पुढे गेल्यावर एका तीन मजली विशाल वाडयाचे अवशेष बघायला मिळाले. आता जरी त्याची दुरावस्था असली तरी कधीकाळी त्याने वैभव बघितलेले असणार हे मात्र निश्चित. त्याच्याच शेजारी भला मोठा बांधलेला तलाव आहे. काही अंतर पुढे गेल्यावर एक दुमजली इमारत दिसली. काही पायऱ्या उतरल्यावर बुरुजाच्या खाली पोहोचलो.
तिथे एक अजब गोष्ट पाहिली. बुरुजाच्या आत एक मोट लावून पाणी काढायची सोय आहे. त्याच्या साधारण २० फूट किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खाली पाण्याचे खोदीव टाके आहे. जर शत्रुने किल्ल्याला वेढा घातला तर पाणी काढायची ही सोय आहे. किल्ल्यावर बारमाही पाण्याची सोय नसल्याने इतके उपद्वयाप. त्यांच्या कल्पकतेला सलाम केला आणि पुढे निघालो.
हे सर्व बघायला साधारण २.३० तास लागले. महत्वाचे सांगायचे म्हणजे ह्या सर्व अजब प्रकाराला किल्ला असं म्हणलं जात नाही. कुठेही त्याचा किल्ला म्हणून तर सोडाच पण साधा उल्लेखही सापडत नाही.
परत नगरला आलो. भूका लागलेल्याच होत्या. परतीच्या रस्त्यावर एका हॉटेलात राजस्थानी थाळी चा समाचार घेतला. फक्कड प्रकार होता. तृप्त होऊन बाहेर पडलो आणि त्यानंतर नगरच्या किल्ल्याकडे मोहरा वळवला. हा किल्ला मिलीटरीच्या ताब्यात आहे. त्यामुळे तो फक्त रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीच ९.०० ते ५.०० खुला असतो. किल्ल्याच्या आत सर्वत्र जंगल वाढलेलं आहे. त्यामुळे काही ठराविक ठिकाणीच जाता येतं, पण तटबंदीवरुन मात्र पूर्ण गड फेरी मारता येते. तटबंदीवर चढताच प्रथम लक्ष गेले ते डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याकडे. त्याला सलाम केला आणि पुढे निघालो. जसे जसे पुढे गेलो तसतसा किल्ल्याचा विस्तार दिसु लागला. किल्ल्याला असंख्य बुरुज आहेत. तटबंदी पूर्णपणे शाबूत आहे. एका बुरुजाचा विस्तार एव्हढा आहे की त्यावरुन चक्कर मारायला ५-६ मिनीटं लागली. याच बुरुजाच्या पोटात एक बोगदा आहे जो तुम्हाला बुरुजाच्या दुसऱ्या बाजूस पोहोचवतो. किल्ला आणि मुख्य जमीन यामधे एक प्रचंड खंदक आहे. काही बुरुजांच्या बाहेरील बाजूस शरभ कोरलेले आहेत. सुमारे २ तास चालल्यावर आलो ते किल्ल्याच्या मुख्य दरवाज्या जवळ. दरवाजा गोमुखी रचनेचा आहे आणि दोन दरवाज्यांमधे मोठा चौक आहे. इथेच तटबंदी वर कोरलेला फारसी शिलालेख आहे. ह्या दरवाजातून बाहेर मात्र पडता येत नाही. तो बंद केला आहे. तटबंदी वरुन गडफेरी पूर्ण केली आणि खाली उतरलो. या किल्ल्यातच जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल यासारख्या स्वातंत्र्यसेनानींना तुरूंगात ठेवले होते. त्यांना ठेवलेल्या खोलीत त्यांच्या वापरातील काही वस्तु ठेवल्या आहेत. त्या बघुन साधारण २.३० तासानी परत आलो.
अशी ही एका दिवसाची भटकंती कायम लक्षात राहील. पण एक खंत वाटत राहील की एव्हढा वारसा आपल्याकडे आहे, पण तो आपल्याला अजून माहीतच नाही आहे. त्यामुळे पुढची भेट असेच एखादे दुर्लक्षित ठिकाण घेऊन.
नगरच्या किल्ल्यात नेहरूंनी 'डिस्कवर ऑफ इंडीया' ग्रन्थ लिहिलाय. मस्त फोटो, मस्त माहिती.... तुमचा ब्लॉग चालू झाला हे लई झ्याक झालं!
ReplyDelete