Wednesday, February 2, 2011

नरनाळा-गाविलगड

महाराष्ट्रामधे गिरिभ्रमंती करायची म्हणजे लगेच आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे संह्याद्री पर्वत रांग आणि त्यात आपल्या अभेद्य तटबंदी,बुरुज आणि कातळ कड्यांसोबत उभे असलेले किल्ले. पण या संह्याद्री पर्वत रांगेबरोबरच सातपुडा पर्वत रांग आपल्या भौगोलिक स्थानामुळे तेवढीच महत्वाची आहे. यातील किल्य्यांची माहितीदेखील लोकांना नसते. याचं एक कारण म्हणजे संह्याद्रीची मुख्य रांग आणि सातपुडा रांग यांच्यामधलं अंतर. तर अश्या या अपरिचीत भागामधे भ्रमंती करण्याचा बेत आम्ही आखला. वर्‍हाड प्रांतावरची सत्ता सांगणरा अमरावती जिल्ह्यातला गाविलगड आणि अकोला शहराजवळील नरनाळा अशी मोहीम आम्ही आखली होती. २३ ते २५ जाने. २०११ असे तीन दिवस आम्ही ही भटकंती केली. आम्ही २२ जाने. ला प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या बसनी अकोल्यापर्य़ंत गेलो. अकोल्यापर्यंत जाण्याचं तिकिट साधारण ४०० रुपये आणि जाण्यासाठी सधारण १० ते ११ तास लागतात. पुणे-नगर-औरंगाबाद-जालना-खामगाव-चिखली-शेगाव असा प्रवास करत ही बस अकोल्याला पोचते.


नरनाळा

अकोला शहरातुन नरनाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी आकोट मार्गे शहानूर गावात यावं लागतं. अकोला आकोट हे अंतर आहे साधारण ४५ कि.मी तर आकोट शहानूर हे अंतर आहे साधारण २० कि.मी. हे अकोला ते शहानूर अंतर पार करायला साधारण २ ते २.३० तास लागतात. नरनाळा हे अभयरण्य असल्यामुळे इथे सहजीकच वन खात्याची परवानगी घ्यावी लागते. दुपारी ३ ही प्रवेश मर्यादा आहे तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गडावर थांबायची परवानगी मिळते. मंगळवार ही इथली साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे त्याप्रकारे आपला ट्रेक प्लॅन करावा. शहानूर मधे वन खाल्यातर्फे रहायची सोय होते पण त्यासाठी आधीपासुन बुकींग करावं लागतं. नरनाळा किल्ला हा तीन वेगळ्या किल्ल्यांचा मिळुन बनलेला आहे. तेलीयागड, नरनाळा आणि जाफराबाद. यातील तेलीयागड आणि जाफराबाद हे दोन छोटे किल्ले आहेत. या दोन किल्ल्यांवर ऐतिहासिक द्रृष्ट्या बघण्यासारखं अस काही नाही मात्र गडांची तटबंदी आणि बुरुज शाबुत आहेत. यातील जाफराबाद हा "क्रिटिकल फॉरेस्ट झोन" असल्यामुळे तिकडे जायची परवानगीदेखील मिळत नाही. एका द्रुष्टीनी हे योग्यच आहे कारण आपल्या देशात अतिउत्साही समाजकंटकांची कमी नाहीये आणि सद्य परिस्थितीमधे एकवेळ माणुस वाचला नाही तरी चालेल पण प्राणी वाचले पाहीजेत. नरनाळा किल्ल्यावर मात्र तेथील वनखात्याच्या कर्मचार्‍यांच्या मदतीनी पूर्ण गड फिरता येतो. या तीनही किल्ल्यांचा मिळुन असलेला नरनाळा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांमधे सगळ्यात जास्त विस्तार असलेला गड आहे. साधारण ३८२ एकर आणि २४ मैलांचा तटबंदीचा घेर असलेल्या या किल्ल्याला छोटे मोठे मिळुन २२ दरवाजे आहेत आणि बुरुजांची गणती सांगणही कठीण आहे.

शहानूर गावातुन गडमाथ्यावर जायला व्यवस्थित गाडी रस्ता आहे. छोट्या घाटाचा हा रस्ता पार करुन आपण शक्कर तलावापाशी येतो. अजुन एक मार्ग म्हणजे या गाडी रस्त्यानी शहानूर दरवाज्यापाशी यायच. हे गडाचं पहिलं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावर पाषाणामधे कोरलेले व्याल बघायला मिळतात. प्रवेश केल्यावर दोन्ही बाजुंना असलेल्या देवड्या बघायला मिळतात. आजही हे अवशेष चांगल्या अवस्थेमधे आहेत. इथुन पुढे गेल्यावर आपण मेंढा दरवाज्यापशी येतो.
दरवाज्यावर काही कलाकुसर नसली तरी दरवाज्याची ऊंची, त्याबाजुचे बुरुज आणि आधीची तटबंदी यामुळे त्याची भव्यता कुठेच कमी पडत नाही. मेंढा दरवाज्यातुन पुढे गेलं की रायगडावरील महादरवाज्याला असलेल्या बुरुजांची आठवण करुन देणारे पण एकदम वेगळे असे दोन बुरुज आणि त्यामधे असलेला मेहंदी दरवाजा दिसतो. हा मेहंदी दरवाजा मागे ठेउन पुढे आलं की डोळ्याचं पारणं फिरणारं द्रृश्य आपल्याला दिसतं. हे म्हणजे या गडाचं केंद्रस्थान म्हणता येइल असा महाकाय महाकाली दरवाजा. याचं नाव किती समर्पक आहे हे इथे आल्यावरच जाणवतं. कितीही फोटो बघितले तरिही हे प्रवेशद्वार प्रत्यक्ष डोळ्यानी बघणं हा एक वेगळाच अनुभव आहे. आजवरच्या दुर्गभ्रमंतीमधे इतकं भव्य प्रवेशद्वार मी बघितलं नाही. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना, कारागिरांच्या हातातुन पाषाणावर झालेली उत्तम कलाकुसर, बाजुला सुंदर नक्षीकामानी सजवलेले सज्जे, समोरील बाजुस असणार्‍या देवड्या हे बघायचं म्हणजे तिथे स्वतः असायला हवं. प्रवेशद्वारावर फारसी भाषेमधे असलेले दोन शीलालेखही पहायला मिळतात. आजही फारसी भाषा समजु शकणारा माणुस हे शीलालेख सहज वाचु शकेल इतके ते स्पष्ट आहेत. या प्रवेशद्वारानी मात्र गडावर जाणारी मळलेली वाट दिसत नाही. गाडी रस्त्यानी जाताना हे सर्व दरवाजे लागतातच. याच गाडी रस्त्यानी अजुन पुढे गेलं की डाव्या हाताला एक पायवाट गेलेली दिसते जी आपल्याला आकोट दरवाज्यापाशी आणुन सोडते. या दरवाज्याच्या अगोदर २ नळीच्या तोफा बघायला मिळतात. आकोट दरवाजाही अश्याच भक्कम तटबंदीचा बांधलेला आहे. आकोट गावातुन येणारी पायवाट इथे स्पष्टपणे पहायला मिळते. वर ज्या महाकाली दरवाज्याबद्दल मी लिहिलय त्या महकाली दरवाज्याच्या डावील तटबंदीलगत एक रस्ता आकोट दरवाज्याकडे जातो असा संदर्भ काही पुस्तकांमधे आढळतो परंतु याबाबत खात्रीलायक काही सांगता येणार नाही. आकोट दरवाज्यातुन पुढे गेलं की आपण गडमाथ्यावर पोचतो. ईथेच डाव्या हाताला असलेल्या काही बैठ्या इमारती, नागपुरकर-भोसल्यांचा वाडा, पैलवानबाबा शाह दर्गा अश्या वास्तु बघायला मिळतात. उजव्या हाताला दिसतो तो शक्कर तलाव. पिसाळलेला कुत्रा चावल्यावर या तलावत आंघोळ करायची आणि या तलावाच्या काठावर असलेल्या बर्‍हाणुद्दीन अवलीया याच्या थडग्याची पुजा करायची आणि मागे न वळता गड उतरुन खाली जायचं असा समज आजही लोकांमधे असल्यामुळे आजही आकोट आणि शहानूर गावातुन लोक या शक्कर तलावामधे आंघोळ करायला येतात. याच तलावाच्या बाजुला चार मजल्यांएवढी उंच इमारत आहे. ज्याला अंबर महल किंवा राणी महल असही म्हणतात.
हा महाल समोर ठेउन उजवीकडे एक छान कलाकुसर असलेली मशीद बघायला मिळते. तर डावीकडे एक पायवाट जाते. या वाटेनी सरळ गेलो की एका चौथर्‍यावर कमानी दिसतात. याच्या खाली आहे ती तेला-तुपाची विहीर. इथुन पुढे गेलं की अजुन एक वाडा दिसतो ज्याला बाहेरील बाजुस चार कमानी आहेत. इथुन पुढे परत शक्कर तलावापशी आलं की तलावच्या पलिकडच्या काठावर वनकर्मचार्‍यांसाठी असलेली घरं दिसतात. साधारण ४ ते ५ कर्मचारी या गडावरील गस्ती्चं आणि वन्यप्राण्यांच्या रक्षणाच महत्वाचं काम करतात. या मजुरांच्या मदतीला एक हती देखील इथे पाळलेला आहे. या घरांच्या बाजुनी जाणार्‍या पायवाटेनी पुढे गेलं की एक रस्ता दिल्ली दरवाज्याकडे जातो. वाटेत एक मारुती मंदीर, राम तलाव, मोती तलाव लागतात. दिल्ली दरवाज्यामधे येण्याचा मुख्य रस्ता हा तिथे असलेल्या झाडाझुडुपांमुळे बंद झालेला आहे त्यामुळे गडावरुनच मागील बाजुनी आत शिरावं लागतं. आतमधे उंच कमानी आणि देवड्या आहेत. या प्रवेशद्वारावर दगडामधे कोरलेली कमळं दिसतात. इथुन पुढे जाणारा रस्ता नउगजी तोफेकडे जातो. एक गज म्हणजे अडीच फूट. यावरुन तोफेच्या लांबीचा अंदाज येतो.
या तोफेच्या वरील बाजुन फारसी किंवा उर्दु मधे कोरलेले शीलालेख बघायला मिळतात. तोफ ज्या दरीच्या दिशेनी रोखलेली आहे ते चंदन खोरं. हे चंदन खोरं आपल्या डाव्या हाताला ठेवत पायवाटेनी पुढे गेल्यावर बुरुजांनी बंदीस्त वाडा बघायला मिळतो. त्याच्याच समोर एक टेहाळणी बुरुज आहे. इथुन आपण पुढे परत शक्कर तलावापाशी येतो. गडाची ही पूर्ण फेरी करायला २ तासाचा अवधी पुरेसा आहे. सोबत वनकर्मचारी असल्यामुळे गड बघणे सोयीस्कर होते.



गाविलगड

अकोल्याहुन गाविलगडाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी चिखलदर्‍याला यायच. आकोल्याहुन परतवाडा मार्गे चिखलदरा हे साधारण १२० कि.मी. अंतर आहे. इथल्या रस्त्यांचा विचार करता हे अंतर पार करायला अंदाजे साडेतीन तास लागतात. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे प्रवेश करण्यापूर्वी एक घाट पार करुन यावं लागतं. मेळघाट टुरिझम्स या संस्थेतर्फे "पंचफूल द कॅंप" या हॉटेलमधे (चिखलदर्याला) रहायची आणि जेवणाची उत्तम सोय होते. दारुकाम मात्र इथे करता येत नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. गाविलगड चिखलदर्‍यापासुन साधारण २ ते ३ किमी अंतरावर आहे. उंची समुद्रसपाटीपासुन अदमासे २९०० फूट. या गडाचा इतिहास सांगायचा झाला तर १२१२ मधे गवळी राजानी या गडावर ताबा मिळवला. त्या काळात ज्याच्या हातात गाविलगड त्याचं वर्‍हाड प्रांतावर राज्य असा समज होता. त्यामुळे या गडाला असलेलं महत्वं लक्षात येतं. पुढे १६८० मधे संभाजी आणि १७१८ मधे राजाराम महाराजांच्या हातात हा गड होता. आज गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी जाउ शकते. वाहनतळाला लागुनच आपल्याला मछली तलाव बघायला मिळतो. मछली दरवाज्यातुन गडावर प्रवेश करता येतो. ह्या मछली दरवाज्यातुन आत शिरल्यावर गोमुखी बांधणीचा वीरभान दरवाजा लागतो.
या दरवाज्यातुन आत शिरल्यावर डावीकडे गज आणि सिंह अशी दोन शिल्प बघायला मिळतात. बहुतकरुन ही २ शिल्प या वीरभान दरवाज्यावरील असावीत. याच बरोबर डावीकडेच टेकाडावर बघितलं तर आपल्याला लोहारी तोफही द्रृष्टीक्षेपात पडते. दरवाज्यातुन पुढे एक रस्ता सरळ मोझरी दरवाज्याकडे जातो आणि दुसरा रस्ता खाली दिल्ली दरवाज्याकडे जातो. या खाली जाणार्‍या रस्त्यानी २० ते २५ मिनीटं चालुन गेल्यावर "शारदुल" दरवाज्यापाशी आपण पोचतो. दगडामधे मध्यभागी कोरलेलं खजुराचं झाड, त्याच्या बाजुला असलेली द्वीमुखी गरुडाची शिल्पं (ज्याला गंडभिरुंड असही म्हणतात), त्याच्या खाली व्याल आणि त्यांच्या पायात असलेले हती अश्या वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांनी हे प्रवेशद्वार सजलेलं आहे.
हा शारदुल दरवाजा पार करुन पुढे गेल की अजुन एक छोटेखानी दरवाजा लागतो. आणि या दरवाज्याच्या पुढे आहे तो म्हणजे प्रशस्त असा दिल्ली दरवाजा.
गडाचं शत्रुपासुन संरक्षण करण्याच्या द्रुष्टीनी या तीनही दरवाज्यांचं अतिषय महत्व असणार यात काही शंका नाही. दिल्ली दरवाज्यातुन पुढे गेल्यावर डाव्या हातास खाम तलाव, देव तलाव, धोबी तलाव एकापाठोपाठ द्रृष्टीस पडतात. यापैकी देव तलावाला लागुनच सुंदर कलाकुसर असलेली एक मशीद बघायला मिळते. मशीदीच्या पुढे गेल्यावर एका छोट्या टेकाडावर आपण येउन पोचतो. इथे सुंदर कमानी असलेली एक वास्तु बघायला मिळते ज्याला धान्यकोठार असं म्हणतात. या धान्यकोठाराच्या उजव्या बाजुनी पुढे गेल्यावर एक वाट दाट(वडाच्या) झाडांमधुन वर जाते. इथे डाव्या हाताला एक भुयारी मार्ग आहे. याच्या आत एकतर न जाणे किंवा गेल्यास स्वतःच्या जबाबदारीवर जावे ही सुचना. हा भुयारी मार्ग मागे ठेवुन उजवीकडे वर एक पायवाट जाते जी आपल्याला किल्लेदाराच्या वाड्याकडे घेउन जाते. या वाड्याच्या समोर खाली दरीच्या दिशेनी पुढे गेल्यावर एक ढासळलेला बुरुज आणि त्याच्या आधी एक तोफ बघायला मिळते. याच किल्लेदाराच्या वाड्याच्या डाव्या हाताला एक पायवाट जाते ज्यानी काही अंतर पार केल्यावर आणखी एक तोफ आपल्याला बघायला मिळते. वर नमुद केलेल्या खाम तलाव, देव तलाव सोडल्यानंतर एक वाट डावीकडे जाते जी आपल्याला शंकराचं मंदीर आणि लोहारी तोफेकडे घेउन जाते. ही डावीकडील वाट सोडुन पुढे सरळ गेल्यावर धोबी तलावाच्या बाजुनी एक रस्ता सरळ जातो आणि एका भव्य मशीदीपाशी घेउन जातो. हा रस्ता माशीदीच्या मागील बाजुस येतो. ७ कमानी आणि ३ दालनं असलेली ही भव्य मशीद म्हणजे या किल्याचं एक प्रमुख आकर्षण म्हणता येइल.
प्रत्येक कमानीवरील कमळं, कमानीवरील सज्जा आणि त्यावर असलेले गोल घुमट फारच आकर्षक आहेत. या सभामंडपाच्या समोरील बाजुन भव्य पटांगण आहे आणि खालच्या बाजुस सुंदर कलाकुसर केलेलं मशीदीचं प्रवेशद्वार आहे. या मशीदीच सभामंडप आणि समोरील पटांगण बघता गाण्याची एकादी सुरेखशी मेहफील इथे करणं सहज शक्य आहे. या मशीदीच्या मुख्य प्रवेशद्वारतुन बाहेर पडल्यावर उजवीकडे जायचं आणि पुढे डावी पायवाट पकडायची जी आपल्याला काळभैरव तोफेकडे घेउन जाते. महाराष्ट्रातील गिरिदुर्गांवरील सगळ्यात जास्तं लांबीची अशी ही काळभैरव तोफ.
याची लांबी साधारण २३ फूट आहे. तोफेचं तोंड एवढं मोठं आहे की त्यात कुठल्याही आकाराच्या माणसाचं डोकं सहज जाऊ शकेल. तोफेच्या खालील बाजुस एक पायवाट जाते ज्यानी गेलं कि आपण पीरफत्ते दरवाज्यापाशी येतो. या प्रवेशद्वारावर एक शिलालेख आहे पण त्यातील मजकूर स्पष्ट दिसत नाही. या प्रवेशद्वाराचं मुळ बांधकाम हे काळ्या पाषाणामधे आहे पण प्रवेशद्वाराला लागुन एक दुमजली इमारत आहे. याचं बांधकाम मात्रं वीटांनी केलेलं आहे. मशीदीच्या मुख्य प्रवेशद्वा्रातुन बाहेर पडल्यावर उजवीकडे जायचं आणि परत उजवीकडे असलेली पायवाट (तोफेकडे जाण्यासाठी जिथे डावीकडे जातो तिथेच) पकडायची जी आपल्याला बहराम बुरुजाकडे घेउन जाते. तटबंदीलगत जाणार्‍या या वाटेनी गेलं की आधी २ मोठ्या तोफा पहायला मिळतात. यातील दरीच्या बाजुला असलेल्या तोफेच्या बाजुनी खाली गेल्यावर आपण बहराम बुरुजावर येतो. आजही याची तटबंदी पुर्णपणे शाबुत आहे आणि याच्या तटबंदीवर फारसी भाषेतला एक शिलालेख आहे. असा हा गाविलगड. माझ्याकडुन जितकी जास्त माहीती देता येइल तेवढी देण्याचा हा एक प्रयत्न. हा संपुर्ण किल्ला बघायला सधारण ५ ते ६ तास लागतात.

3 comments:

  1. nice info.and fotos..melghat tourismcha ph. no.+ charges?

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. First of all sincere apologies for delay in reply. Please find the link of Melghat Tourism
    http://www.melghattourism.com/ and here is phone no of the concrned person 9822278864

    ReplyDelete