या मधे असं याचं भौगोलिक स्थान आहे.
वासोट्याला जाण्यासाठी पुण्याहून सातारा आणि मग कास लेक मार्गे बामणोली या गावी पोहचावं लागतं. पुण्यापासून बामणोली हे अंतर १४६ कि.मी म्हणजे पोचायला साधारणं ४ तास लागतात. सातारा ते बामणोली हे अंतर आहे ३५ कि.मी. बामणोली गावामधून पुढे लॉँचनी गडाकडे जाण्याची सोय आहे. बामणोली ते गडाचा पायथा हे बोटीच अंतर साधारण दीड तासाच आहे. १२ जणांच्या बोटीचं रु. २००० (येऊन-जाऊन) इतकं भाडं आकारल जातं. या बोटीच्या फेऱ्या सकाळी ९ वा. चालू होतात. या बोटी सकाळी लवकर चालू होण्याची गरज प्रकर्षानी जाणवते. त्याच बरोबर ३० जणांच्या बोटीत १२ च माणसं का भरली जातात हे न समजण्यासारखं आहे. बोटीचं तिकिट काढल्यावर बामणोली मधील फॉरेस्ट खात्यामधे एन्ट्री करावी लागते. वनं खात्याकडून जंगलात प्रवेश करण्यासाठी २५ रु. आकारले जातात ज्याची रितसर पावती मिळते. बामणोली ते गड पायथा हे अंतर कोयनेच्या विस्तिर्ण जलाशय पार करुन जावं लागतं आणि आपल्याला कोयना धरणाला महाराष्ट्राचं वरदान का म्हणतात हे लक्षात येतं. आजही या धरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या काही वस्त्यांसाठी ही बोट सेवा हे संपर्काचे एकमेव साधन आहे.
गडाच्या पायथ्याशी पोचल्यावर वन खात्याची मोठी कमान आणि तिथल्या सेक्युरीटी गार्डच्या खोल्या दिसतात. याच ठिकाणी कोयनेच्या जंगलात आढळणाऱ्या प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्या छायाचित्रांचे एक सुंदर प्रदर्शन बघायला मिळंत. पूर्वी इथेच मेट-इंदवली गाव होते. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी व्यवस्थीत मळलेली वाट आहे.

घनदाट जंगलामधून ही वाट जात असल्यामुळे कमीतकमी आवाज करत जाणं अपेक्षीत आहे. यामुळे प्राणी दिसण्याची शक्यता वाढते. दुर्दैवाने काही नीच समाजकंटक लोक या मार्गावर प्लास्टिकच्या पिशव्या, खाण्याच्या डिश अश्या खुणा ठेउन जातात.

पायथ्यापासुन गडावर पोचायला साधारण सव्वा तास लागतो. काही ठीकाणी खडी चढण सोडल्यास जाण्याचा रस्ता अतिशय सोपा आहे. गड माथ्याच्या आधी साधारण २० मि. नागेश्वराकडे जाणारी वाट दिसते. तेथून पुढे गेल्यावर गडाची तटबंदी द्रुष्टीस पडते.

डावीकडे असलेला बाबू कडा आपलं लक्ष वेधुन घेतो. गडाच्या तटबंदीलागत कातळामधे खोदलेल्या पायऱ्या लागतात. या आपल्याला केंजळ गडावरील पायऱ्यांची आठवण करुन देतात.

या पार करुन पुढे आलं की आपण गडाच्या प्रवेशद्वारामधे येतो. दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. गडावर प्रवेश केल्यावर समोरच मारुतीची अतिषय देखणी मूर्ती असलेलं मंदीर आहे.

डाव्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. मंदीराच्या उजव्या बाजूला पाण्याचा तलाव आहे. मंदिराच्या मागील बाजूस वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. मंदिराच्या समोर जाणारा रस्ता आपल्याला गडावरील माचीकडे घेउन जातो. जाताना मधे एक शंकराचं मंदिर बघायला मिळतं.

माचीवरुन खाली उजवीकडे दोन सुळके दिसतात. यातील दूरवर आणि पिंडीसारखा दिसणारा सुळका म्हणजेच नागेश्वर. य़ा नागेश्वराकडे घनदाट जंगलामधून जाणारी वाट आपल्याला बघायला मिळते. माचीवरुन समोर गडावरुन खाली उतरणारे भीषण कडे बघायला मिळतात. या माचीवर जाण्यासाठी निमूळती पण व्यवस्थित पायवाट आहे. दुसरीकडे कोयनेचं विस्तिर्ण आणि सुंदर खोरं पहायला मिळतं.

या माचीवरुन परत मारुती मंदि्राकडे यायचं आणि मंदिराच्या डाव्या अंगानी बाबू कड्याकडे जाणारा रस्ता दिसतो. जाताना वाटेत पाण्याचं टाकं लागतं. टाक्याला लागून असलेली पायवाट आपल्याला बाबू कड्याकडे घेउन जाते. या पायवाटेनी पुढे आल्यावर येणाऱ्या बुरुजावरुन समोर बाबू कड्याचं रौद्रभीषण रूप बघायला मिळतं. १८०० फूट उंचीचा हा कडा आपल्याला कोकणकड्याची आठवण करुन देतो. इथे आल्यावर देश आणि कोकण यातला फरक लगेच लक्षात येतो आणि कोकणात उतरणारी खोल दरी दिसते. आम्ही याचं वर्णन "पाताळ" या एकाच शब्दात करु शकतो.

हे द्रुश्य बघून कोणाला छातीत धडकी भरली नाही तरच नवल. सह्याद्रीची भीती वाटते ती हे असे भीषण कडे बघीतल्यावरच. हा बाबू कडा म्हणजेच जुन्या वासोटा किल्याची एक बाजू. आज जुन्या वासोटा किल्ल्यावर जाण्याची परवानगी वन खात्यकडून मिळत नाही. पण इतिहास असं सांगतो की हा जुना वासोटा किल्ल्या कैद्यांना ठेवायची जागा होती. कोकणात जाण्याचा सगळ्यात जवळचा आणि अशक्य मार्ग म्हणजे बाबू कडा आणि वासोटा यांच्या मधल्या कातळ भिंती उतरुन जाणं. संपूर्ण गड बघायला साधारण एक ते दीड तास पुरेसा आहे. गडावर मुक्कम करण्यास गिर्यारोहकांना वनखात्याची परवानगी नाही. नागेश्वराच्या गुहांमधे राहता येते. वासोटा ते नागेश्वर जायला साधारण दोन तास लागतात. पण एका दिवसात हे दोन्ही ठिकाणे बघून ठरलेल्या वेळेत परत मेट-इंदवली ला येणे शक्य नाही. नागेश्वराच्या डोंगरावरुन खाली कोकणात उतरता येतं. वासोटा किल्ल्यावरुन परत बामणोलीकडे जाण्यासाठी संध्याकाळी ४.३० ला बोट सेवा उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment